उदयसिंह पाटील, अजित लकडे, सुहास चव्हाण पुन्हा मैदानात!
Solapur City Police Officer Transfer News
सोलापूर पोलीस दलात मोठे फेरबदल: पोलीस आयुक्त एम. राज कुमार यांचे अंतर्गत बदल्यांचे आदेश; ‘कही खुशी कही गम’
सोलापूर (परशुराम कोकणे – स्मार्ट सोलापूरकर डिजिटल मिडिया) : सोलापूर शहर पोलीस दलात गुरुवारी (२ जुलै २०२६) मोठे फेरबदल करण्यात आले आहेत. पोलीस आयुक्त एम. राज कुमार यांनी शहरातील १५ पोलीस निरीक्षकांच्या प्रशासकीय, तर २ अधिकाऱ्यांच्या विनंतीवरून अंतर्गत बदल्यांचे आदेश जारी केले आहेत. पोलीस आस्थापना मंडळाच्या बैठकीतील निर्णयानुसार हे आदेश तातडीने लागू करण्यात आले आहेत. या बदल्यांमुळे पोलीस वर्तुळात कुठे आनंदाचे तर कुठे नाराजीचे वातावरण म्हणजेच ‘कही खुशी कही गम’ अशी स्थिती पाहायला मिळत आहे.
महत्त्वाच्या बदल्या आणि नवीन जबाबदाऱ्या
उदयसिंह पाटील यांच्याकडे जेल रोडची धुरा
अनेक महिने बाजूला (साइड पोस्टिंगला) म्हणजेच मानवी संसाधन विकास (वेल्फेअर) शाखेत कार्यरत असलेले पोलीस निरीक्षक उदयसिंह शामराव पाटील यांची आता ‘जेल रोड पोलीस ठाण्याच्या’ वरिष्ठ पोलीस निरीक्षक पदी (वपोनि) बदली करण्यात आली आहे. यापूर्वी पाटील यांनी विजापूर नाका पोलीस ठाणे आणि फौजदार चावडी ठाण्याची जबाबदारी सांभाळली होती. काही कारणास्तव त्यांना तेथून हटवण्यात आले होते.
अजित लकडे पुन्हा ‘सदर बझार’ला
आर्थिक गुन्हे शाखेत असलेले पोलीस निरीक्षक अजित शंकर लकडे यांच्यावर पुन्हा एकदा विश्वास दाखवत त्यांना ‘सदर बझार पोलीस ठाण्याचा’ पदभार (वरिष्ठ पोलीस निरीक्षक) देण्यात आला आहे.
भाऊराव बिराजदार ‘सेकंड’वरून ‘फर्स्ट’ला!
विजापूर नाका पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दादा सोमनाथ गायकवाड यांची आर्थिक गुन्हे शाखेत बदली झाली आहे. त्यांच्या जागी नियंत्रण कक्षातून सुहास भाऊराव चव्हाण यांची विनंतीवरून विजापूर नाका पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक पदी नियुक्ती करण्यात आली आहे. सुहास चव्हाण हे यापूर्वी जोडभावी पेठ पोलीस ठाण्यात कार्यरत होते. काही कारणामुळे त्यांना नियंत्रण कक्षेत पाठवले होते. जेल रोडचे दुय्यम पोलीस निरीक्षक भाऊराव श्रीधर बिराजदार यांच्याकडे आता ‘एमआयडीसी पोलीस ठाण्याचा’ वरिष्ठ पोलीस निरीक्षक म्हणून कार्यभार सोपवण्यात आला आहे.
रवींद्रनाथ भंडारे यांना ‘सेकंड’ची जबाबदारी!
सोलापूर शहरात वाहतूक नियंत्रण करण्याच्या कामात पोलीस निरीक्षक रवींद्रनाथ कृष्णा भंडारे हे काहीसे कमी पडल्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळेच त्यांना शहर वाहतूक शाखेच्या (दक्षिण) पदावरून तातडीने हटवण्यात आल्याची चर्चा पोलीस वर्तुळात आहे.
