सोलापूर : विजापूर रोडवरील गणेश विसर्जन मिरवणुकीदरम्यान महिलेचे हरवलेले पाकीट पोलिसांना सापडले. पाकीट हरवल्यानंतर रडणाऱ्या महिलेच्या चेहऱ्यावर पुन्हा हसू आले. महिलेचे पाकीट परत देणाऱ्या पोलीस अंमलदार सनी वाघमारे आणि शेख यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.
विसर्जन मिरवणूक पाहण्यासाठी सपना विनोद कसबे (वय २८, रा. चाँदतारा मशिदीजवळ, सोलापूर) या मंगळवारी सायंकाळी आपल्या कुटुंबीयांसमवेत गेल्या होत्या. विजापूर रोडवरील मिरवणूक पाहत जात असताना रात्री ८ वाजण्याच्या सुमारास त्यांच्या हातातील २५ हजार रुपये किमतीचा मोबाइल व पाच हजार रुपये रोख रक्कम असलेले पाकीट हरवले.
सपना कसबे या तशाच पुढे निघून गेल्या. दरम्यान, कर्तव्यावर असलेले हवालदार सनी वाघमारे व शेख हे त्या ठिकाणाहून जात होते. त्यांना पाकीट आढळून आले. त्यांनी त्यातील मोबाइल व इतर कागदपत्रे पाहिली.
सपना कसबे यांच्या दुसऱ्या मोबाइलवर संपर्क साधून आयटीआय चौकी येथे बोलावून घेतले. ओळख पटवून त्यांचा मोबाइल व त्यातील रोख रक्कम असलेले पाकीट दिले. पाकीट हरवल्याने सपना कसबे यांच्या डोळ्यांत पाणी आले होते. पोलीस अंमलदार सनी वाघमारे आणि शेख यांच्या प्रामाणिकपणाबद्दल सहायक पोलिस आयुक्त राजन माने, विजापूर नाका पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक दादा गायकवाड यांनी कौतुक करून सत्कार केला.