Eco Friendly Club Solapur Vasota Trek Satara Tour News

सोलापूर : निसर्ग पर्यटन वाढावे यासाठी प्रयत्नशील असलेल्या इको फ्रेंडली क्लबच्यावतीने (Eco Friendly Club) वासोटा जंगल ट्रेकिंग (Vasota Junle Trek) तसेच सातारा येथील छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालय आणि संगम माहुली देवस्थान भटकंतीचे आयोजन करण्यात आले होते.
निसर्गसंपन्न अशा कोयना परिसरातील शिवसागर जलाशय (Shivsagar) आणि वासोटा परिसरात भटकंतीने सर्वजण आनंदून गेले. या उपक्रमात जवळपास 40 + निसर्गप्रेमी सहभागी झाले होते. 20 फेब्रुवारी रोजी सर्व निसर्गप्रेमी चडचणकर ट्रॅव्हल्सच्या (Chadchankar Travels) लक्झरी बसमधुन सातारा येथील निसर्गरम्य अशा कोयना जलाशयाच्या दिशेने रवाना झाले.
21
फेब्रुवारी रोजी पहाटे सर्वजण सातारा जिल्ह्यातील जावळी तालुक्यातील मौजे शेंबडी या गावामधील किसन साळुंखे यांच्या आरोही टेन्ट हाऊस (Arohi Tent House) याठिकाणी पोचले. पहाटे लवकर सर्वांनी फ्रेश होऊन चहा – नाष्टा केला. सकाळच्या सोनेरी किरणात दिसणारा कोयना जलाशय आणि सह्याद्रीची डोंगररांग पाहून सर्वजण भारावून गेले. दोन्ही बाजूस असणारी सह्याद्रीची डोंगररांग आणि मध्ये असणाऱ्या शिवसागर जलाशयातून बोटिंग करत वासोटा किल्ल्याकडे सर्वांचा प्रवास सुरु झाला.
बोटीने प्रवास करत असताना उंचचउंच शिखरे आणि शिवसागर जलाशयाचे विस्तीर्ण रूप पाहात निसर्गाचे दर्शन केले. बोटिंग करत वासोटा येथील वनविभागाच्या सह्याद्री व्याघ्र राखीव येथील चेक पोस्टपर्यंत गाठले. वनविभागाच्या तपासणीनंतर घनदाट असलेल्या कोयना अभयारण्यातून (Koyana koyna Wildlife Sanctuary) वासोटा ट्रेक सुरु झाला.


सुमारे दीड ते दोन तास जंगलातून ट्रेकिंग करत सर्वजण वासोटा किल्ल्यावर पोचले. वासोटा किल्ल्यावर पोचल्यावर छत्रपती शिवाजी महाराज की जय…, भारत माता की जय.. या घोषणा देत आपला आनंद व्यक्त केला. त्यानंतर सर्वांनी सोबत आणलेला डबा खाल्ला.
दुपारच्या जेवणानंतर सर्वांनी वासोटा किल्ल्याची भटकंती केली. गडाच्या टोकावरून समोर दिसणारे शिवसागर जलाशयाचे विहंगम दृश्य व कोयनेचे अभयारण्य पाहताना सर्वांना आनंद झाला. किल्ल्यावर असलेले मारुती मंदिर, वाड्याचे अवशेष, महादेव मंदिर, नागेश्वर सुळक्याचे दर्शन व दूरवर पसरलेल्या डोंगर-दऱ्या पाहताना वेगळाच आनंद मिळाला.
संपूर्ण किल्ला फिरून झाल्यानंतर सुरक्षितपणे वासोटा किल्ला उतरून परत बोटीने परतीचा प्रवास सुरु झाला. सायंकाळी शिवसागर जलाशय परिसरात सर्वांनी सूर्यास्ताचा आनंद घेतला. रात्री जेवणानंतर शिवसागर जलाशयाच्या शेजारी मस्त गाण्याची मैफिल रंगली, सोबतच शेकोटी आणि डान्सही झाला. 22 फेब्रुवारी रोजी सकाळी चहा नाष्टा झाल्यानंतर इको फ्रेंडली क्लबच्या सदस्यांनी आरोही टेन्ट हाऊसचा निरोप घेतला.
त्यानंतर शेंबडी गावातील दत्त मंदिरास भेट दिली. गुहेतील शिवलिंग, महादेवाची भव्यमूर्ती पाहून सारेच नतमस्तक झाले. पुन्हा बसने प्रवास करत इको फ्रेंडली क्लबच्या टीमने सातारा गाठले. दुपारच्या जेवणासाठी साताऱ्यातील प्रसिद्ध सुपनेकर भोजन या ठिकाणी ब्रेक घेतला. सात्विक जेवणावर सर्वांनी मस्त ताव मारला.
दुपारच्या जेवणानंतर सातारा येथील छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालय पाहण्यासाठी टीम रवाना झाली. इतिहास संशोधक घनश्याम ढाणे यांनी संग्रहालयातील जुनी शस्त्रे, नाणी आणि गडकिल्ल्यांच्या प्रतिकृतीची माहिती दिली.
सायंकाळच्या सुमारास सातारा परिसरातील श्री क्षेत्र संगम माहुली या ठिकाणी भेट दिली. दक्षिण काशी म्हणून या परिसराची ओळख आहे. महत्वाचे म्हणजे या परिसरात छत्रपती संभाजी महाराजांचे पुत्र आणि छत्रपती शिवाजी महाराजांचे नातू थोरले शाहू महाराज यांची मुख्य समाधी आहे. इतिहास संशोधक घनश्याम ढाणे यांनी सर्व इतिहास सांगितला.
श्री क्षेत्र संगम माहुली येथून इको फ्रेंडली क्लबचे सदस्य गोंदवले येथे पोहोचले. हॉटेल विराट येथे सर्वांनी रात्रीचे जेवण केले. ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज मठातील दर्शनानंतर बस सोलापूरच्या दिशेने निघाली.


