सोलापूर (स्मार्ट सोलापूरकर डिजिटल मीडिया) : लग्नाचे आमिष दाखवून तरुणांची आर्थिक फसवणूक करणाऱ्या आणि घरातून रोख रक्कम व सोन्याचे दागिने घेऊन पोबारा करणाऱ्या एका आंतरजिल्हा बोगस मॅट्रिमोनी टोळीचा विजापूर नाका पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. या प्रकरणी पोलिसांनी चार वेगवेगळी पथके तयार करून पुणे, जालना आणि सोलापूर जिल्ह्यातून आरोपींना ताब्यात घेतले असून त्यांच्याकडून गुन्ह्याशी संबंधित मुद्देमाल हस्तगत केला आहे.
बोगस लग्न लावून उकळली २.१७ लाखांची एजंट फी
विजापूर नाका पोलीस ठाण्यात नोंदवलेल्या फिर्यादीनुसार, सैफुल (विजापूर रोड, सोलापूर) येथील गुरुदत्त नगरमध्ये राहणारे सुरज संजय पवार (वय ३१, व्यवसाय: ड्रायव्हर) यांना लग्नाचे आमिष दाखवण्यात आले होते. १८ ऑगस्ट २०२६ ते ३१ ऑगस्ट २०२६ या कालावधीत एजंट ज्योती धनंजय लोंढे, एजंट सचिन शिंदे, योगिता दत्तात्रय सूर्यवंशी, सुनिता सुनील दाभाडे, दत्तात्रय सूर्यवंशी आणि कैलास शिंदे यांनी आपापसात संगनमत करून कट रचला.
फिर्यादी सुरज पवार यांचा विश्वास संपादन करून त्यांचे लग्न योगिता दत्तात्रय सूर्यवंशी हिच्याशी लावून देण्याचे ठरवले. लग्नाचा बनाव रचून आरोपींनी फिर्यादीकडून वेळोवेळी एजंट फी म्हणून तब्बल २ लाख १७ हजार ५०० रुपये उकळले.
धार्मिक कारणांचा बहाणा आणि घरातून दागिने, रोख रकमेसह पोबारा
लग्नानंतर योगिता सूर्यवंशी ही फिर्यादी सुरज पवार यांच्या घरी राहण्यास आली. घरी आल्यानंतर तिने ‘मासिक पाळी आली आहे’ तसेच ‘धार्मिक कार्यक्रम पूर्ण झाल्याशिवाय एकत्र यायचे नाही’ अशी वेगवेगळी कारणे सांगून फिर्यादीपासून अंतर ठेवले. या काळात तिने घरातील कपाटातील रोख रक्कम आणि सोन्याच्या दागिन्यांची संपूर्ण माहिती मिळवून घेतली.
दरम्यान, फिर्यादी सुरज पवार हे आपल्या बहिणीला सोडण्यासाठी पंढरपूरला गेले असता, संधी साधून योगिता सूर्यवंशी हिने घरातील रोख १ लाख रुपये, फिर्यादीने लग्नात घातलेले दागिने आणि त्यांच्या आईचे दागिने असा एकूण दीड तोळे सोन्याचा ऐवज घेऊन घरातून पळ काढला.
पुणे, जालना आणि सोलापुरात छापे; टोळी गजाआड
फसवणूक झाल्याचे लक्षात येताच फिर्यादीने विजापूर नाका पोलीस ठाण्यात धाव घेतली. त्यानुसार २३ ऑक्टोबर २०२६ रोजी ६ आरोपींविरुद्ध भा.न्या.सं. (BNS) कलम ३१८(२), ३१८(४), ३१६(२) आणि ६१(२)(अ) अन्वये गुन्हा (गु.र.नं. ५४८/२०२६) दाखल करण्यात आला.
गुन्ह्याचे गांभीर्य ओळखून तपास अधिकारी पोलीस उपनिरीक्षक संतोष काजळे व पथकाने तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे तपास चक्र वेगवान केले. पोलिसांची चार स्वतंत्र पथके तयार करून पुणे, जालना आणि सोलापूर जिल्ह्यात एकाच वेळी छापे टाकण्यात आले आणि आरोपींना ताब्यात घेण्यात आले. आरोपींकडून गुन्ह्यातील मुद्देमालही हस्तगत करण्यात आला आहे. हे बोगस मॅट्रिमोनी रॅकेट आंतरजिल्हा पातळीवर कार्यरत असून, आरोपींनी अशाच प्रकारे आणखी किती तरुणांना गंडा घातला आहे, याचा सखोल तपास पोलीस करत आहेत.
कारवाई करणारे पोलीस पथक
सदरची कामगिरी सोलापूर शहर पोलीस आयुक्त एम. राजकुमार, पोलीस उपायुक्त (परिमंडळ) प्रितम यावलकर, सहाय्यक पोलीस आयुक्त (विभाग-२) श्रीमती विजयालक्ष्मी कुर्री यांच्या मार्गदर्शनाखाली विजापूर नाका पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुहास चव्हाण, पोलीस निरीक्षक (गुन्हे) सुशांत वराळे, सपोनि शितलकुमार गायकवाड, तपास अधिकारी पोउपनि संतोष काजळे, सफौ आप्पा पवार, मपोहेकॉ रश्मी जाधव, पोहेकॉ गणेश शिर्के, पोकॉ सनी राठोड, श्रीरंग काशीद, रमेश कोर्सेगांव, राजु पवार, संतोष चानकोटी आणि मपोकॉ स्वाती भोसले यांनी केली आहे.










