शिक्षकाची फ्लॅट खरेदीमध्ये फसवणूक; आरोपींना झटका
सोलापूर : शिक्षकाच्या फ्लॅट खरेदीमध्ये झालेल्या फसवणूक प्रकरणी सुनिता राजाराम पुल्ली व प्रविण बजरंग शिंदे या आरोपींचा अटकपूर्व जामीनाचा अर्ज न्यायालयाने फेटाळला आहे.
यात हकीकत अशी की, शिक्षक असलेल्या विनायक विठ्ठल ननवरे यांनी सुनिता राजाराम पुल्ली यांच्याकडून न्यु पाच्छा पेठ येथील गणेश अपार्टमेंट येथील फ्लॅट विकत घेतलेला होता. सदर फ्लॅट विकत घेतेवेळी सुनिता राजाराम पुल्ली यांनी सदरच्या फ्लॅटवर कोणतेही कर्ज नाही व सदरचा फ्लॅट निर्वेध, निजोखम व बिनबोजाचा असल्याबाबत सांगून खरेदी दिली होती.
शिक्षक ननवरे यांनी सुनिता राजाराम पुल्ली हिने सांगितलेल्या गोष्टीवर विश्वास ठेवून सदरचा फ्लॅट खरेदी केला आहे. कालांतराने शिक्षक विनायक विठ्ठल ननवरे यांना सदर फ्लॅटवर पुर्वीचे मालक प्रविण बजरंग शिंदे यांनी कर्ज घेतलेले असून ते कर्ज न फेडता सदरचा फ्लॅट सुनिता राजाराम पुल्ली हिस विक्री करुन व तिने सदरचा फ्लॅट विनायक विठ्ठल ननवरे यांना स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी संगनमत करुन फसवणूक केल्याचे समोर आले.
याप्रकरणी जेलरोड पोलीस स्टेशन भा.दं. वि. कलम ४२० प्रमाणे फसवणूकीचा गुन्हा नोंदविला आहे. हा गुन्हा दाखल झाल्यानंतर यातील आरोपी सुनिता राजाराम पुल्ली व प्रविण बजरंग शिंदे यांनी त्यांचे वकीलामार्फत अटकपूर्व जामीन मिळण्यासाठी सोलापूर येथील जिल्हा व सत्र न्यायालयात अर्ज दाखल केलेला होता. आरोपी /अर्जदार यांच्या वकीलांचे व सरकारी वकीलांच्या युक्तीवाद झाला. तसेच सदर प्रकरणात यातील मुळ फिर्यादी शिक्षक ननवरे यांनी त्यांचे वकीलांमार्फत जामीन अर्ज फेटाळण्याकामी शपथपत्र दाखल केले आहे.
दोन्ही बाजूंचा युक्तीवाद ऐकल्यानंतर न्यायाधिश आर.एन. पांढरे मॅडम यांनी सदरचा जामीनाचा अर्ज नामंजूर केला आहे. या प्रकरणात आरोपी सुनिता राजाराम पुल्ली यांच्याकडून ॲड. अभिजीत विटकर यांनी तर प्रविण बजरंग शिंदे यांच्यातर्फे ॲड. राजकुमार म्हात्रे यांनी व सरकार तर्फे सरकारी वकील ॲड. अल्पना कुलकर्णी यांनी तसेच यातील मुळ फिर्यादी तर्फे ॲड. अजिंक्य राजाराम जाधव यांनी काम पाहिले.