Anjali Nannajkar Produces Marathi Film Lagna Aani Barach Kahi
‘लग्न आणि बरंच काही’ चित्रपटातून अंजली तुषार नान्नजकर यांची निर्मिती क्षेत्रात एन्ट्री!
परशुराम कोकणे
सोलापूर (स्मार्ट सोलापूरकर डिजिटल मीडिया) : केवळ महाराष्ट्रातच नव्हे, तर दुबई आणि लंडनसारख्या आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत आपल्या व्यवसायाचा ठसा उमटवणाऱ्या सोलापूरच्या कन्या अंजली तुषार नान्नजकर यांनी आता मराठी चित्रपट निर्मिती क्षेत्रात पाऊल ठेवले आहे. संपूर्णपणे महिलांच्या कुशल नेतृत्वाखाली आणि तंत्रज्ञांच्या सहभागाने साकारल्या जाणाऱ्या ‘लग्न आणि बरंच काही’ या चित्रपटाची निर्मिती करून त्यांनी कलाविश्वात एक नवा आदर्श निर्माण केला आहे.
आंतरराष्ट्रीय फॅशन उद्योगातून चित्रपट निर्मितीकडे प्रवास
अंजली तुषार नान्नजकर या गेल्या अनेक वर्षांपासून दुबई आणि लंडनमध्ये पारंपरिक व एथनिक फॅशनचा (Traditional & Ethnic Fashion) यशस्वी व्यवसाय चालवत आहेत. व्यवसायाच्या या यशानंतर आपल्यातील कलागुणांची आवड जोपासण्यासाठी त्यांनी ‘अव्यान आर्ट्स’ (Avyaan Arts) या निर्मिती संस्थेची स्थापना केली. व्यवसाय आणि कलेचा सुरेख संगम साधत, ‘अव्यान आर्ट्स’च्या बॅनरखाली त्यांनी आपला पहिला मराठी चित्रपट ‘लग्न आणि बरंच काही’ प्रेक्षकांच्या भेटीस आणला आहे. या चित्रपटाची सहनिर्मिती ‘म्हाळसा एंटरटेनमेंट’च्या डॉ. संजना सुरेश पै यांनी केली आहे.
स्त्रीशक्तीचा गौरव; संपूर्ण महिलांची टीम
मराठी चित्रपटसृष्टीच्या इतिहासात हा चित्रपट एक अत्यंत आगळावेगळा आणि ऐतिहासिक टप्पा ठरत आहे. चित्रपटाची संपूर्ण धुरा महिलांच्या हाती असून दिग्दर्शन, कथा, संवाद, छायाचित्रण, संकलन ते अगदी वेशभूषा आणि डिजिटल मार्केटिंगपर्यंतचे सर्व टप्पे महिला तंत्रज्ञांनी लीलया पेलले आहेत.
निर्मिती : अंजली तुषार नान्नजकर व डॉ. संजना सुरेश पै
दिग्दर्शन : वेदांती चंद्रकांत दाणी
छायाचित्रण (Cinematography): स्मिता निर्मळ
संगीत : वैशाली सामंत
कथा व संवाद : यशश्री मसूरकर व शर्वरी पेठकर
संकलन : भक्ती मायाळू
कलाकार : पूजा सावंत, अक्षया नाईक, सुकन्या गुरव, भारती पाटील आणि अभिजीत खांडकेकर.
काय आहे चित्रपटाची संकल्पना?
बदलत्या काळातील नातेसंबंध, करिअर आणि संसारातील समतोल यावर हा चित्रपट संवेदनशील भाष्य करतो. आयआयएम (IIM) सारख्या नामांकित संस्थेतून उच्चशिक्षण घेतलेली, स्वाभिमानी मुलगी ‘पल्लवी’ आणि पारंपरिक विचारसरणीत वाढलेला ‘अनिरुद्ध’ यांच्या नात्यातील भावनिक चढउतार व आधुनिक पिढीच्या लग्नाची चौकट या चित्रपटातून मांडण्यात आली आहे.
सोलापूरच्या मातीशी नाळ जोडलेल्या अंजली तुषार नान्नजकर यांनी आंतरराष्ट्रीय स्तरावर उद्योजक म्हणून नाव कमावल्यानंतर, आता मराठी चित्रपटसृष्टीत दर्जेदार विषयाची निर्मिती करून सोलापूरचा लौकिक पुन्हा एकदा वाढवला आहे.
महिला कोणत्याही क्षेत्रात मागे नाहीत : निर्मात्या अंजली नान्नजकर
आपल्या या नव्या प्रवासाविषयी आणि चित्रपट निर्मितीबद्दल बोलताना निर्मात्या अंजली म्हणाल्या,
“महिला आज कोणत्याही क्षेत्रात मागे नाहीत, मग चित्रपट क्षेत्रात तरी का बरं मागे राहायचे? सर्व सखींना सोबत घेऊन मी हा चित्रपट निर्मित केल्याचा मला मनस्वी अभिमान आहे. सर्व मायबाप रसिकांनी हा चित्रपट पाहून आम्हाला भरभरून प्रोत्साहन द्यावे.”











