विठ्ठला कोणता झेंडा घेऊ हाती?

विठ्ठला कोणता झेंडा घेऊ हाती?

Uttam-Shinde-Dada-Kondke-Shivsena-Solapur-News

सोलापूर : मराठी माणसाचा सर्वांगीण विकास अन प्रखर हिंदुत्वासाठी हिंदुहृदयसम्राट स्वर्गिय बाळासाहेब ठाकरे यांनी स्थापन केलेल्या शिवसेनेला पुनर्वैभव मिळावे अशी प्रत्येक निष्ठावंत शिवसैनिकाची भावना आहे. परंतू हे मिळण्यासाठी कोणता झेंडा हाती घ्यावा असा संभ्रम पडलेल्या तमाम शिवसैनिकांतर्फे विठ्ठलाला साकडे घालण्यासाठी उळे (ता.दक्षिण सोलापूर) येथील प्रती दादा कोंडके उत्तम शिंदे यांनी सोलापूर ते पंढरपूर पायी वारी करण्याचा संकल्प केला आहे.

गेल्या वर्षी अशीच पायी वारी त्यांनी  शिवसेनेच्या अखंडतेसाठी सोलापूर ते  मुंबई केली होती. त्या पायी वारीची दखल दोन्ही गटातील प्रमुखांनी घेतली होती. दोन गटात शिवसेना विभागल्यामुळे सामान्य व निष्ठावंत शिवसैनिकांच्या मनात अजूनही घालमेल आहे. नेमका कोणता झेंडा हाती घ्यावा हा प्रश्न आहे. हा प्रश्न घेऊनच उळेतील प्रती दादा कोंडके उत्तम शिंदे सोलापूर ते पंढरपूर पायी वारीला निघणार आहेत. ही पायी वारी येत्या आठवड्याभरात केली जाणार आहे. सोलापूर येथून छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारुढ पुतळ्यास अभिवादन करुन वारीची सुरुवात होणार असल्याची माहिती उत्तम शिंदे यांनी दिली.

स्वर्गिय बाळासाहेबांनी महतकष्टाने उभारलेल्या शिवसेनेला पुनर्वैभव मिळावे हि राज्यातील शिवसैनिकांची लोकभावना आहे. या भावनेपोटीच स्वर्गिय बाळासाहेबांनी प्रति दादा कोंडके संबोधत ज्याला आशिर्वाद देत छातीला लावून घेतले त्या उळे येथील उत्तम शिंदे यांनी पायी वारीचे पाऊल उचलले आहे. वारकरी जसे आपल्या मनातील भाव पंढरीनाथाच्या पायावर व्यक्त करण्यासाठी भगवी पताका खांद्यावर घेऊन विठूचा अन ज्ञानोबा तुकोबाचा गजर करत पायी वारी करतो. तशीच ही सोलापूर ते पंढरपूर पायी वारी असल्याचे उत्तम शिंदे यांनी सांगितले. गेल्यावर्षी याचदिवशी स्वर्गिय  बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळाजवळ स्वर्गिय बाळासाहेबांचे दर्शन घेऊन त्यांच्यासमोर तमाम शिवसैनिकांचा प्रतिनिधी म्हणून शिवसेनेच्या अखंडतेसाठी साकडं उत्तम शिंदे यांनी घातले होते. 

शिवसेनेसाठी आपलं आयुष्य वेचलेल्या सिनेकलावंत स्वर्गिय दादा कोंडके यांचा वारसदार या रुपात उत्तम शिंदे सोलापूरातून निघणार आहेत. दादा कोंडके यांनी जसे शिवसेनेचे स्टार प्रचारक म्हणून काम केले तसेच काम त्यांच्यानंतर उत्तम शिंदे यांनी स्वर्गिय बाळासाहेबांच्या आशिर्वादाने केले आहे. राज्यात विविध निवडणूकावेळी हे काम गेल्या 25 वर्षापासून अव्याहत सुरुच आहे. उत्तम शिंदे लहानपणापासूनच एक शिवसैनिक म्हणूनच काम करतात. राज्यात सर्वदूर प्रचारक म्हणून काम केलेल्या उत्तम शिंदे यांनी कधीच कोणत्या पदाची अपेक्षा केली नाही. पोटाला चिमटा घेऊन पायाला भिंगरी बांधून हा शिवसैनिक शिवसेनेच्या प्रचार अन प्रसारासाठी धडपडतोय. आताही शिवसेनेला पुनर्वैभव प्राप्त व्हावे ही एक उदात्त भावना उराशी घेऊन पायी वारी करत असल्याचे उत्तम शिंदे यांनी सांगितले. 5 दिवसांची ही पायी वारी आपण स्वयंस्फूर्तीने व प्रामाणिकपणे करणार असल्याचे उत्तम शिंदे यांनी सांगितले.