असा असेल कडक लॉकडाऊन | व्हिडिओ आणि सविस्तर माहिती
लॉकडाऊन संदर्भात महापालिका उपायुक्त जमीर लेंगरेकर यांची माहिती-
सोलापूर : आज शनिवारी (दि. ८) रात्रीपासून लागू करण्यात आलेल्या कडक लॉकडाऊनमध्ये रमजान ईदनिमित्त सोलापूर शहरात दोन दिवस सूट देण्यात आली आहे. त्यानुसार मंगळवारी (ता. ११) आणि बुधवारी (ता. १२) सकाळी ७ ते ११ या वेळेत जीवनावश्यक वस्तूंची दुकाने सुरू राहणार आहेत. यामध्ये किराणा, मटण, भाजीपाला, दूध, बेकरी, फळे आदी दुकानांचा समावेश आहे.
बुधवारी सकाळी ११ नंतर १५ मे सकाळी सातपर्यंत कडक लॉकडाऊन असेल, अशी माहिती महापालिका आयुक्त पी. शिवशंकर यांनी दिली. शुक्रवारी रात्री हा आदेश जारी करण्यात आला. आज शनिवारी रात्री आठपासून या लॉकडाऊनची अंमलबजावणी होणार आहे. शनिवारी (दि. ८) सकाळी ११ पर्यंत जीवनावश्यक वस्तूंची दुकाने सुरू राहणार आहेत. खरेदी करताना नागरिकांनी फिजिकल डिस्टन्स राखणे, मास्कचा वापर अनिवार्य आहे. नागरिकांनी, दुकानदारांनी या नियमांचे पालन करावे, असे आवाहन महापालिका उपायुक्त जमीर लेंगरेकर यांनी केले आहे. नियमांचे पालन न केल्यास पोलिस व महापालिकेकडून दुकाने बंद करण्यात येतील. येत्या गुरुवारी किंवा शुक्रवारी रमजान ईद होणार आहे.
रुग्णालये, लसीकरण केंद्रे, वैद्यकीय विमा केंद्र, औषधी दुकाने, औषध कंपन्या, इतर वैद्यकीय सेवा व सेवा पुरवणारे उत्पादन केंद्र, लस, मास्क व वैद्यकीय उपकरणे बनवणाऱ्या संबंधित सेवा, संबंधित सेवेसाठी लागणारा कच्चामाल पुरविण्यास परवानगी राहणार आहे. घरपोच दूध वितरण करण्यास सकाळी सहा ते नऊ वाजेपर्यंत परवानगी राहणार आहे. शिव भोजन थाळी फक्त पार्सल सुविधा उपलब्ध राहील. शीतगृहे, गोदाम सेवा, स्थानिक प्राधिकरणाचे मान्सूनपूर्व सेवा, रिझर्व बँकेने मंजूर केलेल्या सर्व अत्यावश्यक सेवा, वस्तूंची वाहतूक, पाणीपुरवठा सेवा, प्रसारमाध्यमे, सर्व प्रकारची मालवाहतूक सेवा, विद्युत व गॅस पुरवठा सेवा, एटीएम व टपाल सेवा, स्वस्त धान्य दुकाने सकाळी सात ते अकरा या वेळेत सुरू राहतील. पेट्रोल पंपावर अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांना ओळखपत्र दाखवूनच पेट्रोल देण्यात यावे असे आदेशात म्हटले आहे.
हॉटेल, रेस्टॉरंट, परमिट रूम, बार, देशी दारूची दुकाने, शाळा, महाविद्यालयं, धार्मिक स्थळे बंद ठेवण्यात येणार आहेत. एसटी महामंडळाची बस सेवा पूर्णपणे बंद राहणार आहे. रिक्षा सेवा फक्त अत्यावश्यक बाबीसाठी सुरू राहणार आहे. खाजगी वाहतूक फक्त अत्यावश्यक बाबींसाठी सुरू ठेवण्यात येणार आहे.
- मेडिकल, रुग्णालये सुरू राहणार
- घरपोच दूध विक्री सकाळी ६ ते ९
- बांधकाम वस्तू ने-आण करता येणार.
- लसीकरण करणारे व घेणारे नागरिकांना जाता येईल.
- अत्यावश्यक सेवा देणारी कंपनी, कार्यालये सुरू
- किराणा दुकाने, भाजीपाला, बाजार समित्या १५ मेपर्यंत राहणार बंद
आज रात्री ८ पासून लॉकडाऊनची अंमलबजावणी सोलापूर जिल्ह्यात शनिवारपासून (दि. ८) ते १५ मेपर्यंत लॉकडाऊनची कडक अंमलबजावणी करण्यात येणार असल्याचे आदेश शुक्रवारी रात्री काढले आहेत. किराणा दुकाने भाजीपाला विक्री यासह इतर बाबी बंद राहणार आहेत.