मनोरंजन

प्रति भीमसेन पं. हरिश तिवारींचे पहिल्यांदाच सोलापुरात गायन

• दि १० आणि ११ फेब्रुवारी रोजी प्रिसिजन संगीत महोत्सव
• प्रति भीमसेन म्हणून ओळखले जाणारे पं. हरिश तिवारी यांचे पहिल्यांदाच सोलापुरात शास्त्रीय गायन
• अनुपम जोशी यांचे सरोद वादन.
• तेजस विंचुरकर यांचे बासरीवादन तर त्यांच्या पत्नी मिताली विंचूरकर यांची तबला साथ
• किराणा घराण्याचे पं. कैवल्यकुमार गुरव यांचे शास्त्रीय गायन

HTML img Tag Simply Easy Learning

सोलापूर : प्रिसिजन फाऊंडेशनच्या वतीने येत्या १० आणि ११ फेब्रुवारी २०२४ रोजी ’प्रिसिजन संगीत महोत्सवा’ चे आयोजन करण्यात आले आहे. महोत्सवाचे यंदा नववे वर्ष असून हुतात्मा स्मृति मंदिर येथे हा महोत्सव पार पडेल, अशी माहिती प्रिसिजन फाऊंडेशनच्या अध्यक्षा डॉ. सुहासिनी शहा यांनी आज पत्रकार परिषदेत दिली. यावेळी प्रिसिजन कॅमशाफ्ट्स लिमिटेडचे चेअरमन श्री.यतिन शहा उपस्थित होते.
प्रिसिजन संगीत महोत्सवाविषयी अधिक माहिती देताना डॉ. सुहासिनी शहा म्हणाल्या, या महोत्सवाच्या पहिल्या दिवशी म्हणजे शनिवार दि.१० फेब्रुवारी रोजी पहिल्या सत्रात अनुपम जोशी यांच्या सरोद वादनाचा अनुभव रसिकांना घेता येईल त्यांना शंतनु देशमुख हे तबल्याची साथ देतील. दुसऱ्या सत्रात किराणा घराण्याचे ज्येष्ठ गाणक पं. हरिश तिवारी यांचे शास्त्रीय गायन होईल त्यांना हार्मोनियमवर सुयोग कुंडलकर तर रोहित मुजुमदार तबल्यावर साथसंगत करतील.
महोत्सवाच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे रविवार दि.११ फेब्रुवारी रोजी पहिल्या सत्रात युवा कलाकार तेजस विंचुरकर यांचे बासरी वादन होईल. तर त्यांच्या पत्नी मिताली विंचुरकर त्यांना तबला साथ करतील. प्रिसिजन संगीत महोत्सवात पहिल्यांदाच पती – पत्नी एकत्र सादरीकरण करणार आहेत. अंतिम सत्रात किराणा घराण्याचे पं. कैवल्यकुमार गुरव यांचे शास्त्रीय गायन सादर होईल त्यांना तबल्यावर प्रशांत पांडव आणि हार्मोनियवर स्वरूप दिवाण हे साथ करतील.

HTML img Tag Simply Easy Learning

आपल्याकडे हिंदुस्थानी शास्त्रीय संगीताची दीर्घ परंपरा आहे. शास्त्रीय संगीत आणि कलांचा प्रचार, प्रसार, मोठ्या संख्येने प्रेक्षक मिळवणे आणि श्रोत्यांची गोडी वाढवणे या उद्देशाने “प्रिसिजन संगीत महोत्सव” सुरू झाला आहे. सोलापूरात पूर्णपणे शास्त्रीय संगीताला समर्पित महोत्सव व्हावा या उद्देशाने प्रिसिजन फाउंडेशन मागील ८ वर्षापासून प्रयत्नशील आहे. आता प्रिसिजन संगीत महोत्सव ही सोलापूर शहराची ओळख बनली आहे.
सोलापूरकरांना या महोत्सवाचा आनंद निःशुल्क घेता येईल. निःशुल्क प्रवेशिका (फ्री पासेस) मंगळवार दि. ०६ फेब्रुवारी पासून हुतात्मा स्मृति मंदिरात सकाळी ९ ते १२ आणि संध्याकाळी ५ ते ९ या वेळात उपलब्ध होतील. त्यासाठी गुरू वठारे – मोबा. 9422066213 यांच्याशी संपर्क साधावा. तसेच रसिकांनी आपले नाव नोंदवून प्रवेशिका घ्याव्यात. प्रथम येणाऱ्यास पर्थम प्राधान्य या तत्वावर बसण्याची सोय आहे, अशी माहिती डॉ. सुहासिनी शहा यांनी दिली.
प्रिसिजनच्या प्रथेप्रमाणे दोन्ही दिवस सायंकाळी ठीक ६.२५ वाजता कार्यक्रम सुरू होईल .रसिकश्रोत्यांनी वेळेपूर्वीच उपस्थित राहून जागतिक पातळीवरील या कलावंतांच्या स्वराविष्काराचा आनंद घ्यावा, असे आवाहन डॉ. सुहासिनी शहा यांनी केले.

