सोलापूर : सोलापूर शहरात आर्थिक फसवणुकीचा गुन्हा समोर आला आहे. आशिष अशोक पाटील (वय 25, रा. न्यू संतोष नगर, जुळे सोलापूर) या तरुणाला शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करायला लावून 80 लाखांची फसवणूक केली आहे. आशिष हा जुळे सोलापुरातील सामाजिक कार्यकर्ते अशोक पाटील आणि माजी नगरसेविका राजश्री पाटील यांचा मुलगा आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शहरातील विजापूर नाका पोलीस स्टेशन अंतर्गत 1 ऑगस्ट 2021 ते 20 जानेवारी 2025 या कालावधीत ही घटना घडली आहे. फिर्यादी आशिष अशोक पाटील यांनी आरोपी निवृत्ती मारुती पैलवान व त्यांची पत्नी सुरेखा निवृत्ती पैलवान यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
आरोपींनी फिर्यादीला शेअर मार्केटमध्ये पैसे गुंतवणुक करून 5 टक्के दराने मोबादला देण्याचे आमिष दाखवले. या आमिषाला बळी पडून आशिष पाटील यांनी आरोपींना 80,00,000 रुपये दिले. परंतु आरोपींनी मोबादला देण्याचे वचन पाळले नाही व विश्वास भंग केला. ही फसवणूक विविध स्थानांवर घडली. ज्यात सावन हॉटेल जवळील भंडारी स्पोर्ट्स क्लब, इंद्रजीत मेडीकल समोर दावत चौक, बाँम्बे पार्क जुळे सोलापुर, न्यु संतोष नगर जुळे सोलापुर, आर्श रेसिडेन्सी एसआरपीएफ कँम्प जवळ विजापूर रोड सोलापूर यांचा समावेश आहे.

विजापूर नाका पोलीस स्टेशनने फिर्यादी आशिष अशोक पाटीलच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल केला आहे व तपास सुरू आहे. आरोपींविरुद्ध 420, 406, 34 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणात आरोपींवर गंभीर आरोप आहेत. ज्यामुळे त्यांना कठोर शिक्षा होऊ शकते. फसवणुकीच्या प्रकरणातील आरोपींना कायदेशीर कारवाईचा सामना करावा लागेल, ज्यामध्ये जामीनपात्र व गैरजामीनपात्र शिक्षा दोन्ही समाविष्ट असू शकतात.
या फसवणुकीचा परिणाम फिर्यादी व त्याच्या कुटुंबावर झाला आहे, परंतु हे प्रकरण समाजाला सुद्धा एक महत्त्वाचे संदेश देते की अशा प्रकारच्या गुंतवणुकीच्या आमिषांवर विश्वास ठेवू नये. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करताना योग्य तपासणी व सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे.







