पंतप्रधान नरेंद्र मोदींची उद्या सोलापुरात सभा
सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सोमवारी (दि.२९) सकाळी ११ वाजता होम मैदान येथे जाहीर सभा होणार आहे.
सोलापूर लोकसभेचे उमेदवार राम सातपुते यांच्या प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी सोलापुरात येत आहेत. या जाहीर सभेसाठी शहरात विविध ठिकाणी वाहनतळांची व्यवस्था करण्यात आली आहे. सभेसाठी येणाऱ्या नागरिकांनी या ठिकाणी दुचाकी आणि चार चाकी वाहने लावावीत असे आवाहन करण्यात आले आहे.
या सभेसाठी नागरिकांना होम मैदानामध्ये मार्केट पोलीस चौकी व डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक येथूनच प्रवेश दिला जाणार आहे. मंगळवेढा व पंढरपूरकडून तसेच जुना पुणे नाका, तुळजापूर रोडकडून वाहनातून येणाऱ्या नागरिकांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक या ठिकाणी नागरिकांना उतरवून त्यांची वाहने जुनी मिल कंपाऊंड व मरीआई चौक येथील एक्जीबिशन ग्राउंड येथे लावावीत.
अक्कलकोटकडून येणारी वाहने नागरिकांना सिव्हील चौक येथे नागरिकांना उतरवून पुंजाल मैदान किंवा नुमवि प्रशाला पाठीमागील मुलांचे शासकीय वस्तीगृह मैदान येथे वाहने लावावीत. होटगी रोड करून येणारी वाहने विजापूर रोड, पत्रकार भवन मोदी पोलीस चौकीमार्गे डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक येथे नागरिकांना उतरवून संगमेश्वर महाविद्यालयाजवळील स्काऊट गाईड मैदान किंवा नुमवि प्रशाला पाठीमागील मुलांचे शासकीय वस्तीगृह मैदान येथे वाहने लावावीत. तसेच नॉर्थकोट मैदान व हुतात्मा स्मृती मंदिर येथे दुचाकी वाहने लावता येतील, असे प्रशासनाने कळवले आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सुरक्षिततेच्या कारणास्तव होम मैदान परिसरातील खालील नमुद रस्ते सर्व प्रकारच्या वाहनांकरीता सभा संपेपर्यंत बंद राहतील अथवा वळविण्यात येणार आहेत.
रंग भवन चौक ते डफरिन चौक व डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक ते मार्केट पोलीस चौकी पर्यंत सकाळी ०८.०० वा ते सभा संपेपर्यंत सर्व प्रकारच्या वाहनांना वाहतूकीस पुर्णपणे बंद राहणार आहे.
वाहतूक मार्गात बदल-
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सुरक्षेच्या कारणास्तव विमान तळ – आसरा चौक – महिला हॉस्पीटल महावीर चौक – आर.डी.सी. कार्नर – सात रस्ता – वोडाफोन गॅलरी – रंग भवन ते होम मैदान या मार्गावरील वाहतूक व या रस्त्याला जोडणारे रस्ते दिनांक २९/०४/२०२४ रोजी दुपारी १३.३० वाजले पासून काही काळासाठी बंद करण्यात येणार आहे. कृपया नागरिकांना आपली गैर सोय टाळण्यासाठी या मार्गावर येणे टाळम्बे अथवा अन्य मार्गाचा वापर करुन सहकार्य करावे, असे आवाहन शहर पोलीस दलाने केले आहेत.