‘गीत रामायण’च्या सुरेल सादरीकरणाने सोलापूरकर मंत्रमुग्ध

Solapur spice n Ice events Geet Ramayan News

सोलापूर : श्रीराम नवमीच्या पावन पर्वानिमित्त सोलापुरात ‘गीत रामायण’चा सुरेल सोहळा मोठ्या भक्तिभावात आणि सांस्कृतिक समृद्धतेने पार पडला. स्पाईस एन आईस आयोजित, चितळे एक्सप्रेस प्रस्तुत, आणि प्रमुख प्रायोजक इंद्रधनु प्रकल्प व पी.एन.जी. ज्वेलर्स यांच्या सहकार्याने हा अविस्मरणीय कार्यक्रम हुतात्मा स्मृती मंदिर येथे मोठ्या उत्साहात पार पडला.

कार्यक्रमाची सुरुवात श्रीमती अपर्णा सहस्रबुद्धे यांच्या बहारदार निवेदनाने आणि उस्फूर्त स्वागताने झाली. त्यांनी रामकथेच्या पार्श्वभूमीवर रसिकांना गीत रामायण’च्या विश्वात अलगद उतरवले व पुढील सूत्रे श्री. नेसरीकर यांच्याकडे सोपवली.
स्व. ग.दि. माडगूळकर लिखित आणि स्व. सुधीर फडके यांच्या स्वरांनी अजरामर झालेल्या ‘गीत रामायण’मधील निवडक गीते सादर करताना संपूर्ण हुतात्मा स्मृती मंदिर भक्तिरसात न्हालं. गीतांमधील शब्दसौंदर्य, भावार्थ आणि संगीताचा संगम रसिकांच्या मनाला स्पर्शून गेला.
प्रमुख गायक श्री. अमित नेसरीकर यांच्या भावपूर्ण सादरीकरणाला प्रेक्षकांनी भरभरून दाद दिली. त्यांच्या सोबत श्री. मंदार पुराणिक (तबला), श्री. राजन माशेलकर (व्हायोलिन), श्री. अनिरुद्ध गोसावी (हार्मोनियम) आणि श्री. नंदकुमार रानडे (तालवाद्य) यांनी आपल्या साथीनं संपूर्ण वातावरण भक्तिरसाने ओथंबून टाकलं. श्री. समीर नेसरीकर यांच्या प्रभावी निवेदनामुळे रामायणातील प्रसंग डोळ्यासमोर उभे राहिले.
कलाकारांनी निवडक 15 गाणी सादर केली. प्रेक्षकांच्या विशेष आग्रहास्तव “Once More” चा जल्लोषही अनुभवायला मिळाला. त्या गाण्यांमध्ये –
राम जन्मला ग सखे राम जन्मला
स्वयंवर झाले सीतेचे
पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा
या गाण्यांना विशेष प्रतिसाद मिळाला.
कार्यक्रमाच्या दरम्यान कलाकारांचा सत्कार इंद्रधनु प्रकल्पच्या सौ. सपना विकास कोळी आणि पी.एन.जी. ज्वेलर्सचे श्री. विनोद तद्देवाडी यांनी सन्मानपूर्वक केला. श्री. नौशाद शेख, युनिट हेड – दैनिक दिव्य मराठी यांनी मान्यवरांचा व प्रमुख प्रायोजकांचा सत्कार केला. यावेळी श्री. नौशाद शेख यांचा सत्कार श्रीमती अपर्णा सहस्रबुद्धे यांच्या हस्ते करण्यात आला.
या भावविभोर संध्याकाळी सोलापुरातील अनेक मान्यवर उपस्थित होते, ज्यामध्ये विशेष उल्लेखनीय आहेत –
श्री. नौशाद शेख, युनिट हेड – दैनिक दिव्य मराठी
श्री. शंकर केंदुळे, उपप्रादेशिक अधिकारी – महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ
सौ. सपना विकास कोळी, इंद्रधनु प्रकल्प
श्री. विनोद तद्देवाडी, पी.एन.जी. ज्वेलर्स
सोलापुरातील रसिक प्रेक्षकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवली. जय श्रीराम च्या जायघोषाने सभागृह दुमदुमून गेले होते. संपूर्ण कार्यक्रमाचे सुरेख आयोजन, संगीताच्या सुरांनी भारलेली सादरीकरणं आणि भक्तिरसाचा महापूर यामुळे स्पाईस एन आईस टीमचे सर्वत्र विशेष कौतुक झाले.
‘गीत रामायण’ हा कार्यक्रम सोलापुरकरांच्या स्मरणात दीर्घकाळ रेंगाळणारा, संगीत आणि भक्तिरसाने भारलेला एक सांस्कृतिक सोहळा ठरला.