Jain social group Solapur news
जैन सोशल ग्रुप आणि इनाली फाउंडेशनचा स्तुत्य उपक्रम
सोलापूर : सोलापूर येथील सम्राट चौक परिसरातील तेरापंथ भवन येथे आयोजित करण्यात आलेल्या मोफत शिबिरात ८१ दिव्यांगांना कृत्रिम इलेक्ट्रॉनिक हातांचे वाटप करण्यात आले. जैन सोशल ग्रुप्स इंटरनॅशनल फेडरेशन महाराष्ट्र रिजन आणि इनाली फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या शिबिरामुळे अनेक दिव्यांगांच्या आयुष्यात स्वावलंबनाची नवी पहाट उजाडली आहे.
४ तासांत बदलले आयुष्य
या शिबिराचे वैशिष्ट्य म्हणजे अवघ्या चार तासांच्या कालावधीत सुमारे १०० हून अधिक नोंदणीकृत लाभार्थ्यांपैकी ८१ जणांना प्रत्यक्ष हातांचे फिटिंग करून देण्यात आले. हे कृत्रिम हात बसवल्यानंतर महिलांनी लगेचच भाजी चिरणे, लिहिणे यांसारखी दैनंदिन कामे करण्यास सुरुवात केली. यावेळी लाभार्थ्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद ओसंडून वाहत होता.

असे कार्य करतात हे ‘इलेक्ट्रॉनिक हात’
या कृत्रिम हातांची रचना अत्यंत साधी आणि सोयीस्कर आहे
– यामध्ये बॅटरी बसवलेली असते.
– हालचालींसाठी दोन बटणे दिलेली आहेत; एका बटणाने पंजा उघडतो तर दुसऱ्याने वस्तू घट्ट पकडली जाते.
– हे हात वजनाने हलके आणि लावायला अतिशय सोपे आहेत.
भावूक क्षण: पप्पांचे दोन्ही हात पाहून चिमुर्डी हसली
शिबिरात अनेक हृदयस्पर्शी प्रसंग पाहायला मिळाले. धनंजय गायकवाड या व्यक्तीने होर्डिंग लावताना अपघातात दोन्ही हात गमावले होते. या शिबिरात त्यांना दोन्ही हात मिळाले, तेव्हा त्यांच्या मुलीच्या चेहऱ्यावर हसू उमटले. तसेच, जन्मताच डावा हात नसलेल्या ऋतुजा काकडी यांनी हात मिळाल्यावर लगेचच काकडी चिरून दाखवली आणि आपल्या पतीला “आता डबा करून देते, मग कामाला जा” असे विश्वासाने सांगितले.
मान्यवरांची उपस्थिती
या शिबिराचे उद्घाटन सोलापूर महानगरपालिकेच्या अतिरिक्त आयुक्त वीणा पवार यांच्या हस्ते झाले. यावेळी बोलताना त्या म्हणाल्या, “आजकाल सल्ले देणाऱ्यांची संख्या मोठी आहे, मात्र प्रत्यक्ष कृती करणारे फार कमी आहेत. जैन सोशल ग्रुपचे हे कार्य समाजासाठी प्रेरणादायी आहे.”
याप्रसंगी कनुभाई शाह, चेतन सुराणा, गौतम छाजेड, उमेश कर्नवट, अभिषेक खंगरे, परिमल भंडारी यांसह अनेक मान्यवर आणि पदाधिकारी उपस्थित होते.
पुढील शिबिर पुण्यात
ज्या दिव्यांगांना या शिबिराचा लाभ घेता आला नाही, त्यांच्यासाठी २९ मार्च रोजी पुणे येथे पुढील शिबिराचे आयोजन करण्यात येणार असल्याची माहिती संयोजकांनी दिली आहे.