कलाकारांचा परिचय
1) अनुपम जोशी:-
अनुपम जोशी हे सरोद वादनातील सेनिया मैयहार घराण्याचे तरुण सरोद वादक आहेत. घरामध्ये संगीताची कोणतीही पार्श्वभूमी नसताना अनुपम जोशी यांनी वयाच्या ९ व्या वर्षी पंडित स्वतंत्र कुमार सविता यांच्या हाताखाली तबला शिकण्याच्या निमित्ताने जबलपूरमध्ये संगीताची सुरुवात केली. एकदा पारंपारिक सूफी गायक नुसरत फतेह अली खान यांची कव्वालह ऐकल्यापासून गायनाकडे ओढा वाढला. पण वयाच्या १३ व्या वर्षी रेडिओवर उस्ताद अलि अकबर खानसाहेबांचं सरोद वादन ऐकून ते सरोदच्या प्रेमात पडले. शाळेत असेपर्यंत त्यांना सरोदसाठी गुरू भेटलाच नाही. नंतर मात्र पं. सुधीर फडके यांच्याकडे सरोद वादनाचे रितसर शिक्षण घेतले. पं. सुधीर फडके हे विदुषी अनुपमा देवी यांचे शिष्य होते. त्याचप्रमाणे केन झुकरमन, पं. सोहन नीलकंठ या अलि अकबर खानसाहेबांच्या शिष्यांकडून अनुपम यांनी सरोदचे कौशल्य प्राप्त केले.
सरोद वादनातील वैशिष्ट्यांमुळे संगीतातील काही महान कलाकारांसह अनेक देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय मैफिलीत त्यांच्या वादनाला स्थान मिळाले. त्यांच्या वादन शैलीमध्ये परंपरा आणि आधुनिकता यांचा सुरेल संगम दिसून येतो. बॉलिवूड, हॉलिवूड तसेच स्टोरी टेलर अशा अनेक प्लॅटफॉर्मवर त्यांनी सरोद वादन केले आहे.
प्रिसिजन संगीत महोत्सवात अनुपम जोशी यांना शंतनु देशमुख हे तबल्याची साथ करणार आहेत.
2) पं.हरिश तिवारी:- पंडित डॉ. हरीश तिवारी हे अतिशय कल्पक कलाकार आहेत. त्यांच्या गायनामध्ये भारतरत्न पं. भीमसेन जोशी यांची झलक दिसत असल्याने त्यांना प्रति भीमसेन म्हणून ओळखले जाते. पं. हरिश तिवारी यांना सांगीतिक परंपरा कशी जपावी हे माहीत आहे. अनन्यसाधारण मधुर आवाज असलेले हरीश तिवारी यांनी स्वतःला पूर्णपणे “स्वरसंगीतामध्ये विलीन करून घेतले आहे.
हरीश तिवारी हे मूळचे उत्तर प्रदेशातील देवरिया जिल्ह्यातले. गुरू ठाकूर चौबे यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी संगीतमय प्रवासाला सुरुवात केली. त्यांच्या अध्यापन प्रक्रियेमुळे प्रोत्साहित होऊन हरीश तिवारी यांनी कारकीर्द पुढे नेली आणि पंडित अजित भट्टाचार्य आणि पंडित नंदनजी यांच्याकडे ८ वर्षे गुरूकूल पद्धतीने राहून शिक्षण घेतले. पं. हरीश यांनी पौराणिक किराणा घराण्याचे भारतरत्न पं. भीमसेन जोशी यांच्या सहवासात राहून व्यावसायिक सादरीकरणासाठी “तान” रचना सूक्ष्म रितीने शिकून घेतली. पंडित हरीश तिवारी यांचे रागांचे सादरीकरण हे वेगवान तान, अचुक लय, सौंदर्यात्मक दृष्टिकोन आणि कल्पनारम्यतेने भरलेले असते. त्यांनी दिल्ली विद्यापीठातून पीएच.डी.ची पदवी प्राप्त केली आहे आणि सध्या ते दिल्ली विद्यापीठात सहाय्यक प्राध्यापक म्हणून स्वर संगीत विद्याशाखेचे सदस्य म्हणून कार्यरत आहेत.
पं.हरिश तिवारी यांनी अनेक संगीत महोतसवमध्ये आपली स्वरसाधना सादर केली आहे. तानसेन संगीत समरोह ग्वाल्हेर, पुणे येथील सवाई गंधर्व संगीत महोत्सव, सवाई गंधर्व पं.भीमसेन जोशी मोहोत्सव बेळगाव, राग दोपाहरी संगीत नाटक अकादमी दिल्ली, उस्ताद रजब अली, अमम अली संगीत समरोह देवास अशा ठिकाणी पंडित हरीश तिवारी यांनी शास्त्रीय गायनाचे कार्यक्रम केले आहेत.

