Mahesh Kothe NCP Solapur Nidhan
प्रयागराज येथे कुंभमेळ्यात गेल्यानंतर हृदयविकाराचा झटका
सोलापूर : माजी महापौर, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे ज्येष्ठ नेते महेश अण्णा कोठे यांचे हृदयविकाराचे झटक्याने निधन झाले. प्रयागराज या ठिकाणी कुंभमेळ्यासाठी गेल्यानंतर महेश अण्णा यांना हृदयविकाराचा झटका आल्याचे सांगण्यात येत आहे.
आमदार होण्याचे आणि सोलापुरात आयटी पार्क उभारण्याचे महेश अण्णा कोठे यांचे स्वप्न अधुरे राहिले आहे. ज्येष्ठ नेते स्वर्गीय विष्णुपंत कोठे यांच्यानंतर महेश कोठे यांनी सोलापुरात आपला राजकीय दबदबा निर्माण केला होता. गेल्या अनेक वर्षापासून सोलापूर महानगरपालिकेमध्ये त्यांनी नगरसेवक आणि पदाधिकारी म्हणून आपली ओळख निर्माण केली होती. अनेक निवडणुका महेश कोठे यांच्या नेतृत्वाखालीच लढल्या गेल्या. ज्येष्ठ नेते, माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या नेतृत्वाखाली आधी काँग्रेसमध्ये त्यानंतर उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेत आणि मग त्यानंतर सध्या ते शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये कार्यरत होते.
आमदार होण्यासाठी त्यांनी बरेच प्रयत्न केले होते. मात्र त्यांना यश आले नाही. प्रयागराज या ठिकाणी भरलेल्या कुंभमेळ्यासाठी ते मित्र परिवारासह गेले होते. कुंभमेळा येथे गेल्यानंतर त्यांना आज सकाळी आंघोळ करताना हृदयविकाराचा झटका आल्याची माहिती समोर आली आहे.