मुख्यमंत्री महाआरोग्य कौशल्य विकास प्रशिक्षण कार्यक्रमाचे उद्घाटन

मुख्यमंत्री महाआरोग्य कौशल्य विकास प्रशिक्षण कार्यक्रमाचे उद्घाटन

मंत्रालयातून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केला शुभारंभ

 सोलापूर,दि.८: कोविड-19 च्या पार्श्वभूमीवर आरोग्य आणि वैद्यकीय क्षेत्रात कुशल मनुष्यबळाची कमतरता भरून काढण्यासाठी राज्य शासनाने मुख्यमंत्री महाआरोग्य कौशल्य विकास प्रशिक्षण हा कार्यक्रम सुरू केला आहे. मुंबई येथे कार्यक्रमाचे उद्घाटन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते आज ऑनलाईन पध्दतीने झाले.

यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार, उद्योग मंत्री सुभाष देसाई, आरोग्य मंत्री राजेश टोपे, वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख, कौशल्य विकास मंत्री नवाब मलिक, कौशल्य विकास विभागाच्या प्रधान सचिव मनीषा वर्मा, आयुक्त दिपेंद्रसिंह कुशवाह उपस्थित होते. 

सोलापूर येथून निवासी उपजिल्हाधिकारी भारत वाघमारे, डॉ. वैशंपायन स्मृती वैद्यकीय महाविद्यालयाच्या प्रभारी अधिष्ठाता डॉ. शुभलक्ष्मी जयस्वाल, जन औषध वैद्यक शास्त्राचे प्रमुख डॉ. प्रभाकर गोखले, कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता विभागाचे प्रभारी सहायक आयुक्त हनुमंत नलावडे, कौशल्य विकास अधिकारी दत्तात्रय देवळे यांच्यासह महाविद्यालयाचे डॉक्टर आणि कौशल्य विकासचे विद्यार्थी सहभागी झाले होते.

जिल्ह्यामध्ये पायाभूत सुविधा उपलब्ध असणाऱ्या शासकीय, खाजगी दवाखाने आणि वैद्यकीय संस्थांमध्ये आरोग्याचे मनुष्यबळ तयार होणार आहे. सध्या जिल्ह्यात शासकीय पाच आणि खाजगी आठ संस्थांनी यासाठी नोंदणी केली आहे. डॉ. वैशंपायन स्मृती वैद्यकीय महाविद्यालयामध्ये सॅनिटरी हेल्थ एड या प्रशिक्षणासाठी 30 उमेदवारांचे प्रशिक्षण सुरू झाले आहे.

जिल्ह्यामध्ये मुख्यमंत्री महाआरोग्य कौशल्य विकास प्रशिक्षण कार्यक्रमांतर्गतआरोग्य क्षेत्रात काम करू इच्छिणाऱ्या 18 ते 45 वयोगटातील युवक-युवतींना मोफत प्रशिक्षणाची सुवर्णसंधी प्राप्त झाली आहे.