ठरलं! मंगळवारी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री येणार
CM Eknath Shinde DCM Devendra Fadanvis Ajit Pawar Solapur News
सोलापूर : (जिमाका) : मुख्यमंत्री महिला सशक्तिकरण अभियानांतर्गत मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना वचनपूर्ती सोहळा मंगळवार दिनांक 8 ऑक्टोबर 2024 रोजी सोलापूर शहरातील होम मैदान येथे होणार आहे.
या कार्यक्रमासाठी जिल्ह्यातून 400 पेक्षा अधिक बसेसच्या माध्यमातून पस्तीस ते चाळीस हजार महिला लाभार्थी उपस्थित राहतील याचे नियोजन केलेले आहे. हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी सर्व संबंधित विभागांची पूर्वतयारी झालेली आहे. परंतु दिलेल्या जबाबदाऱ्या अत्यंत चोखपणे पार पाडून परस्परात योग्य समन्वय ठेवावा, असे आवाहन जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी दिले.
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात आयोजित मुख्यमंत्री महिला सशक्तिकरण अभियान पूर्वतयारी आढावा बैठकीत जिल्हाधिकारी आशीर्वाद मार्गदर्शन करत होते. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम, मुख्यमंत्री कार्यालयाचे संतोष यादव, निवासी उपजिल्हाधिकारी मनीषा कुंभार, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोहिनकर, उपजिल्हाधिकारी अंजली मरोड, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक सुधीर ठोंबरे, जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी आर. बी. काटकर, जिल्हा परिषदेचे महिला व बाल विकास विभागाचे जिल्हा कार्यक्रम अधिकारी प्रसाद मिरकले, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता अभय भोसले, पोलीस उपायुक्त वाहतूक सुधीर खिरडकर, जिल्हा प्रशासन अधिकारी नगरपालिका वीणा पवार, तहसीलदार श्रीकांत पाटील यांच्यासह अन्य संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
जिल्हाधिकारी आशीर्वाद पुढे म्हणाले की, मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण अभियानांतर्गत माझी लाडकी बहीण योजना वचनपूर्ती सोहळ्यासाठी जिल्हाभरातून येणाऱ्या महिला लाभार्थ्यांची व्यवस्था चांगली व्हावी यासाठी सर्व संबंधित यंत्रणांनी काळजी घ्यावी. प्रत्येक तालुक्यातून येणाऱ्या वाहनांसाठी शहरात पार्किंगची व्यवस्था करण्यात आलेली आहे त्याच ठिकाणी आपली वाहने पार्क करावीत. प्रत्येक बस मध्ये एक तलाठी असेल ते सर्व महिलांना व मैदानापर्यंत घेऊन येणे व कार्यक्रम झाल्यानंतर त्यांच्या गावी सोडणे ही जबाबदारी त्यांची राहील. प्रत्येक बसमध्ये पाणी व अन्य सर्व सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहेत. कार्यक्रमाच्या ठिकाणी पाणी, मोबाईल टॉयलेट व आरोग्य पथक या सुविधा उपलब्ध करून दिलेले आहेत. कार्यक्रमाच्या ठिकाणी कोणत्याही महिलांना त्रास होणार नाही याची दक्षता सर्व संबंधित यंत्रणांनी घ्यावी, असेही त्यांनी सुचित केले.
कार्यक्रमाचे व्यासपीठ, विद्युत पुरवठा आदीची जबाबदारी सार्वजनिक बांधकाम विभागाची असून त्यांनी प्रोटोकॉल प्रमाणे व्यासपीठ तयार करावे तसेच त्याच ठिकाणी अनुषंगिक सुविधा उपलब्ध करून घ्याव्यात. जिल्हा महिला बाल विकास कार्यालयाने 30 लाभार्थी माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांची यादी तयार करावी. आज रोजी पर्यंत दहा लाख 34 हजार माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत चे अर्ज मंजूर झालेले आहेत. काही लाभार्थ्यांना योजनेअंतर्गत दोन हप्ते प्राप्त झालेले आहेत तर तिसरा हप्ता जमा होण्यास सुरुवात झालेली आहे. महिला व बालविकास विभागाने या अनुषंगाने अद्यावत माहिती तयार ठेवावी. कार्यक्रमाच्या ठिकाणी आरोग्य पथक तयार ठेवावे. पोलीस बंदोबस्त चोख राहील याबाबत दक्षता घ्यावी अशा सूचना जिल्हाधिकारी आशीर्वाद यांनी दिल्या.
मुख्यमंत्री कार्यालयाचे अधिकारी संतोष यादव यांनी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना वचनपूर्ती सोहळा कार्यक्रमाच्या अनुषंगाने जिल्हा प्रशासनाने केलेल्या पूर्वतयारीचा आढावा घेतला. तसेच हा कार्यक्रम अत्यंत चोखपणे करण्यासाठी मुख्यमंत्री कार्यालयाच्या वतीने सूचना देण्यात आल्या. तसेच चेकलिस्ट प्रमाणे सर्व तयारी तंतोतंत करण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले. प्रारंभी निवासी उपजिल्हाधिकारी मनीषा कुंभार यांनी या कार्यक्रमाच्या अनुषंगाने सार्वजनिक बांधकाम विभाग, आरोग्य विभाग, पोलीस विभाग, महापालिका, ग्राम विकास विभाग जिल्हा परिषद, राज्य परिवहन महामंडळ, प्रादेशिक परिवहन कार्यालय या विभागावर सोपवण्यात आलेली जबाबदारी तसेच या विभागांनी आतापर्यंत केलेल्या कामकाजाचा आढावा घेऊन मार्गदर्शक सूचना दिल्या.
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण वचनपूर्ती सोहळा हा कार्यक्रम मंगळवार दिनांक 8 ऑक्टोबर 2024 रोजी दुपारी बारा वाजता होम मैदान सोलापूर शहर येथे आयोजित करण्यात आलेला आहे. या कार्यक्रमासाठी संपूर्ण जिल्ह्यातील जास्तीत जास्त महिला उपस्थित राहाव्यात असे, आवाहन यावेळी जिल्हा प्रशासनाच्या वतीने करण्यात आले.