चंद्रकांतदादांवर शाई फेकणारा अजय तडीपार
सोलापूर : भीम आर्मी संघटनेचा जिल्हाध्यक्ष अजय संतोष मैंदर्गीकर (वय २६, रा. मातोश्री रमाबाई आंबेडकर नगर, सोलापूर) याच्यावर सोलापूर व धाराशिव जिल्ह्यामधून दोन वर्षांकरीता तडीपारची कारवाई करण्यात आली आहे. अजय याने भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते, पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील यांच्यावर शाईफेक केली होती. तसेच वेगवेगळी वक्तव्ये करून जातीय तेवढे निर्माण करण्याचा प्रयत्न केला होता.
अजय मैंदर्गीकर याच्याविरूध्द २०१९ ते २०२३ या कालावधीमध्ये सरकारी नोकरावर हल्ला करणे, इतरांचे जिवित किंवा व्यक्तीगत सुरक्षीततेस धोका आणणारी कृती करणे या सारखे गुन्हे दाखल आहेत. तसेच दोन समाजामध्ये तेढ निर्माण होईल असे वक्तव्य त्याने केली आहेत. कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे. त्याच्याविरूध्द महाराष्ट्र पोलीस कायदा कलम ५६ (१) (अ) (ब) अन्वये चा हद्दपार प्रस्ताव जोडभावी पेठ पोलीस ठाण्याकडून देण्यात आला होता. पोलीस उप-आयुक्त परिमंडळ विजय कबाडे यांनी अजय यास तडीपार करण्याचे आदेश दिले आहेत. त्यास तडीपार केल्यानंतर वडवली पोलीस ठाणे, ठाणे शहर येथे सोडण्यात आले आहे.