आमदाराला गोळी घाल, तुला पैसे देतो!
सोलापूर (स्मार्ट सोलापूरकर डिजिटल मीडिया) : सोलापूर शहरातील महावीर चौक परिसरात अक्कलकोटचे आमदार सचिन कल्याणशेट्टी यांच्या कार्यकर्त्याला पैशांचे आमिष दाखवून आमदारांना गोळी घालून जीवे मारण्यासाठी प्रवृत्त केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. याप्रकरणी सोलापूर शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सदर बझार पोलीस ठाण्यात दोन जणांविरुद्ध गंभीर स्वरूपाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

प्युमा शोरूमबाहेर घडला प्रकार
पोलीस ठाण्यात नोंदवलेल्या हकीकतीनुसार, ७ ऑगस्ट २०२६ रोजी दुपारी १५:४५ वाजेच्या सुमारास फिर्यादी आनंद स्वामीराव सुरवसे (रा. मु.पो. मोट्याळ, ता. अक्कलकोट, जि. सोलापूर) हे अक्कलकोटचे आमदार श्री कल्याणशेट्टी यांच्या पत्नी आणि मुलाला खरेदीसाठी महावीर चौक येथील ‘प्युमा’ (Puma) शोरूममध्ये घेऊन आले होते. फिर्यादी हे शोरूमच्या बाहेर थांबलेले असताना दोन आरोपी तेथे आले.
‘तुझ्या दादा आमदाराला गोळी घाल, मी बघतो’
शोरूमबाहेर आरोपींनी फिर्यादी आनंद सुरवसे यांच्याजवळ जाऊन धक्कादायक विधान केले. आरोपी क्रमांक १ श्रीशैल हुळ्ळी याने फिर्यादीस म्हटले, “तुला पैसे देतो, तुझ्या दादा आमदाराला गोळी घालून मार, मी पुढचे बघतो.”
त्याच वेळी त्याच्यासोबत असलेल्या आरोपी क्रमांक २ पुलारी याने फिर्यादीस सांगत म्हटले, “तुला साहेब काय म्हणतात ते नीट ऐक, त्यात तुझा फायदा आहे.” असे म्हणून दोघा आरोपींनी फिर्यादीस मोठ्या रकमेचे आमिष दाखवून आमदारांना गोळ्या घालून जीवे मारण्यासाठी थेट प्रवृत्त (सुपारी देण्याचा प्रयत्न) केले.
सदर बझार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
या धक्कादायक प्रकारानंतर फिर्यादी आनंद सुरवसे यांनी ९ ऑगस्ट २०२६ रोजी सायंकाळी १७:१७ वाजता सदर बझार पोलीस ठाणे गाठून फिर्याद दिली. त्यावरून आरोपी श्रीशैल हुळ्ळी आणि पुलारी (दोघे रा. सोलापूर) यांच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) कलम ५५ आणि ३(५) अन्वये गुन्हा (गु.र.नं. ६५४/२०२६) दाखल करण्यात आला आहे.
आमदारांना जीवे मारण्याच्या या थेट आमिषामागे नेमका काय हेतू होता आणि त्यामागे आणखी कोणाचा हात आहे का, याचा सखोल तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक (सपोनि) सावंत करत आहेत.







