आमदार देवेंद्र कोठे यांनी घेतली महापालिका आयुक्तांची भेट
सोलापूर : आमदार देवेंद्र कोठे यांनी शुक्रवारी सोलापूर महानगरपालिकेच्या आयुक्त शितल तेली – उगले यांची भेट घेऊन शहर विकासाबाबत चर्चा केली.
शहर मध्य विधानसभेचे आमदार झाल्यापासून आमदार देवेंद्र कोठे यांनी प्रथमच सोलापूर महानगरपालिकेला भेट देत महापालिका आयुक्त शितल तेली – उगले यांचा पुष्पगुच्छ देऊन सन्मान केला. महापालिका आयुक्त शितल तेली – उगले यांनीही आमदार देवेंद्र कोठे यांना पुष्पगुच्छ देऊन त्यांचे स्वागत केले.
यावेळी आमदार देवेंद्र कोठे यांनी शहर पाणीपुरवठ्यासाठी वरदान ठरणाऱ्या उजनी ते सोलापूर दुहेरी जलवाहिनीच्या कामाच्या पूर्णत्वाबाबत सविस्तर चर्चा केली. दुहेरी जलवाहिनीचे काम लवकरात लवकर पूर्ण झाले तर शहराच्या पाण्याचा मोठा प्रश्न संपणार आहे. त्यामुळे हे काम त्वरित पूर्ण करावे, अशा सूचना आमदार देवेंद्र कोठे यांनी महापालिका आयुक्त शितल तेली उगले यांना दिल्या. स्मार्ट सिटीची कामे, शहरातील कचरा, पाणी व्यवस्थापन, विद्युत व्यवस्थापन, स्वच्छता आदी विषयांवर उपाय योजनांबाबत सविस्तर चर्चा केली. शहर विकासाबाबत महाराष्ट्र शासन पातळीवर येणाऱ्या तांत्रिक अडचणी जाणून घेऊन त्याबाबत मुंबई येथे जाऊन योग्य समन्वय साधत प्रश्नांची सोडवणूक करणार असल्याचे आमदार देवेंद्र कोठे यांनी महापालिका आयुक्त शितल तेली – उगले यांना आश्वस्त केले. नागरिकांच्या समस्या जाणून घेऊन त्या तत्काळ सोडवल्या जातील, असे आश्वासन महापालिका आयुक्त शितल तेली –
उगले यांनी आमदार देवेंद्र कोठे यांना याप्रसंगी दिले.
याप्रसंगी भाजपाचे माजी शहर अध्यक्ष विक्रम देशमुख, सोलापूर महानगरपालिकेचे स्थायी समितीचे माजी सभापती विनायक कोंड्याल, माजी नगरसेवक गुरुशांत धुत्तरगावकर उपस्थित होते.
—
सोलापूरही आता थांबणार नाही
मुख्यमंत्रीपदावर विराजमान झाल्यानंतर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ‘विकासाच्या बाबतीत महाराष्ट्र आता थांबणार नाही’ अशी घोषणा केली आहे. त्यांचा विकासाचा महासंकल्प पूर्णत्वास नेण्यासाठी आम्ही योगदान देण्यास कटीबद्ध असून सोलापूरही आता विकासाच्या बाबतीत थांबणार नाही, हे वचन आम्ही सोलापूरकरांना देत आहोत.
— देवेंद्र कोठे, आमदार, शहर मध्य विधानसभा