सोलापूर पोलीस गुन्हे वृत्त महाराष्ट्र राजकीय सामाजिक मनोरंजन वेब - स्टोरी पर्यावरण / पर्यटन

सोलापूरच्या विकासाचे ‘बारा’ वाजले!

On: March 17, 2026 12:14 PM
Follow Us:
HTML img Tag Simply Easy Learning

Solapur Development Milind Bhosale Smart Solapurkar News

HTML img Tag Simply Easy Learning

फक्त आश्वासनांचा पाऊस, पण समस्यांचा दुष्काळ कायम!

HTML img Tag Simply Easy Learning

सामाजिक कार्यकर्ते मिलिंद भोसले यांचा संताप; सत्ताधारी आणि प्रशासनाच्या उदासीनतेवर ओढले ताशेरे

सोलापूर : “स्मार्ट सिटी” कडे वाटचाल करणाऱ्या सोलापूर शहराची गेल्या १५ वर्षांतील अवस्था ‘दुर्दैवी’ अशीच झाली आहे. केवळ निवडणुकीच्या रिंगणात आश्वासनांची गाजलेली मैदाने आणि प्रसिद्धीसाठी होणारी पोकळ उद्घाटने यापलीकडे सोलापूरकरांच्या पदरात काहीही पडलेले नाही. सोलापूरच्या प्रलंबित समस्यांबाबत सत्ताधारी, विरोधक आणि प्रशासन हे सर्वच कमालीचे उदासीन असून, आता सोलापूरकरांनीच आपल्या हक्कासाठी निश्चय करण्याची वेळ आली आहे, असा पवित्रा प्रसिद्ध सामाजिक कार्यकर्ते मिलिंद भोसले यांनी घेतला आहे.

भोसले यांनी सोलापूरच्या जखमेवर बोट ठेवत १२ प्रमुख प्रश्नांचा पाढा वाचला आहे –

१. २० वर्षांपासून ‘रोज पाणी’ फक्त कागदावरच!
निवडणुका आल्या की ‘दररोज पाणीपुरवठा’ हे मुख्य गाजर दाखवून मते मागितली जातात. कोट्यवधींचा खर्च झाला, मात्र सोलापूरकरांना आजही पाण्यासाठी वणवण करावी लागत आहे. दररोज पाणी येण्याचा लवलेशही कुठे दिसत नाही.

२. रस्त्यांचे नियोजनशून्य काम
५६ कोटींचा निधी नसल्याने ८ वर्षांपासून रखडले आहे. सध्या जो रस्ता झाला आहे, त्यात स्थापत्य अभियांत्रिकी (Civil Engineering) शास्त्राचा पूर्णपणे अभाव असून याचे दुष्परिणाम भविष्यात नागरिकांना सोसावे लागणार आहेत.

३. विमानसेवा आणि औद्योगिक विकास : एक शोकांतिका
विमानसेवेचा गाजावाजा झाला खरा, पण अद्याप मोठ्या शहरांशी कनेक्टिव्हिटी आणि नाईट लँडिंगबाबत कोणतीही प्रगती झालेली नाही. याउलट तरुणांना रोजगारासाठी पुणे-मुंबईला जावे लागत आहे. एमआयडीसी आणि आयटी पार्कच्या घोषणा केवळ फाइल्समध्येच बंद आहेत.

४. सार्वजनिक वाहतूक आणि धुळखात पडलेल्या बसेस
शहरात नवीन इलेक्ट्रिक बसेसची घोषणा झाली, पण अद्याप चार्जिंग स्टेशन तयार नाही. याआधीच्या १०० बसेस राजेंद्र चौकात धुळखात पडून आहेत, ज्यामध्ये ८९ कोटी रुपये आणि कोर्टाचा ३६ कोटींचा खर्च असा एकूण १२५ कोटींचा चुराडा झाला आहे.

५. उड्डाणपुलांचे ‘इव्हेंट’ आणि तांत्रिक चुका
रामलाल चौकातील जुना पूल पाडण्याची घाई केली, पण नवीन कामाचे स्टील डिझाइन आणि बेस स्ट्रेटा अद्याप मंजूर नाही. तिकडे आसरा चौकातील पुलाचे काम पाईपलाईन आडवी आली म्हणून ६ महिने रखडले आहे. शहरात पुलांच्या कामाचे वारंवार उद्घाटन होते, पण काम मात्र मुंगीच्या पावलानेही सरकत नाही.

६. शैक्षणिक संस्थांचा लढा
शासकीय तंत्रनिकेतनच्या इमारतीत अभियांत्रिकी महाविद्यालय सुरू व्हावे म्हणून ८ वर्षांपासून लढा सुरू आहे, पण तांत्रिक आणि आर्थिक तरतुदींअभावी काहीही साध्य झालेले नाही.

७. मूलभूत सुविधांची वानवा
एवढ्या मोठ्या शहरात फक्त एकच नाट्यगृह आणि एकच मुख्य एसटी स्टँड आहे. जुळे सोलापूर भागात जलतरण तलावासाठी जागा असूनही १० वर्षांपासून तिथे काहीच घडलेले नाही. पालिकेचे उत्पन्न ६०० कोटी आणि कर्ज ५०० कोटी असल्याने विकासासाठी गंगाजळीत पैसेच उरलेले नाहीत.

८. टेक्स्टाईल उद्योगाकडे दुर्लक्ष
सोलापूरमध्ये बेंगलोरपेक्षा मोठे टेक्स्टाईल पार्क होण्याची क्षमता आहे, मात्र १५ वर्षे होऊनही अक्कलकोट एमआयडीसी आणि कुंभारी येथे मूलभूत सोयीसुविधा आपण देऊ शकलेलो नाही.

९. पर्यटन आणि विरंगुळ्याचा अभाव
बाहेरून आलेल्या पाहुण्यांना दाखवण्यासाठी शहरात एकही मोठे उद्यान, मैदान किंवा ॲडव्हेंचर पार्क नाही. शहराच्या सौंदर्यीकरणाकडे पूर्णपणे दुर्लक्ष झाले आहे.

१०. हद्दवाढ भागावर अन्याय
सर्वात जास्त कर भरणाऱ्या जुळे सोलापूर आणि हद्दवाढ भागासाठी स्वतंत्र प्राधिकरणाची गरज आहे. मुलींचे आयटी भवन आणि उद्योग भवन या इमारती बांधून १० वर्षे झाली, पण त्या आता धुळ खात पडून असून पडण्याच्या स्थितीत आल्या आहेत.

११. सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर
वाढती लोकसंख्या आणि सण-उत्सवांची संख्या पाहता शहरात किमान ६ ते ८ नवीन पोलीस चौक्या आणि एक स्वतंत्र परिमंडळ स्थापन करण्याची गरज आहे, मात्र प्रशासनाला याचे गांभीर्य नाही.

“सोलापूरची जनता सकारात्मक आहे, येणारी पिढी सोलापूर सोडून बाहेर जाणार नाही आणि इतर राज्यातील तरुण सोलापूरला रोजगारासाठी येतील, असे सोलापूर घडवण्यासाठी आमचा लढा सुरूच राहील.”
— मिलिंद भोसले, सामाजिक कार्यकर्ते

Join WhatsApp

Join Now

Subscribe Youtube Channel

Join Now