सोलापूर : सोलापूरचे अस्थिरोगतज्ञ, वाइल्ड लाईफ फोटोग्राफर डॉ. व्यंकटेश मेतन यांनी खोकड हा प्राणी योग गुरु असल्याचे आपल्या फोटोग्राफीच्या माध्यमातून नोंदवले होते. या शब्दाची नोंद सुहास अनंत रानडे यांनी लिहिलेल्या मराठी समानार्थी लघु शब्दकोश आणि इतर बरच काही खंड एक यामध्ये समावेश केला आहे.
कोशकार सुहास अनंत रानडे यांनी ‘मराठी समानार्थ लघु शब्दकोश आणि इतर बरंच काही’च्या पहिल्या खंडात चतुष्पाद प्राण्यांच्या समानार्थी शब्दांबरोबरच अन्यही अतिशय रंजक, महत्त्वाची माहिती दिली आहे.
श्री. रानडे यांचे हे काम अद्वितीय स्वरूपाचे आहे. ‘परममित्र प्रकाशना’ने हा कोश सिद्ध केला आहे. प्रत्येक भाषाप्रेमीच्या संग्रहात तो असलाच पाहिजे, असा ऐवज आहे. ९६८ पृष्ठांचा हा संग्राह्य मजकूर वाचताना श्री. रानडे यांच्या परिश्रमपूर्ण कामगिरीने थक्क व्हायला होतं.
‘खोकड’ हा प्राणी योगगुरू असल्याचं सोलापूरचे डॉ. व्यंकटेश मेतन यांनी नोंदवलं आहे. खोकडाच्या हालचालींचा प्रदीर्घ अभ्यास मेतन यांनी केला आहे. तो स्वतःचे शरीर मोकळे करण्यासाठी पाय ताणतो, सर्व प्रकारच्या सांध्याचे व्यायाम करतो. खोकडाच्या या व्यायाम करण्याच्या क्रिया पाहून त्याला ‘योगगुरू’ असे डॉ. मेतन यांनी संबोधलं आहे, असे या कोशात पृ. क्रमांक २९७ वर म्हटलं आहे. (व्यंकटेश माडगूळकरांनीही खोकडाबद्दल, त्याच्या शिकारीबद्दल त्यांच्या साहित्यात ठिकठिकाणी लिहिलं आहे.)










