‘थर्टी फर्स्ट’चा काय प्लॅन? चौकाचौकात असतील पोलीस!
सोलापूर : थर्टी फर्स्टच्या निमित्ताने मित्रांसोबत फॅमिलीसोबत काही प्लॅन बनवत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. सोलापूर शहर पोलिसांकडून थर्टी फर्स्टच्या रात्री बंदोबस्त असेल. प्रमुख ठिकाणी नाकाबंदी असेल.
दिनांक ३१/१२/२०२३ या कॅलेन्डर वर्षाचा शेवटचा दिवस असून मध्यरात्री 12 वा नंतर सन २०२४ या नवीन वर्षास सुरूवात होणार आहे. यानिमित्त रात्रीच्या वेळी लोक विशेषतः तरुण-तरूणी मोठ्या प्रमाणात सहभागी होवून नूतन वर्षाच्या अनुषंगाने स्वागत कार्यक्रमाचे आयोजन करतात. उत्साहामध्ये तरूण मुले मुली रस्त्यावर रात्रीच्या वेळी पायी, मोटार वाहनावर फिरतात.
नववर्षाचे स्वागत करणाऱ्या अतिउत्साही लोकांमुळे व वेगाने वाहन चालविण्णाऱ्या लोकांकडून अपघात होऊ शकतात. तसेच दारू पिवून गाडी चालवू नये, ट्रीपल सिट घेवून आरडाओरडा करत मोटर सायकल चालवू नये. ध्वनी प्रदुषण होईल असे कृत्य कोणी करू नये, मोटर सायकलचे सायलेन्सर काढून गाडी कोणीही चालवू नये, महिलांची छेडछाड करणारे कृत्य कोणी करू नये, बिभत्स वर्तन कोणी करणार नाही, असे करताना आढळून आल्यास पोलीस प्रशासन संबधितावर योग्य ती कारवाई करेल. तसेच ब्रिथ ॲनालायझरव्दारे वाहन धारकांची तपासणी केली जाणार आहे.
पोलीस प्रशासनाकडून ध्वनीमापक तपासणी करण्याकरीता पथक नेमण्यात आले आहे. रस्त्यावर महिलांच्या सुरक्षतेसाठी महिला गस्ती पथक, दामिनी पथक नेमण्यात आले आहे. सोलापूर शहरात रहदारीवर नियंत्रण करण्यासाठी ठिकठिकाणी बॅरीकेटीगची व्यवस्था करण्यात आली आहे. शहरात चैन स्नॅचिग व महिला सुरक्षितता याकरीता गुन्हे शाखेचे पथक नेमण्यात आले आहे.
सोलापूर शहरात एकूण ७० स्टॅटिक पॉईट, तसेच १३ ठिकाणी नाकाबंदी व बॅरिकेट लावण्यात आली आहे. सोलापूर शहरात छत्रपती शिवाजी महाराज पुतळा, डॉ बाबासाहेब आंबेडकर पुतळा, सात रस्ता, नई जिंदगी या ठिकाणी स्ट्रायकिग फोर्स व दंगा नियंत्रण पथक नेमण्यात आले आहे.
तसेच आक्षेपार्ह मेसेजेस कोणीही व्हायरल करू नये यासाठी सोशल मिडीया सर्व्हेलन्स पथकाव्दारे निगराणी करण्यात येत आहे. अति उत्सहाच्या भरात कोणतेही अनुसुचित घटना घडून कायदा व सुव्यवस्था बिघडणार नाही यांची सर्वानी दक्षता घ्यावी.
पोलीस आयुक्त डॉ. राजेंद्र माने यांच्या नेतृत्वाखाली 3 पोलीस उपायुक्त, 6 सहायक आयुक्त, 22 पोलीस निरीक्षक, 46 सहाय्यक पोलीस निरीक्षक आणि पोलीस उपनिरीक्षक, 735 पोलीस अंमलदार असा मोठा बंदोबस्त असणार आहे. नागरिकांनी पोलिसांच्या सूचनांचे पालन करावे. थर्टी फर्स्ट च्या रात्री नियम मोडणाऱ्या वर कारवाई केली जाईल असे गुन्हे शाखेच्या पोलीस उपआयुक्त डॉ. दिपाली काळे यांनी सांगितले आहे.