आज नागपंचमी! जाणून घ्या सापांविषयी माहित नसलेल्या गोष्टी...

आज नागपंचमी! जाणून घ्या सापांविषयी माहित नसलेल्या गोष्टी...

सोलापूर : नागपंचमी हा सण भारतात सर्वत्र साजरा केला जातो. या दिवशी नागाची पूजा केली जाते. फणा काढण्याच्या प्रवृत्तीमुळे नाग साप सुंदर व देखणा तर काहींना भयावह वाटतो. नाग सापला सर्पजगतातील राजा असे संबोधले जाते. आपल्या पूर्वजांनी सापांचे महत्व ओळखले होते. 

सुमारे 5 हजार वर्षांपूर्वी द्रविड संस्कृती भारतात रुजली. ह्या संस्कृतीमध्ये नागाची पूजा केली जात असल्याचे पुरावे सापडले आहेत. मोहंजोडदो सारख्या ठिकाणी उत्खननात नाग सापाच्या प्रतिमा सापडल्या आहेत. आपल्या पूर्वजांनी सापांपासून मानवास होणारे फायदे ओळखले असून सापांबद्दल कृतज्ञता व आदर व्यक्त करण्यासाठी नागपंचमी हा सण साजरा होऊ लागला.


सापांबद्दल समाजात पसरलेल्या अंधश्रद्धा व गैरसमजुतींमुळे साप आपला शत्रू असून साक्षात मृत्यूचा अवतार आहे असे आपल्या मनावर खोलवर रुजले आहे. पण सत्य परिस्थिती या उलट असून मानवाने ती स्वीकारायला हवी. मानवाने तंत्रज्ञानात भरपूर प्रगती केली असली तरी उंदरांची संख्या घटवण्याचा निसर्गाचा मार्ग माणसाच्या मार्गापेक्षा अधिक परिणामकारक आहे. उंदरांचा नायनाट करण्यासाठी माणूस उंदीर नाशके उंदरांच्या मार्गात पेरून ठेवतो पण उंदीर त्यांना लवकरच अंगवळणी पाडून घेतात आणि त्या नाशकांचा उंदरांवर काहीच परिणाम होत नाही. तसेच पिंजऱ्यात कसे अडकू नये हे उंदीर लवकर शिकतात. उंदीर खाणारे बरेच प्राणी आहेत पण उंदरांच्या बिळात जाऊन त्यांना खाणारा प्राणी म्हणजे फक्त सापच.

आपला भारत हा शेतीप्रधान देश असून शेतातील 30 ते 35% पिकांचे नुकसान उंदीर करतात. उंदीर किती घातक आहेत आणि साप किती फायदेशीर आहेत ते खाली दिलेल्या समिकरणावरून आपणास लक्षात येईल.


एक उंदराची जोडी वर्षाला 850 पिल्लांना जन्म देते. एका सापाने आठवड्याला 2 जरी उंदीर खाल्ले तरी एका वर्षाला (850×52 आठवडे)= 44,200 सरासरी उंदरांवर नियंत्रण साप ठेवतो. एक साप सरासरी 12 वर्षे जगल्यास 44,200 × 12 = 5,30,000 सरासरी उंदरांवर नियंत्रण ठेवतो. म्हणजेच एक साप त्याच्या आयुष्यभरात सव्वा 5 लाख उंदरांवर नियंत्रण ठेवतो. एक साप मारल्यास किती मोठे नुकसान होते यावरून लक्षात आलेच असेल.