विशेष म्हणजे, त्यांची बदली करताना कोणत्याही पोलीस ठाण्याचे ‘फर्स्ट’ (वरिष्ठ पोलीस निरीक्षक) न करता, थेट सदर बझार पोलीस ठाण्यात ‘सेकंड’ म्हणजेच पोलीस निरीक्षक (गुन्हे) म्हणून दुय्यम दर्जाची जबाबदारी देण्यात आली आहे. मुख्य प्रवासातून बाजूला करत त्यांना ही दुय्यम पोस्टिंग दिल्यामुळे या बदलीची शहरात जोरदार चर्चा सुरू आहे.
श्रीशैल गजा यांना उशिरा का होईना न्याय!
सायबर पोलीस ठाण्याची जबाबदारी अत्यंत चोखपणे सांभाळणारे पोलीस निरीक्षक श्रीशैल सिद्रामप्पा गजा यांची आता सलगर वस्ती पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक पदी (वपोनि) नियुक्ती करण्यात आली आहे. सायबर गुन्हेगारी रोखण्यात त्यांनी मोलाची भूमिका बजावली होती. अनेक दिवसांपासून त्यांच्याकडे मुख्य ठाण्याची जबाबदारी मिळणे अपेक्षित होते. अखेर नव्या फेरबदलात त्यांना सलगर वस्ती पोलीस ठाण्याचा मुख्य प्रभार मिळाल्याने पोलीस वर्तुळात “उशिरा का होईना, पण गजा यांना न्याय मिळाला!” अशी जोरदार चर्चा रंगली आहे.
पतीच्या जागेवर पत्नी!
पोलीस निरीक्षक उदयसिंह शामराव पाटील आणि पोलीस निरीक्षक वैष्णवी उदयसिंह पाटील हे पोलीस दलातील कर्तव्यदक्ष पती-पत्नी आहेत. मानव संसाधन विकास (वेल्फेअर) शाखेत कार्यरत असलेले उदयसिंह पाटील यांची जेल रोड पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक पदी बदली करण्यात आली आहे. विशेष म्हणजे, ते ज्या ‘वेल्फेअर’ शाखेत कार्यरत होते, ती जागा रिक्त झाल्यावर आता त्यांच्याच पत्नी म्हणजेच पोलीस निरीक्षक वैष्णवी पाटील यांना विशेष शाखेतून आणून त्या जागेवर नियुक्ती देण्यात आली आहे. पतीच्या जागेवर आता पत्नी पोलीस दलाचा कारभार सांभाळणार असल्याने या ‘पाटील’ दाम्पत्याच्या बदलीची पोलीस वर्तुळात मोठी चर्चा रंगली आहे.
दादा गायकवाड ‘साईडला’ पडले?
विजापूर नाका पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दादा गायकवाड यांना या फेरबदलात हळूच मुख्य प्रवासातून बाजूला करत ‘आर्थिक गुन्हे शाखेची’ जबाबदारी देण्यात आली आहे. विजापूर नाक्यासारख्या मोठ्या पोलीस ठाण्यातून थेट साईड पोस्टिंग मानल्या जाणाऱ्या शाखेत त्यांची बदली झाल्याने, दादा गायकवाड नेमके कुठे कमी पडले? याबद्दल आता उलटसुलट चर्चा सुरू झाली आहे. तर दुसरीकडे, भविष्यात त्यांना क्राईम ब्रांचमध्ये (गुन्हे शाखा) मोठी संधी देण्याच्या उद्देशानेच सध्या आर्थिक गुन्हे शाखेत आणले गेले आहे, अशीही एक नवी चर्चा पोलीस वर्तुळात रंगली आहे.
