जरांगे पाटलांनी नाकारला प्रणिती शिंदेंचा सत्कार
Praniti Shinde Manoj Jarange Patil Solapur News
सोलापूर : प्रतिनिधी
मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे – पाटील यांनी सोमवारी आमदार प्रणिती शिंदे यांच्याकडून केलेला सत्कार नाकारला. बेळगाव येथील संवाद दौऱ्यासाठी अंतरवाली सराटीहून सोलापूरमार्गे सोमवारी मराठा नेते मनोज जरांगे – पाटील जात असताना आमदार प्रणिती शिंदे यांनी त्यांचा सत्कार करण्याचा प्रयत्न केला. परंतु हा सत्कार जरांगे पाटील यांनी स्वीकारला नाही.
याबाबत मनोज जरांगे – पाटील म्हणाले, मी त्यांना ओळखत नाही. ही निवडणूक समाजाची आहे. आम्ही कोणालाही पाठिंबा दिलेला नाही. मी रस्त्याने जाताना सत्काराला आले म्हणजे आम्ही पाठिंबा दिला, असे होत नाही. मराठा समाज आता पूर्वीसारखा राहिलेला नाही. मराठे कोणालाही राजकीय फायदा घेऊ देत नाहीत. त्यांनी ६५ वर्षात मराठा समाजाला काही दिले नाही, असे म्हणत मनोज जरांगे – पाटील यांनी नाव न घेता काँग्रेसवर निशाणा साधला. कोणाला निवडून आणायचे आणि कोणाला पाडायचे हे समाज ठरवेल, असेही मनोज जरांगे – पाटील याप्रसंगी म्हणाले.
याबाबत सकल मराठा समाजाचे समन्वयक रवी मोहिते म्हणाले, आमदार प्रणिती शिंदे यांनी मराठ्यांचे नेते मनोज जरांगे – पाटील यांचा सत्कार करण्याचा प्रयत्न केला. पण त्यांनी तो स्वीकारला नाही. मनोज जरांगे – पाटील यांची प्रकृती खालावलेली असताना मराठा आंदोलक आमदार प्रणिती शिंदे यांच्या बंगल्यावर गेले होते. विरोधी पक्षाच्या लोकप्रतिनिधींनी आंतरवली सराटी येथे जाऊन मनोज जरांगे – पाटील यांचे उपोषण थांबवावे असे आवाहन मराठा आंदोलकांनी केले होते. परंतु आमदार प्रणिती शिंदे यांनी त्यावेळी कोणत्याहीप्रकारे मराठा आंदोलनाचे समर्थन केले नाही.
Video –
मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक राम जाधव म्हणाले, मराठा आरक्षणासाठी अनेकांनी संघर्ष केला आहे आणि बलिदान दिले आहे. कोणत्याही राजकीय पक्षाला मराठा समाजाचा पाठिंबा नाही. कोणाला मतदान करायचे हे समाज ठरवेल असे मनोज जरांगे – आहे पाटील यांनी जाहीर केले आहे.