मानवी दृष्टिकोनातून पाहिल्यास सापांचे सकारात्मक व नकारात्मक या दोन्ही बाजू आहेत. पण दुर्दैवाने त्यांच्या सकारात्मक दृष्टिकोनाकडे दुर्लक्ष केले जाते आणि नकारात्मक दृष्टिकोनातून पाहिले जाते.आणि नकारात्मक गोष्टी पसरविण्यापासून चित्रपट कसे मागे राहतील. हिंदी भाषेतील नागीण, नागिना, दूध का कर्ज अश्या चित्रपटांनी सापांबद्दल एक नकारात्मक छाप माणसांवर पडली तर मराठीतील काळभैरव या चित्रपटामध्ये  सापांबद्दल सकारात्मक गोष्टी सांगण्यात आल्या आहेत.
जस जसे तंत्रज्ञान विकसित होत आहे तस तसे सापांबद्दल लोकांचा दृष्टिकोन सकारात्मक होत चालला आहे. तंत्रज्ञानाच्या मदतीने जनजागृती केली जात आहे. पण याच तंत्रज्ञानाचा दुरुपयोग करून तरुण पिढी सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रसिद्धीच्या हव्यासापोटी आपला जीव धोक्यात घालत आहे हेही विसरून चालणार नाही. तरीही काही प्रामाणिक सर्पमित्रांमुळे सापांचे संरक्षण होत आहे ही बाब काही प्रमाणात समाधानकारक आहे. भारतातील सापांना 1972 सालच्या वन्यजीव संरक्षण कायद्या अंतर्गत सापांना संरक्षण देण्यात आले आहे. परंतु याची अंमलबजावणी होत नसल्याने सर्प हत्या अजूनही थांबल्या नाहीत. त्यामुळेच साप आपला शत्रू नसून मित्र आहे हे जेव्हा प्रत्येकास कळेल तेव्हा खऱ्या अर्थाने नागपंचमी साजरी होईल असे म्हणायला हरकत नाही.

भारतात आजतागायत सापांच्या 335 प्रजाती आढळल्या असून त्यातील त्यातील 220 प्रजाती बिनविषारी आहेत. 45 निमविषारी असून फक्त 70 विषारी आहेत. त्यातही नाग, मण्यार, घोणस, फुरसे ह्या 4 विषारी प्रजाती  प्रामुख्याने महाराष्ट्रात सर्वत्र आढळत असून मानवास धोकादायक आहेत. पण योग्य (दवाखान्यात जाऊन) व वेळेवर उपचार झाल्यास माणूस नक्कीच वाचतो.


निमविषारी व बिनविषारी सापांपासून मानवाच्या जीवितास कसलाच धोका नसतो.
सापांबद्दल काही गैरसमज व त्यांचे स्पष्टीकरण

1) गैरसमज:  साप पुंगीच्या तालावर,आवाजावर नाचतो.

स्पष्टीकरण:  सापांना कान नसतात त्यामुळे साप पुंगीच्या हालचालींवर डोलतो,आवाजावर नाही.

2) गैरसमज:- सापांच्या अंगावर केस असतात.

स्पष्टीकरण: अंगावर केस फक्त सस्तन प्राण्यांना असतात.साप सरपटणारा प्राणी असल्याने त्याच्या अंगावर केस नसतात.

3) गैरसमज:- साप कात टाकल्यास अमर हातो किंवा 100 वर्षे जगतो.

स्पष्टीकरण: सापांचे आयुष्य जास्तीत जास्त  20 ते 22 वर्षे आहे, त्यामुळे 100 वर्षे जगणारा साप अस्तित्वातच नसतो.

4) गैरसमज:- साप बदला घेतो.

स्पष्टीकरण: सापाची बुद्धी विकसित झाली नसल्याने तो बदला घेऊ शकत नाही.

5) गैरसमज: इच्छाधारी नाग असतो.

स्पष्टीकरण: तसे झाले असते तर माणसाच्या कष्टाला किंमत उरली नसती आणि सापासमोर फक्त इच्छा व्यक्त करताच ती पूर्ण झाली असती.

6) गैरसमज:  नाग धनाची रक्षा करतो.

स्पष्टीकरण: हे खोटे आहे.तसे झाले असते तर मोठं मोठ्या बँकेत पैशांचे रक्षण करताना सिक्युरिटी गार्ड ऐवजी सापच दिसले असते.

7) गैरसमज: मांडूळ सापाला दोन तोंडे असतात आणि तो पैशांचा पाऊस पाडतो.

स्पष्टीकरण:- मांडूळ सापाला एकच तोंड असतं. त्याची शेपूट आखूड असल्याने तोंड आणि शेपटीतील फरक लक्षात येत नाही.आणि मांडूळ साप जर पैशांचा पाऊस पाडत असेल तर मग लोकांना काम करायची गरजच नसली असती.

बुद्धी विकसित नसणारा प्राणी(साप) हा मानवावर इतके उपकार करत  असेल तर मग या जगातील सर्वात बुद्धिवंत प्राणी मानवाने या सापांचा छळ करून त्यांचा जीव घेऊन अश्या प्रकारे परतफेड करणे कितपत योग्य आहे?


- सर्प अभ्यासक राहुल शिंदे, सोलापूर