अखेर आयुर्वेद कोवीड वैद्यकीय अधिकाऱ्यांना दिलासा!

अखेर आयुर्वेद कोवीड वैद्यकीय अधिकाऱ्यांना दिलासा!

40 वरून 60 हजारांवर 'समान दर्जा - समान मानधन' आयुष संचालनालयाचा निर्णय

सोलापूर : कोवीड रुग्णालयात सेवा देत असलेल्या आयुर्वेद कोवीड वैद्यकीय अधिकाऱ्यांना एमबीबीएस डॉक्टर इतकेच वेतन देण्याचा निर्णय आयुष संचालनालयाने दिनांक 16 एप्रिल 2021 रोजी घेतला आहे. मासिक 40 हजार रुपये ठोक मानधन घेणाऱ्या आयुर्वेद डॉक्टरांना आता 60 हजार रुपये मिळणार आहेत. 'समान दर्जा - समान वेतन' धोरणाची अंमलबजावणी या माध्यमातून केली जाणार आहे. कोवीड रुग्णांवर उपचार करण्यासाठी एमबीबीएस म्हणजेच ऍलोपॅथी आणि बीएएमएस म्हणजेच आयुर्वेदिक डॉक्टरांची सेवा घेतली जात आहे. मागील वर्षभरापासून या डॉक्टरांची (पदवीधर) नियुक्ती करण्यात आली आहे. यामध्ये एमबीबीएस डॉक्टरांना 50 ते 60 हजार तर बीएएमएस डॉक्टरांना 30 ते  40 हजार रुपये वेतन दिले जात होते. तीन महिन्यांच्या करारावर या डॉक्टरांची नियुक्ती करण्यात येत आहे. कोरोनाचा कहर वाढत चालला आहे. रुग्णांना सेवा देण्यासाठी आणखी डॉक्टरांची नियुक्ती केली जात आहे. नव्याने नियुक्त होणाऱ्या आयुर्वेद वैद्यकीय अधिकाऱ्यांना नव्या आदेशानुसार 50 ते 60 हजार एवढे मासिक वेतन दिले जाणार आहे. या पूर्वी नियुक्त बीएएमएम डॉक्टरांना पुन्हा करार केल्यास नव्या धोरणानुसार वेतन दिले जाईल. या माध्यमातून वेतनातील विषमतेची दरी दूर करण्यात आली आहे.

या संदर्भातील सूचना आयुष संचालनालयाने 16 एप्रिल 2021 रोजी सर्व जिल्ह्याचे जिल्हाधिकारी, महानगरपालिका आयुक्त, नगरपालिका, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना दिल्या आहे.

ॲलोपॅथी व आयुर्वेद दोघांचा दर्जा समकक्ष

ॲलोपॅथी आणि आयुर्वेदिक चिकित्सकांना समकक्ष दर्जा प्रदान करण्यात आला आहे. या सोबतच त्यांना 'समान वेतन व समान धोरण' लागू आहे. याच नियमानुसार वेतनातील तफावत दूर व्हावी, अशी मागणी नॅशनल इंटिग्रेटेड मेडिकल असोसिएशन स्टुडंट फोरम (निमा), नागपूरच्या पाठोपाठ सोलापूर जिल्हा शाखेच्या वतीने लावून धरण्यात आली होती. आरोग्य मंत्र्यांसह मुख्यमंत्र्यांकडे यासाठी पाठपुरावा करण्यात आला होता. याचीच ही फलश्रुती असल्याचे निमा स्टुडन्ट फोरम, सोलापूर जिल्हा संघटनेचे पदाधिकारी म्हणाले. आयुर्वेद आंतरवासियता डॉक्टरांचा कोवीड भत्याचा प्रश्नही सरकारने मार्गी लावावा, अशीही मागणी संघटनेने केली आहे.

कोवीड ड्युटी करणाऱ्या वैद्यकीय अधिकाऱ्यांना 'समान काम - समान वेतन' असावे, अशी मागणी शासनाकडे निमा स्टुडन्ट फोरम, महाराष्ट्र राज्य आणि नागपूर शाखा, यांच्या पाठोपाठ सोलापूर जिल्हा शाखेतर्फेही करण्यात आली होती. या संदर्भातील निवेदने राज्याचे मा. मुख्यमंत्री, मा. उपमुख्यमंत्री, मा. आरोग्यमंत्री, मा. वैद्यकीय शिक्षण मंत्री, तसेच हा निर्णय ज्यांनी दिला आहे, ते आयुष संचालनालयाचे संचालक मा. कुलदीपजी कोहली सर यांना वेळोवेळी पाठवण्यात आले होते. एकंदरीत हा आमच्या प्रयत्नाला शासनाने दिलेला प्रतिसाद आहे. या निर्णयामुळे ॲलोपॅथी आणि आयुर्वेद डॉक्टरांमधील विषमतेची दरी कमी होईल. शासन अनुदानित आयुर्वेद महाविद्यालयातील निवासी डॉक्टर तसेच आंतरवासिता विद्यार्थी आणि खाजगी आयुर्वेद महाविद्यालयातील आंतरवासिता विद्यार्थी यांची अनुक्रमे वेतनवाढ व वेतन सुरू करणे याबाबत पाठपुरावा चालू ठेवणार आहोत. शासनाचे आभार! सर्व आयुर्वेद, होमिओपॅथी आणि युनानी कोवीड योद्ध्यांचे अभिनंदन!-

डॉ. ऋषभ सुरेशचंद मंडलेचा,

अध्यक्ष, निमा स्टुडन्ट फोरम, सोलापूर जिल्हा