वाचन प्रेमींसाठी आनंदाची बातमी
प्रिसिजन फाउंडेशनचा “प्रिसिजन वाचन अभियान”
‘वॉकिंग ऑन द एज’ पुस्तकाचे वाचन आणि लेखकाची लेखकाची मुलाखत होणार
सोलापूर : प्रिसिजन फाउंडेशनने आजवर अनेक सामाजिक व सांस्कृतिक उपक्रम राबविले आहेत. शिक्षण, आरोग्य, शाश्वत विकास या बरोबरच सांस्कृतिक क्षेत्रातही प्रिसिजन गप्पा, प्रिसिजन संगीत महोत्सवासारखे प्रकल्प चालू आहेत. याबरोबरच आता “प्रिसिजन वाचन अभियान” हा उपक्रम हाती घेत आहोत, अशी माहिती प्रिसिजन फाउंडेशनच्या अध्यक्षा डॉ. सुहासिनी शहा यांनी दिली.
या उपक्रमाविषयी अधिक माहिती देताना डॉ. सुहासिनी शहा यांनी डॉ. अरूण टिकेकरांच्या एका वाक्याचा संदर्भ दिला. ‘कोणत्याही समाजाची आर्थिक प्रगती ज्या वेगाने होते त्या वेगाने वैचारिक प्रगती झाली नाही तर तो समाज अध:पतनाच्या दिशेने वाटचाल करतो’. सोलापूरचे सुपुत्र आणि जेष्ठ पत्रकार माजी संपादक डॉ. अरूण टिकेकर यांच्या ‘सारांश’ या पुस्तकातलं हे विधान. महाराष्ट्रातल्या सद्यस्थितीला अगदी चपखल बसतं. सोलापूरही त्याला अपवाद नाही.
कोरोनानंतर अनेक शालेय मुलांच्या वाचन, लेखनावर परिणाम झाला. वाचनाची सवय बंद झाली किंवा लागलीच नाही. त्यामुळे स्वतंत्र विचार करून लिहिण्याची सवयही मोडली. शालेय विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची गोडी निर्माण व्हावी म्हणून प्रिसिजन युनिक फीचर्सच्या माध्यमातून आठ शाळांमधील १००० विद्यार्थ्यांसाठी गेली तीन वर्षे “पासवर्ड वाचन अभियान” राबवत आहे. त्याचे चांगले परिणाम दिसून येत आहेत. मुलांमध्ये वाचनाबरोबरच स्वतंत्र विचार करून लिहिण्याची गोडी वाढत आहे. हा जसा शालेय विद्यार्थ्यांच्या बाबतीत उपक्रम आहे तसाच मोठ्या लोकांच्या वाचन – लेखनाच्या बाबतीतही “वाचन अभियानाचा उपक्रम निश्चितच उपयुक्त ठरेल, असा विश्वास आहे.
सध्या सर्वांचीच वाचनाची सवयच मोडली. मोबाईलच्या अती वापराने पुस्तकांचा सहवास दुरावला. सोलापूरात वाचणारे ठराविक वाचक आहेत. या वाचन सवयीचे “वाचन चळवळीत” रूपांतर करायचा मानस प्रिसिजन फाऊंडेशनचा आहे. महाबळेश्वरजवळचे भिलार हे पुस्तकांचे गांव आहे,
कोकणात उभा दांडा हे मंगेश पाडगांवकरांचे गाव कवितेचे गांव म्हणून आहेळखले जाते. तसेच सोलापूर शहर हे पुस्तक वाचणाऱ्या लोकांचे – वाचकांचे शहर म्हणून ओळखले जाऊ शकते का ? असा प्रयत्न या प्रकल्पाच्या माध्यमातून करण्याचा आमचा मानस आहे.. सोलापूरात काही वाचनप्रेमी लोकांचे समुह आहेत. काही वाचनालये वाचन प्रसाराचे काम करत आहेत. प्रिसिजनच्या या प्रकल्पाला इंडियन मेडिकल असोसिशन यांचे सहकार्य लाभणार आहे. प्रिसिजन फाउंडेशन आणि इंडियन मेडिकल असोसएशन यांच्या सयुंक्त विद्यमाने “प्रिसिजन वाचन अभियान’ हा उपक्रम राबविला जाणार आहे. असे प्रिसिजन फाउंडेशनच्या अध्यक्षा डॉ. सुहासिनी शहा यांनी सांगितले.
अभियानाचे स्वरूप:-
• प्रत्येक महिन्याच्या पहिल्या शनिवारी पुस्तक वाचनाशी संबंधित एक कार्यक्रम आयोजित करणं.
• पुस्तकाचे अभिवाचन, लेखकांच्या मुलाखती, पुस्तक समिक्षणपर संवाद, काव्य मैफिली असे कार्यक्रमाचे स्वरूप असेल.
• ललित, वैचारिक पुस्तकं आणि मासिकांचा वाचक वाढवण्यासाठी सोलापूरातील जास्तीत जास्त व्यक्तींना प्रेरित करणं.
• या अभियानाच्या माध्यमातून सोलापूरात प्रतिथयश लेखक, कवी यांची वाचकांची भेट आणि संवाद.
या प्रिसिजन वाचन अभियाचा शुभारंभ जुलैपासून होत आहे. शनिवार, दिनांक ६ जुलै २०२४ रोजी वाचन अभियानाचे पहिले पान उघडले जाणार आहे. ‘वॉकिंग ऑन द एज’ या पुस्तकाचे अभिवाचन आणि या पुस्तकाचे लेखक प्रसाद निक्ते यांच्याशी दिलखुलास गप्पा असे हे या अभियानचे पहिले पान असेल. प्रसाद निक्ते यांनी सह्याद्री घाटमाथ्याच्या धारेवरून उत्तरेहून दक्षिणेकडे उभा महाराष्ट्र चालत जाऊन सह्याद्रीच्या पर्वतरांगांचा अभ्यास केला. ही मोहिम पूर्ण करण्यासाठी त्यांना अखंडपणे ७५ दिवस चालावे लागले. या अनोख्या प्रवासाचं वर्णन म्हणजे ‘वॉकिंग ऑन द एज’ हे पुस्तक होय.
या मोहिमेत तेथील जनजीवन, संस्कृती, भाषा, देवदेवता, परंपरा यांचा वेध घेण्याचा त्यांचा ध्यास होता. त्यातूनच सातपुडा आणि सह्याद्रीच्या जनजीवनाचा एक अनमोल दस्तावेज तयार झाला. या पुस्तकाचे अभिवाचन डॉ. सुमेधा कंदलगांवकर या करणार आहेत. त्यानंतर लेखक प्रसाद निक्ते यांची मुलाखत होईल.
शनिवार दिनांक ६ जुलै २०२४ सायंकाळी ०६. २५ वा. आय एम ए सभागृह, डफरीन चौक सोलापूर येथे प्रिसिजन वाचन अभियानाला प्रारंभ होईल. प्रिसिजनच्या प्रथेप्रमाणे कार्यक्रम वेळेवर सुरु होईल. वाचन प्रेमी रसिक सोलापूरकरांनी ’प्रिसिजन वाचन अभियानात सहभागी होऊन वाचनाचा आणि श्रवणाचा मनमुराद आनंद घ्यावा असे आवाहन डॉ. सुहासिनी शहा व डॉ किरण सारडा यांनी केले आहे.