भाजपाकडून राम सातपुते यांना उमेदवारी
सोलापूर : माळशिरस विधानसभा मतदारसंघाचे युवा आमदार राम सातपुते यांना सोलापूर लोकसभा मतदारसंघात भारतीय जनता पार्टीकडून उमेदवारी देण्यात आली आहे. अनेक दिवसांपासून सातपुते यांचे नाव चर्चेत होते. आज अखेर अधिकृत त्यांचे नाव जाहीर करण्यात आले. सोलापूर लोकसभा मतदारसंघात दोन युवा आमदारांमध्ये खासदारकीसाठी लढत होणार आहे.
काँग्रेस पक्षाच्यावतीने शहर मध्यच्या विद्यमान आमदार प्रणिती शिंदे यांना सोलापूर लोकसभेला उमेदवारी देण्यात आली आहे. भाजपकडून राम सातपुते यांना उमेदवारी जाहीर झाल्याने आता दोन तरुण आमदारांमध्ये खासदारकीसाठी लढत होणार आहे.
कोण आहेत राम सातपुते?
राम सातपुते यांचा जन्म 12 मार्च 1988 रोजी महाराष्ट्र राज्यातील बीड मधील डोईठाण या गावी एका ऊस तोडणी करणाऱ्या एका मराठी कुटुंबात झाला आहे.
लहानपणी राम सातपुते यांनी आपल्या आई-वडिलांना साखर कारखान्यात काम करत असताना ऊस तोडणीत मदत केली. शालेय जीवनातच त्यांची राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी ओळख झाली. राम सातपुते यांनी बीड जिल्ह्यातून शालेय शिक्षण पूर्ण केले. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्थानिक अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाने ते उच्च शिक्षणासाठी पुणे शहरात गेले.
पीव्हीजीच्या महाराष्ट्र इन्स्टिट्यूट ऑफ प्रिंटिंग टेक्नॉलॉजीमधून त्यांनी प्रिंटिंग टेक्नॉलॉजीचा डिप्लोमा पूर्ण केला. 2015 मध्ये राम सातपुते यांनी सावित्राबाई फुले पुणे विद्यापीठाशी संलग्न असलेल्या पुणे विद्यार्थी गृहाच्या अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञान महाविद्यालयातून मुद्रण तंत्रज्ञानातील अभियांत्रिकी पदवी प्राप्त केली आहे.
2019 मध्ये माळशिरस विधानसभा मतदार संघातून भारतीय जनता पार्टी कडून आमदार म्हणून राम सातपुते निवडून आले. आता पक्षश्रेष्ठींनी त्यांना थेट सोलापूर लोकसभा मतदारसंघात खासदारकीची उमेदवारी दिली आहे. तरुणांमध्ये आमदार राम सातपुते यांची विशेष क्रेज आहे.