3) तेजस विंचुरकर व मिताली विंचुरकर:-
तेजस विंचुरकर आणि मिताली विंचुरकर ही संगीत क्षेत्रातील उभरती जोडी आहे. तेजस हे बासरी वाजवतात आणि मिताली त्यांना तबल्यावर साथसंगत करतात. ही एक पती- पत्नीची संगीतमय जोडी आहे आणि त्यांच्या अद्भुत संगीतकारांच्या टीमसह त्यांना “तेजस आणि मिताली कलेक्टिव्ह” या नावाने ओळखले जाते.
तेजस विंचूरकर हे बॉलीवूड म्युझिक इंडस्ट्रीतील एक अतिशय लोकप्रिय बासरीवादक आहेत, मागील ७ वर्षांपासून बॉलीवूडमध्ये आपली कला सादर करीत आहे, आणि त्यांनी १०० हून अधिक बॉलीवूड आणि प्रादेशिक चित्रपटांसाठी बासरीवादन केले आहे. टी-सिरीज मिक्सटेप, एमटीव्ही अनप्लगड, इंडियन आयडॉल, झी सारेगम अशा बऱ्याच संगीतमय कार्यक्रमांचा तो एक अतिशय प्रसिद्ध चेहरा आहे.
मिताली या संगीत विश्वातील आणि सोशल मीडियावरील सर्वात ट्रेंडिंग महिला तबला वादकांपैकी एक आहेत. मिताली अनेक तालवाद्येही चांगल्या क्षमतेने वाजवतात. त्यांनीही टी-सीरीज मिक्सटेप आणि अनेक संगीत कार्यक्रमांमधील प्रसिद्ध तबला वादक आहे.
4) पंडित कैवल्य कुमार गुरव:- हिंदुस्तानी शास्त्रीय रागसंगीताचा मूळ गाभा तसाच ठेवून संगीत सादर करण्याच्या परंपरागत आणि वैविध्यपूर्ण पद्धतींमुळे या संगीतात काही घराणी निर्माण झाली आहेत. त्यांपैकी किराणा (मूळ नाव कैराना) हे एक प्रमुख घराणे आहे. पंडित कैवल्य कुमार हे भारतीय शास्त्रीय संगीतातील किराणा घराण्याचे (गायन शैली) तिसऱ्या पिढीतील गायक आहेत. कैवल्य कुमार हे संगीतकारांच्या कुटुंबातील आहेत. त्यांचे आजोबा पं. गणपतराव गुरव हे किराणा घराण्याचे संस्थापक उस्ताद अब्दुल करीम खान यांच्या पंक्तीचे पहिले भास्करबुवा बखले यांचे शिष्य होते. आजोबांच्या हातून प्रशिक्षण घेतलेले पं. संगमेश्वर गुरव हे खऱ्या किराणा घराण्याच्या परंपरेतील गायनासाठी ओळखले जात होते. त्यांच्या वडिलांनी तरुण गुरव यांना गायन कौशल्याने तयार केले, त्यांनी नंतर मराठी नाट्यसंगीतातून संगीत कारकीर्द सुरू केली आणि नंतर ख्याल गायनात प्रवेश केला.
करिअर
कैवल्यकुमार हे ऑल इंडिया रेडिओ आणि दूरदर्शन द्वारे सर्वोच्च श्रेणी मिळविणारे सर्वात तरुण हिंदुस्तानी शास्त्रीय गायक आहेत. कैवल्यकुमार यांनी युनायटेड स्टेट्स, युनायटेड किंगडम, फ्रान्स , कॅनडा , सिंगापूर , ऑस्ट्रेलिया , दुबई , मस्कत आणि कतार येथे कार्यक्रम सादर केले आहेत.

Related Articles

Back to top button