शिवराय देवस्थानी पोचले असले तरी ते महापुरुष आहेत!
शिवराय देवस्थानी पोचले असले तरी ते महापुरुष आहेत!
‘छत्रपती शिवराय समजून घेताना’ पुस्तकाचे प्रकाशन
सोलापूर : शिवचरित्राचे लेखन हे केवळ अव्वल साधनांच्या आधारेच करायला हवे. शिवकालीन पत्रव्यवहाराचा संदर्भ घेऊन मांडलेला इतिहासच खरा इतिहास आहे. इतर धर्मियांचा आदर करणारे छत्रपती शिवराय हे स्वधर्मावर प्रचंड प्रेम करणारे होते. महाराज स्वकर्तृत्वाने देवस्थानी पोहोचले असले तरी ते महापुरुष आहेत हे आपण विसरता कामा नये. अन्यथा त्यांनी केलेल्या संघर्षाचे अवमूल्यन होईल आणि महाराजांचे गुण अंगीकारण्यात पुढील पिढीला अडचणी निर्माण होतील, असे शिवव्याख्याते डॉ. शिवरत्न शेटे यांनी सांगितले.
जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांचे अकरावे वंशज असणाऱ्या ह. भ. प. शिरिष महाराज मोरे यांनी लिहिलेल्या ‘छत्रपती शिवराय समजून घेताना’ या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा शेकडो शिवप्रेमींच्या उपस्थितीत शिवस्मारक येथे पार पडला. ह. भ. प. लक्ष्मण महाराज चव्हाण, ह. भ. प. सुधाकर महाराज इंगळे, शिवव्याख्याते डॉ. शिवरत्न शेटे, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे जिल्हा संघचालक सुनिल इंगळे, शिवस्मारकचे अध्यक्ष रंगनाथ बंकापूर यांच्या हस्ते पुस्तकाचे प्रकाशन झाले. हिंदवी स्वराज्याची आवश्यकता व त्याची वैशिष्ट्ये, परकीय सत्तांचे अत्याचार, शिवछत्रपतींचे ध्येय व त्यांचे हिंदुत्व, धर्मसंस्थापना व मंदिरांचा जीर्णोद्धार अशा एकूण दहा प्रकरणांच्या माध्यमातून शिवकालीन इतिहास मांडण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे, असे ह. भ. प. शिरिष महाराज मोरे यांनी सांगितले.
गेल्या काही वर्षांपासून समाजासमोर छत्रपती शिवाजी महाराजांचा चुकीचा इतिहास मांडला जात आहे. स्वतःच्या स्वार्थासाठी महाराजांची प्रतिमा बदलण्याचे काम केले जात आहे. यांमुळे वातावरण गढूळ होऊन सामाजिक ऐक्य धोक्यात येण्याची शक्यता आहे. हे रोखण्यासाठी हिंदुत्ववादी लेखकांनी पुराव्यासहित इतिहास लेखन करावे, असे आवाहन ह. भ. प. शिरिष महाराज मोरे यांनी शिवप्रेमींना केले.
‘छत्रपती शिवराय समजून घेताना’ हे पुस्तक सवलतीच्या दरात उपलब्ध असून त्यातून मिळणारा निधी हा हिंदुत्ववादी लेखकांना पाठबळ देण्यासाठी वापरला जाईल, असे मुलुखगिरी प्रकाशन (कोल्हापूर) यांच्या वतीने शिवप्रसाद शेवाळे यांनी जाहीर केले. पुस्तक प्रकाशनानिमित्त भीमराव शेळके, ओम चव्हाण, समृद्धी शिंदे, राजतिलक डोंगरे, सचिन चव्हाण, सुशांत वाघचवरे, सोपान जवळे, अंबिका जवळे या शिवप्रेमींना त्यांच्या विधायक कार्याबद्दल सन्मानित करण्यात आले. यावेळी शिवशंभू यांच्या जयघोषाने शिवस्मारक सभागृह दणाणून गेले होते.