नाट्य दिंडीत पारंपारिक लोककलांचे सुंदर सादरीकरण
सोलापूर : पारंपारिक लोककलांनी व ढोल, ताशा, लेझीम, भगवे – लाल फेटे, रांगोळ्यांच्या पायघड्या आणि नाट्य कलाकारांच्या उपस्थित शतक महोत्सवी अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाची नाट्य दिंडी शनिवारी सोलापुरातील बलिदान चौक ते नॉर्थकोट मैदान पर्यंत निघाली.
यावेळी नाट्य दिंडीत नाट्य संमेलनाचे स्वागतध्यक्ष तथा पालकमंत्री चंद्रकांत पाटील,अखिल भारतीय नाट्य परिषदेचे अध्यक्ष प्रशांत दामले, सिने अभिनेता तथा विश्वस्त मोहन जोशी, भाऊसाहेब भोईर,प्रा. शिवाजी सावंत, दिलीप कोरके,दत्ता सुरवसे,कार्याध्यक्ष प्रकाश यलगुलवार, सहकार्याध्यक्ष राजा माने, प्रमुख कार्यवाह विजयकुमार साळुंके, प्रशांत बडवे, किशोर महाबोले तसेच अभिनेत्री तेजश्री प्रधान, सविता मालपेकर यांच्यासह विविध मराठी चित्रपटसृष्टीतील कलाकार सहभागी झाले होते.
नाट्य दिंडीत नाट्य कलावंतांसोबत तसेच पारंपारीक लोक कला असलेल्या वासुदेव, पोतराज, गोंधळी, बहुरूपी, बंजारा महिला, आराधी महिला,तसेच मानाचे नंदीध्वज, वारकरी, बहुरंगी वेशभूषेतील लोककलाकारांच्या लोककलेने ही नाट्य दिंडी सजली होती. ही नाट्य दिंडी पाहण्यासाठी सोलापूरकरांनी रस्त्याच्या दुतर्फा गर्दी केली होती.दिंडीतील गावरान कोंबडा लक्षवेधी ठरला.ढोल, ताशा, लेझीम, गुलाबी फेटे, रांगोळ्यांच्या पायघड्या अन् सर्व कलाकारांच्या उपस्थितीत नाट्यदिंडी निघाली.
बलिदान चौकापासून या नाट्य दिंडीला सुरूवात झाली. मधला मारुती चौक, माणिक चौक, दत्त चौक, लकी चौक, डॉ आंबेडकर चौक मार्गे ही दिंडी नार्थकोट प्रशालेच्या मैदानावर पोहोचली.या दिंडीत जय श्रीराम, सिद्धेश्वर महाराज की जय असा जयघोष करत शाळा आणि महाविद्यालयातील विद्यार्थी मोठया संख्येने सहभागी झाले होते.