दिलीप धोत्रे यांना पंढरपूरमधून उमेदवारी जाहीर
Raj Thackeray : मनसेचे दोन उमेदवार जाहीर, शॅडो सहकार मंत्र्याला पंढरपूरमधून उमेदवारी; कोण आहे दिलीप धोत्रे
सोलापूर – महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) आगामी विधानसभा निवडणूक स्वबळावर लढणार हे आता निश्चित झाले आहे. मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी त्यांच्या पक्षाच्या दोन उमेदवारांची घोषणा आज (सोमवार) केली. यात मुंबईतील शिवडी विधानसभा मतदारसंघातून माजी आमदार बाळा नांदगावकर यांना संधी दिली आहे तर पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदारसंघातून दिलीप धोत्रे यांचे नाव जाहीर करण्यात आले आहे. लोकसभा निवडणुकीत राज ठाकरे यांनी भारतीय जनता पक्षाला पर्यायाने महायुतीला बिनशर्त पाठिंबा जाहीर केला होता. मात्र आगामी विधानसभा निवडणुकीत दोन उमेदवार जाहीर करुन राज ठाकरे यांनी त्यांची रणनीती स्वबळाची असणार हे स्पष्ट केले आहे.
कोण आहे दिलीप धोत्रे?
राज्यात 2019 मध्ये महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाल्यानंतर मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी इंग्लंड संसदेच्या धरतीवर शॅडो कॅबिनेट तयार केले होते. त्यात मनसेचे प्रदेश सरचिटणीस दिलीप धोत्रे यांना शॅडो सहकार मंत्रीपद देण्यात आले होते. 2021 मध्ये मनसेच्या सर्वोच्च मनसे नेते पदी दिलीप धोत्रेंची निवड करण्यात आली होती. राज ठाकरे यांच्या दादर येथील कृष्णकुंज निवासस्थानी झालेल्या बैठकीत धोत्रेंची मनसे नेतेपदी निवड झाल्याचे जाहीर करण्यात आले होते. दिलीप धोत्रे हे साधारण तीन दशकांपासून राजकारणात आहेत. त्यांचा राजकीय प्रवेश हा 1992-93 मध्ये भारतीय विद्यार्थी सेनेच्या माध्यमातून झाला. पंढरपूर महाविद्यालयात असताना विद्यार्थी सेनेचे शाखा प्रमुख म्हणून त्यांची निवड झाली. तेव्हापासून राज ठाकरे यांच्या संपर्कात आलेले धोत्रे यांनी राज ठाकरे यांचे निष्ठावंत म्हणून काम केले आहे.