सकारात्मक पत्रकारितेला प्राधान्य देण्याची गरज
Patrakar Din Basvarud Math Program Madhav Bhandari
भाजपा प्रदेश उपाध्यक्ष माधव भांडारी : बसवारूढ महास्वामी मठात पत्रकारांचा सन्मान
सोलापूर : सकारात्मक घटनांच्या वाचनामुळे वाचकांवर पर्यायाने समजावर चांगला परिणाम होतो. त्यामुळे पत्रकारांनी सकारात्मक पत्रकारितेला प्राधान्य देण्याची गरज आहे, असे प्रतिपादन भाजपाचे प्रदेश उपाध्यक्ष माधव भांडारी यांनी केले.
पत्रकार दिनाच्या निमित्ताने श्री श्री श्री बसवारूढ महास्वामीजी मठ ट्रस्टतर्फे कस्तुरबा नगर येथील मठात पत्रकारांचा सन्मान करण्यात आला.
यावेळी व्यासपीठावर श्री श्री श्री बसवारूढ महास्वामीजी मठाचे संस्थापक श्रो. ब्र. श्री. ईश्वरानंद महास्वामीजी, मठाधिपती श्रो. ब्र. श्री. शिवपुत्र महास्वामीजी, जिल्हा सरकारी वकील प्रदीपसिंह राजपूत, डॉ. वैशंपायन शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. सुधीर देशमुख, सहाय्यक पोलीस आयुक्त राजन माने, सोलापूर महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाचे प्र. कुलगुरु डॉ. लक्ष्मीकांत दामा, राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक नितीन धार्मिक, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंता राजशेखर जेऊरकर, सोलापूर श्रमिक पत्रकार संघाचे अध्यक्ष विक्रम खेलबुडे, व्यंकटेश पटवारी, ज्येष्ठ पत्रकार प्रशांत माने, ज्येष्ठ पत्रकार विजय देशपांडे, महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे सोलापूर जिल्हाध्यक्ष मनिष केत, गृहनिर्माण मंत्री अतुल सावे यांचे विशेष कार्यकारी अधिकारी कृष्णात पाटील, डॉ. अनिल सर्जे, ॲड. संतोष होसमनी उपस्थित होते.
स्मार्ट सोलापूरकर डिजिटल मीडियाचे संपादक परशुराम कोकणे, दिव्य मराठीचे उपसंपादक विजय गायकवाड सुराज्यचे पत्रकार दीपक शेळके, इन सोलापूरचे प्रतिनिधी होलसुरे आदींचा प्राथनिधीक सन्मान करण्यात आला. तसेच सोलापूर श्रमिक पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी सलग ११ वेळा अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल विक्रम खेलबुडे यांचा तर सीबीआयचे विशेष सरकारी वकीलपदी निवड झाल्याबद्दल ॲड. प्रदिपसिंह राजपूत यांचा विशेष सत्कार याप्रसंगी झाला.
श्री. भांडारी म्हणाले, समाजात बहुसंख्येने असलेले सज्जन निष्क्रिय राहिल्यामुळे अत्यंत कमी संख्येने असलेले दुर्जनांचे बळावते. त्यामुळे पत्रकारांनी समाजातील सज्जनशक्तीला बळ देऊन सकारात्मक बाबी अधिक ठळकपणे समाजासमोर आणाव्यात. पत्रकारितेच्या मूळ तत्वांशी असलेली बांधिलकी न सोडता बाळशास्त्री जांभेकर यांचा वारसा पुढे नेण्याबाबत चिंतन करावे, असेही श्री. भांडारी याप्रसंगी म्हणाले.
सोशल मीडिया, डिजिटल मीडियामुळे उत्तर देणे सोपे झाले आहे. प्रिंट, टीव्ही सोबतच डिजिटल मीडियाही महत्वाचा आहे. पत्रकारांनी समजासोबत असलेली आपली बांधिलकी सोडू नये. समाजात सगळंच वाईट घडत नाही, चांगल्या गोष्टीही घडत असतात. त्या सातत्याने समोर आल्या पाहिजेत. यामुळे समाजात सकारात्मक भावना निर्माण होण्याचा मदत होत राहील, असेही श्री. भांडारी यांनी यावेळी सांगितले.
जिल्हा सरकारी वकील ॲड. प्रदीपसिंह राजपूत म्हणाले, पत्रकारितेतून सत्य परिस्थिती समोर आली नाही तर सामाजिक समतोल बिघडू शकतो. त्यामुळे पत्रकारांनी निरपेक्ष आणि निर्भीड पत्रकारिता करावी, असेही ॲड. राजपूत यांनी सांगितले.
डॉ. अनिल सर्जे यांनी प्रास्ताविक केले. राजेंद्र बलसुरे यांनी परिचय करून दिला. ज्येष्ठ पत्रकार अरविंद जोशी यांनी सूत्रसंचालन तर सिद्धार्थ सर्जे यांनी आभार प्रदर्शन केले.
यावेळी राजू हौशेट्टी, शरण मठ ट्रस्टचे अध्यक्ष सिद्धाराम खजुरगी, सोलापूर महानगरपालिकेचे माजी सभागृह नेते श्रीनिवास करली, माजी नगरसेवक श्रीनिवास पुरुड आदी उपस्थित होते.