पक्षी सप्ताहनिमित्त उद्यापासून विविध कार्यक्रम

सोलापूर : पक्षी सप्ताहनिमित्त सामाजिक वनीकरण विभाग, वन विभाग सोलापूर व एनटीपीसी यांच्या संयुक्त विद्यमाने दि. 5 ते 12 नोव्हेंबर या कालावधीत विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती विभागीय वन अधिकारी लक्ष्मण आवारे यांनी दिली आहे.
   पद्मश्री अरण्यऋषी मारुती चित्तमपल्ली यांची 5 नोव्हेंबर रोजी जयंती असते. तर 12 नोव्हेंबर रोजी ज्येष्ठ पक्षी तज्ञ सलीम आली यांची जयंती असते. म्हणून 5 ते 12 नोव्हेंबर या कालावधीत पक्षी सप्ताह साजरा केला जातो.
   
दि. 5 नाव्हेंबर रोजी सकाळी 10 वाजता सिध्देश्वर वन विहार येथे पक्षी सप्ताहाचे उद्घाटन होणार आहे. तर 6 नोव्हेंबर रोजी डॉ. सलीम अली व अरण्यऋषी मारुती चित्तमपल्ली यांच्या जीवन चरित्रावर वक्तृत्व स्पर्धा होणार आहे. 7 नोव्हेंबर रोजी पक्षांविषयी छायाचित्रे, चलचित्रे, लघुपट यावर खुल्या स्पर्धा होणार आहेत. 8 नोव्हेंबर रोजी पथनाट्य स्पर्धा, 9 नोव्हेंबर रोजी सकाळी 6 वाजता हिप्परगा तलाव आणि गंगेवाडी परिसरात पक्षी निरीक्षण होईल. 10 नोव्हेंबर रोजी सकाळी 6 वाजता बोरामणी येथे विविध सामाजिक संस्थांचे सदस्य आणि पत्रकारांसाठी पक्षीनिरिक्षणाचा कार्यक्रम होणार आहे. 11 नोव्हेंबर रोजी सकाळी 10 वाजता ‘जखमी पक्षांचे बचाव कार्य’ याबाबत कार्यशाळा होणार आहे. तर 12 नोव्हेंबर रोजी स्मृती उद्यान येथे पक्षी सप्ताहाचा समारोप आणि विविध स्पर्धांचे बक्षीस वितरण समारंभ होणार आहे.
पक्षी सप्ताहाचा उद्देश काय आहे?
महाराष्ट्रामध्ये 5 ते 12 नोव्हेंबर या काळात पक्षी सप्ताह साजरा केला जातो कारण हा काळ पक्षीमित्र मारुती चितमपल्ली (जन्म 5 नोव्हेंबर) आणि थोर पक्षीशास्त्रज्ञ डॉ. सलीम अली (जन्म 12 नोव्हेंबर) यांच्या जयंतीनिमित्त आहे. या सप्ताहाचा मुख्य उद्देश लोकांना पक्ष्यांचे महत्त्व समजावून देणे आणि त्यांच्या संवर्धनासाठी जनजागृती करणे हा आहे.
आधुनिक जीवनशैलीमुळे पक्ष्यांच्या जीवनातील त्यांचे महत्त्व कमी होत चालले आहे. या सप्ताहामुळे लोकांना पक्ष्यांचे निसर्गातील कार्य आणि जैवविविधतेसाठी त्यांचे योगदान समजावून दिले जाते.
पक्ष्यांची संख्या कमी होत असताना, या सप्ताहामुळे त्यांच्या संवर्धनासाठी लोकांमध्ये जागरूकता निर्माण होते.
अरण्यऋषी मारुती चितमपल्ली आणि डॉ. सलीम अली यांच्या कार्याचा सन्मान करण्यासाठी हा सप्ताह साजरा केला जातो, ज्यांनी पक्षी निरीक्षण आणि संवर्धनासाठी मोठे योगदान दिले आहे.
				