अधिकारी आणि त्यांना दिलेली नवीन जबाबदारी पुढील प्रमाणे –
▪️दादा सोमनाथ गायकवाड – विजापूर नाका पोलीस ठाणे (वरिष्ठ पोलीस निरीक्षक) येथून आर्थिक गुन्हे शाखा (पोलीस निरीक्षक)
▪️विजय भानुदास खोमणे – एमआयडीसी पोलीस ठाणे (दुय्यम पोलीस निरीक्षक) येथून शहर वाहतूक शाखा – दक्षिण (पोलीस निरीक्षक)
▪️भालचंद्र सुभाष ढवळे – सदर बझार पोलीस ठाणे (दुय्यम पोलीस निरीक्षक) येथून सायबर सेल पोलीस ठाणे (पोलीस निरीक्षक)
▪️भाऊराव श्रीधर बिराजदार – जेलरोड पोलीस ठाणे (दुय्यम पोलीस निरीक्षक) येथून एमआयडीसी पोलीस ठाणे (वरिष्ठ पोलीस निरीक्षक)
▪️श्रीशैल सिद्रामप्पा गजा – सायबर सेल पोलीस ठाणे (पोलीस निरीक्षक) येथून सलगर वस्ती पोलीस ठाणे (वरिष्ठ पोलीस निरीक्षक)
▪️उमाकांत आनंद शिंदे – सलगर वस्ती पोलीस ठाणे (वरिष्ठ पोलीस निरीक्षक) येथून विशेष शाखा व अतिरिक्त कार्यभार सुरक्षा शाखा (पोलीस निरीक्षक)
▪️उदयसिंह शामराव पाटील – मानवी संसाधन विकास – वेल्फेअर (पोलीस निरीक्षक) येथून जेलरोड पोलीस ठाणे (वरिष्ठ पोलीस निरीक्षक)
▪️जयदीप हनुमंत कळेकर – नियंत्रण कक्ष येथून जेलरोड पोलीस ठाणे (पोलीस निरीक्षक – गुन्हे)
▪️बालक पांडुरंग कोळी – नियंत्रण कक्ष येथून अतिक्रमण विभाग व अतिरिक्त कार्यभार दंगा नियंत्रण पथक (पोलीस निरीक्षक)
▪️आसिफ राजा बखतावर शेख – नियंत्रण कक्ष येथून महिला सुरक्षा कक्ष (पोलीस निरीक्षक)
▪️संगीता तुळशीदास पाटील – सुरक्षा शाखा येथून एमआयडीसी पोलीस ठाणे (पोलीस निरीक्षक – गुन्हे)
▪️अजित शंकर लकडे – आर्थिक गुन्हे शाखा (पोलीस निरीक्षक) येथून सदर बझार पोलीस ठाणे (वरिष्ठ पोलीस निरीक्षक)
▪️स्नेहा प्रकाश म्हेतर – महिला सुरक्षा कक्ष (पोलीस निरीक्षक) येथून ए.एच.टी.यु. – अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्ष (पोलीस निरीक्षक)
▪️वैष्णवी उदयसिंह पाटील – विशेष शाखा (पोलीस निरीक्षक) येथून मानवी संसाधन विकास – वेल्फेअर (पोलीस निरीक्षक)
▪️रविंद्रनाथ कृष्णा भंडारे – शहर वाहतूक शाखा – दक्षिण (पोलीस निरीक्षक) येथून सदर बझार पोलीस ठाणे (पोलीस निरीक्षक – गुन्हे)
विशेष विनंतीवरून झालेल्या बदल्या
▪️सुहास भाऊराव चव्हाण – नियंत्रण कक्ष / अतिरिक्त कार्यभार दंगा नियंत्रण पथक येथून विजापूर नाका पोलीस ठाणे (वरिष्ठ पोलीस निरीक्षक)
▪️विकास दगडोबा देशमुख – नियंत्रण कक्ष / अतिरिक्त कार्यभार जलद प्रतिसाद पथक येथून पुन्हा एकदा फौजदार चावडी पोलीस ठाणे (पोलीस निरीक्षक – गुन्हे)
तत्काळ कार्यभार स्वीकारण्याचे आदेश
बदली झालेल्या सर्व पोलीस निरीक्षकांनी आपला नवीन कार्यभार तात्काळ स्वीकारून त्याचा पूर्तता अहवाल आयुक्तालय कार्यालयाला सादर करावा, असे निर्देश पोलीस आयुक्त एम. राज कुमार यांनी दिले आहेत. तसेच विकास देशमुख यांच्या बदलीनंतर जलद प्रतिसाद पथकाचा अतिरिक्त कार्यभार पोलीस उपनिरीक्षक पी. बी. बनसोडे यांच्याकडे सोपवण्यात आला आहे.











