एम राजकुमार नवे पोलीस आयुक्त; राजेंद्र मानेंची बदली
सोलापूर : सोलापूरचे पोलीस आयुक्त राजेंद्र माने यांची नाशिक येथे पोलीस अकादमीमध्ये सहसंचालक पदावर बदली झाली आहे. त्यांच्या जागी सोलापूरचे नवे पोलीस आयुक्त म्हणून एम. राजकुमार येणार आहेत.
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्याच्या गृह विभागाने राज्यातील 42 वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या आहेत. त्यामध्ये काही अधिकाऱ्यांना पदोन्नती मिळाली आहे. मागील काही दिवसांपासून पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या जात आहेत.
या बदल्यांमध्ये सोलापूरचे पोलीस आयुक्त राजेंद्र माने यांची बदली झाली असून त्यांना सहसंचालक महाराष्ट्र पोलीस अकॅडमी नाशिक या ठिकाणी नियुक्ती देण्यात आले आहे. त्यांच्या जागेवर जळगाव जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक एम राजकुमार यांना पदोन्नतीने सोलापूरच्या पोलीस आयुक्त पदी नियुक्ती मिळाली आहे.
यापूर्वी राजेंद्र माने यांनी सोलापुरात पोलीस उपायुक्त म्हणून काम केले होते. त्यामुळे पोलीस आयुक्त म्हणून राजेंद्र माने हे स्मरणात राहणारी कामगिरी करतील अशी अपेक्षा होती मात्र तसे दिसून आले नाही. राजेंद्र माने यांच्या काळात सोलापुरात अवैध धंदे मोठ्या प्रमाणात वाढल्याचे दिसून आले. आता नवीन पोलीस आयुक्त एम राजकुमार हे अवैध धंदे आणि गुन्हेगारी नियंत्रणासाठी काय भूमिका घेतात हे पाहावे लागेल.
कोण आहेत एम. राजकुमार?
सोलापूरचे पोलीस आयुक्त म्हणून येणारे एम राजकुमार हे यापूर्वी नागपूर शहर येथे उपायुक्त म्हणून तसेच पोलीस अधीक्षक म्हणून कार्यरत होते. तसेच त्यांनी यवतमाळ येथे अप्पर पोलीस अधीक्षक म्हणून कामकाज केले आहे. ते 2010 च्या बॅचचे आयपीएस अधिकारी आहेत.