इको फ्रेंडली क्लबचे संस्थापक, वसुंधरा मित्र परशुराम कोकणे, समन्वयक सटवाजी (अजित) कोकणे, संतोष तडवळ यांच्या नेतृत्वाखाली आयोजित या निसर्ग भ्रमंतीमध्ये विजयकुमार बुद्धे, प्रा. भीमगोंडा पाटील, सचिन सर्जेराव बिचितकर, अश्विनी सचिन बिचितकर, प्रा. वसंत महादेव गायकवाड, राहुल जगताप, सोनाली जगताप, डॉ. गिरिजा संतोष स्वामी, डॉ. संतोष मल्लिनाथ स्वामी, डॉ. मेघा वानरोटे, प्रा. शर्मिला करपे, अश्विनी हरिदास रोकडे, संध्या व्यंकटेश कुलकर्णी, कु. अनाया संतोष स्वामी, कु. निर्मिती संतोष स्वामी, डॉ. स्नेहा देशमुख, अद्विक पाटील, प्रणिता गणेश केत, गणेश सांदिपान केत, प्रा. सुबोध कोळी, अश्विनी सुबोध कोळी, डॉ. मानसी महेश कुलकर्णी, डॉ. हर्षा शंकर गंभिरे, स्वाती शरद कुलकर्णी, ज्योती बसवराज पाटील, गौरव जाधव, स्वरा सुबोध कोळी, चेतन ताटे, श्रुती ताटे, गंगुबाई कोकणे, शशिकला गायकवाड, रितिका अमर लांडे, राजश्री सुतार, अनुषा अतुल नारकर, आकांक्षा राजेश वाघमोडे, आदित्य पावडशेट्टी, किरण देडे आणि प्रथमेश जवंजाळ आदी सदस्य सहभागी झाले होते.
छोट्या ट्रेकर्सचा उत्साही सहभाग
वासोटा जंगल ट्रेकमध्ये सर्व वयोगटातील निसर्गप्रेमी सहभागी झाले होते. ज्येष्ठ सदस्य विजयकुमार बुद्धे यांनी हार न मानता वासोटा किल्ल्याची चढाई केली. सर्वात महत्त्वाचे म्हणजे छोटी ट्रेकर कु. निर्मिती स्वामी, कु. स्वरा कोळी, अद्विक पाटील, कु. अनया स्वामी, कु. रितिका लांडे यांनी उत्साहाने ट्रेक करून आपला जोश दाखवून दिला.
अपर पोलीस अधीक्षक डॉ. वैशाली कडुकर यांची भेट
वासोटा जंगल ट्रेक आणि सातारा भटकंतीसाठी गेल्यानंतर इको फ्रेंडली क्लबच्या सदस्यांनी सातारा जिल्ह्याच्या अपर पोलीस अधीक्षक डॉ. वैशाली कडुकर यांची भेट घेतली. डॉ. कडूकर मॅडम पूर्वी सोलापुरात पोलीस उपायुक्त पदावर तसेच पोलीस प्रशिक्षण केंद्रात प्राचार्य पदावर कार्यरत होत्या. इको फ्रेंडली क्लबच्या पर्यावरण संवर्धन चळवळीला डॉ. वैशाली कडूकर यांचे प्रोत्साहन मिळत आले आहे. जुन्या आठवणींना उजाळा देत अपर पोलिस अधीक्षक डॉ वैशाली कडूकर यांनी सर्व ट्रेकर्सचे कौतुक केले.











