शुक्रवारपासून तीन दिवस प्रिसिजन गप्पा!

सोलापूर : प्रिसिजन फाउंडेशनच्या वतीने येत्या ७, ८ आणि ९ नोव्हेंबर २०२५ रोजी शिवछत्रपती रंगभवन येथे ”प्रिसिजन गप्पा’ आयोजन करण्यात आले आहेत. सोलापूरकर रसिकांना दिवाळीनंतर सांस्कृतिक गप्पांची दिवाळी अनुभवता येणार आहे.

प्रिसिजन गप्पांचं हे १७ वं वर्ष आहे. संगीत, नाटक, साहित्य, विविध कलांच्या आस्वादासोबतच सामाजिक जाणीव जागृत करणाऱ्या गप्पांनी सोलापूरचं सांस्कृतिक पर्यावरण समृद्ध केलं आहे. यावर्षीही दर्जेदार विषय, आगळीवेगळी व्यक्तिमत्वं आणि त्यांच्यासोबतच्या सकस गप्पा असा त्रिवेणी संगम घडणार आहे अशी माहिती प्रिसिजन फाउंडेशनच्या अध्यक्षा डॉ. सुहासिनी शहा यांनी दिली. त्यावेळी प्रिसिजन उद्योगसमूहाचे चेअरमन श्री.यतिन शहा हे उपस्थित होते.



