आपल्या भारतीय संस्कृतीत माघ शुद्ध पंचमी म्हणजेच वसंत पंचमीपासून फाल्गुन पौर्णिमेपर्यंत वसंतोत्सव साजरा करण्याची पद्धत आहे. यंदा आज मंगळवार दिनांक 26 मार्चपासून वसंतोत्सवाला सुरुवात होत आहे. यानिमित्त.

वसंताचा उत्सव म्हणजे निसर्गाचा उत्सव असतो. शिशिर ऋतूत पानगळ होते म्हणजे झाडांची पाने गळून पडतात आणि वसंत ऋतूमध्ये झाडांना पालवी फुटते. या वसंतोत्सवाच्या काळात निसर्ग बहरून, फुलून येतो. वातावरणात चैतन्य निर्माण होते. वसंत पंचमीच्या दिवशी देवी सरस्वतीचे पृथ्वीवर अवतरण झाले, म्हणून या दिवशी सरस्वतीपूजन केले जाते. वसंत ऋतू हा सहा ऋतूंचा राजा आहे वसंत ऋतू हा तरुणाईचे प्रतीक आहे. उत्साह, आनंद, संगीत, नृत्य, गायन ही सगळी वसंत ऋतूची वैशिष्ट्ये आहेत. वसंत ऋतू म्हणजे प्रेमाचे पर्व! वसंतोत्सवाला ‘मदनोत्सव’ असेही म्हणतात.

भगवान श्रीकृष्णांनीही गीतेमध्ये ‘ऋतूनां कुसुमाकर:’ असे म्हटले आहे, म्हणजेच श्रीकृष्णांना सर्व ऋतूंमध्ये वसंत ऋतू अत्यंत प्रिय आहे. वसंतोत्सव हा आशावाद सकारात्मकतेचे रूप आहे. या ऋतूत पिवळ्या रंगाचे कपडे, वस्तू , चंदनगंध यांचा उपयोग करतात. शीतल वस्तू किंवा पदार्थ (ऊसाचा रस, कैरीचे पन्हे वगैरे) यांचे या काळात आपण सेवन करावे आणि आनंदोत्सव साजरा करावा असे आपल्या संस्कृतीमध्ये सांगितलेले आहे.
– डॉ. अपर्णा कल्याणी, पौरोहित्य विभागप्रमुख
ज्ञान प्रबोधिनी, सोलापूर