गेल्या १६ वर्षात प्रिसिजन गप्पांच्या या व्यासपीठावर अनेक दिग्गजांना सोलापूरकरांनी ऐकलं. पाहिलं. मंत्रमुग्ध झाले. यावर्षी प्रिसिजन गप्पांना शुक्रवार, दि.७ नोव्हेंबर २०२५ रोजी सुरवात होईल. पहिल्या दिवशी संकर्षण व्हाया स्पृहा’ हा एक मराठी कविता आणि कथाकथन कार्यक्रम आहे. ज्यात अभिनेते संकर्षण कऱ्हाडे आणि स्पृहा जोशी सहभागी आहेत. या कार्यक्रमात कविता, किस्से आणि संकर्षण व स्पृहा यांच्यातील संवाद सादर केला जाणार आहे. कला आणि मनोरंजन यांचा सुरेल संगम म्हणजे हा कार्यक्रम असून त्याचे विविध प्रयोग महाराष्ट्रात आणि परदेशातही झाले आहेत.
शनिवार दि.८ नोव्हेंबर रोजी गप्पांच्या दुसऱ्या दिवशी सुप्रसिद्ध कवि वैभव जोशी यांचा अपूर्वाई हा कार्यक्रम सादर होईल. अपूर्वाई हा एक वेगळा कार्यक्रम आहे. कविता, बासरी आणि गाणं यांचा त्रिवेणी संगम यात पाहायला मिळेल. या कार्यक्रमाची संकल्पना कवि वैभव जोशी यांची असून वैभव जोशी यांच्या समवेत सुप्रसिद्ध बासरी वादक अमर ओक आणि गायिका शरयू दाते यांची ही मैफल संगीत आणि कवितेचा जादुई संगम घडवते.
रविवार, दिनांक ९ नोव्हेंबर २०२५ रोजीचा दिवस सामाजिक पुरस्कारांचा असेल. यावर्षी अत्यंत वेगळया क्षेत्रात कार्य करणाऱ्या दोन सामाजिक संस्थांना पुरस्कार देऊन गौरविण्यात येणार आहे. यावर्षीच्या दोन्ही संस्था या देशाच्या सीमावर्ती भागात कार्य करतात. सोल्जर्स इंडिपेन्डट रिहॅबिलिटेशन फाउंडेशन या संस्थेच्या वतीने सियाचेन या जगातल्या सर्वोच्च रणभूमीवर ऑक्सिजन जनरेशन प्लान्ट सुरू करून तिथे सीमेवर दक्ष राहणाऱ्या सैनिकांच्या तसेच पर्यटक नागरिकांना या ऑक्सिजन प्लांटच्या माध्यमातून अक्षरशः श्वास दिला. याबरोबरच सैनिकांच्या विधवा पत्नी व मुलांना दत्तक घेऊन त्यांचं पुनर्वर्सन करण्याचं कार्य ही संस्था करते. श्रीमती सुमेधा चिथडे यांच्या या कार्याचा गौरव म्हणून त्यांना प्रिसिजन सामाजिक कृतज्ञता पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे. ३ लाख रूपये आणि सन्मानचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.
बॉर्डरलेस वर्ल्ड फाउंडेशन ही अधिक कदम यांची संस्थादेखील काश्मिरमध्ये दहशतवाद्यांच्या हल्ल्यात, अराजकतेमध्ये, युद्धामध्ये किंवा अन्य अशा कारवायांमध्ये अनाथ झालेल्या मुलां-मुलींच्या पुनर्वसनाचं कार्य करते. त्यांच्यासाठी आश्रम सुरू करून त्यांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणले जाते. त्यांच्या कौशल्य विकासातून रोजगार निर्मिती केली जाते. मुख्य म्हणजे कुपवाडा, अनंतनाग, जम्मू अशा नेहमी अशांत असणाऱ्या भागात अधिक कदम यांचासारखा मराठी माणूस गेली ३० वर्षे कार्य करत आहे, हे विशेष कौतुकास्पद आहे. त्यांच्या कार्याची दखल घेऊन प्रिसिजनचा सुभाष रावजी शहा स्मृति पुरस्कार देऊन त्यांचा गौरव करण्यात येणार आहे. २ लाख रूपये आणि सन्मानचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.
प्रख्यात वक्ते, मुलाखतकार, पत्रकार डॉ. उदय निरगुडकर यांच्या हस्ते हे पुरस्कार दिले जातील. पुरस्कार सोहळ्यानंतर श्रीमती सुमेधा चिथडे आणि अधिक कदम यांची मुलाखत उदय निरगुडकर हे घेतील.
प्रिसिजनच्या प्रथेप्रमाणे तीनही दिवस सायंकाळी ६.२५ वा. गप्पांना प्रारंभ होईल. नेहमीप्रमाणेच शिवछत्रपती रंगभवनमध्ये या गप्पा आयोजित केल्या आहेत. रंगभवनच्या प्रांगणातही आसनव्यवस्था व एलईडी प्रोजेक्टरद्वारे कार्यक्रम पाहण्याची सोय असेल. तसेच रसिकांच्या पार्किंगची व्यवस्था वोरोनोको शाळेच्या मैदानावर करण्यात आली आहे. रसिक सोलापूरकरांनी ’प्रिसिजन गप्पां’चा मनमुराद आनंद घ्यावा असे आवाहन डॉ. सुहासिनी व श्री. यतिन शहा यांनी केले.
पुरस्कारप्राप्त संस्थांचा परिचय-
प्रिसिजन सामाजिक कृतज्ञता पुरस्कारप्राप्त संस्था – सोल्जर्स इंडिपेंडट रिहॅबिलिटेशन फाउंडेशन, पुणे – श्रीमती सुमेधा चिथडे
सुमेधा चिथडे या एका लष्करी अधिकाऱ्याच्या पत्नी आणि आई. लहानपणापासून देशसेवेचा वसा मिळालेला. देशाच्या सीमेवर अहोरात्र विपरित वातावरणात गस्त घालणाऱ्या, प्रसंगी मृत्यूशीही दोन हात करणाऱ्या सैनिकांसाठी काहीतरी केलं पाहिजे, ही जाणीव मनात ठेवून त्यांनी या कार्याला प्रारंभ केला. सियाचेन या जगातल्या सर्वात उंच ठिकाणच्या रणभूमीबद्दल त्या ऐकून होत्या. एवढ्या उंचावर प्राणवायूचा पुरवठा पुरेसा होत नाही. श्वास घेणेही अवघड होऊन जाते. म्हणून श्रीमती सुमेधा चिथडे यांनी आपले दागिने विकून तसेच दारोदार फिरून लोकसहभाग मिळवत तिथे ऑक्सिजन जनरेशन प्लान्ट उभा केला. त्यानंतर काश्मिरमध्ये दोन प्लान्ट उभे केले, सैनिकी रूग्णालयाना अनेक उपकरणे दिली. सैनिकांच्या विधवा पत्नी आणि मुलांना दत्तक घेऊन त्यांच्या पुनर्वसनाचं मोठं कार्य केलं आहे. आजही देशभर फिरून सैनिकांविषयी सामान्य नागरिकांच्या मनात जाणीव जागृती निर्माण करण्याचं कार्य करतात.
स्व. सुभाष रावजी शहा स्मृती पुरस्कार:- बॉर्डरलेस वर्ल्ड फाउंडेशन – अधिक कदम
अधिक कदम हे मूळचे अहिल्यानगर जिल्ह्यातील श्रीगोंदा तालुक्यातले. पुण्यात शिक्षण घेत असताना काश्मिरमध्ये एका अभ्यासदौऱ्यासाठी जाण्याचा योग आला. तिथली परिस्थिती पाहिली. कोणत्याही आतंकी हल्ल्यात, युद्धात सीमेवरची लहान मुले आणि महिलाच जास्त भरडल्या जातात हे त्यांच्या लक्षात आले. आणि त्यांनी तिथेच राहून काम करायला प्रारंभ केला. बॉर्डरलेस वर्ल्ड फाउंडेशन या संस्थेच्या माध्यमातून कुपवाडा, अनंतनाग, बारामुल्ला, जम्मू यासारख्या संवेदनशील भागातील युद्धामुळे आतंकी हल्लयामुळे किंवा अराजकतेमुळे अनाथ झालेल्या मुलींचा सांभाळ करत त्यांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणले. शांततेचे महत्व पटवून दिले. त्यांच्यातील कौशल्य विकासातून स्वयं रोजगारासाठी प्रवत्त केले. यातूनच काश्मिरमध्ये पहिल्यांदा केवळ महिलांनी चालवलेला उद्योग सुरू झाला. त्यांच्या संस्थेतर्फे काश्मिर लाईफलाईन नावाची अॅम्ब्यूलन्स सेवा सुरू झाली. त्यामुळे दुर्गम भागातील रूग्णांची मोठी सोय झाली.



