व्वा क्या बात है! भारतातील दिग्गजांमध्ये डॉ. मेतन यांचे नाव!
सोलापूर : प्रसिद्ध पक्षीनिरीक्षक व राष्ट्रस्तरीय वाईल्ड लाइफ फोटोग्राफर डॉ. व्यंकटेश मेतन यांनी भारतातील एकूण १३६९ पक्षी प्रजातीपैकी १००० पक्ष्यांचे निरीक्षण करून त्यांची छायाचित्रे काढण्यात यश मिळविले आहे. हा टप्पा गाठण्यासाठी त्यांनी मागील २७ वर्ष सातत्याने पक्षीनिरीक्षण, पक्ष्यांवरील सखोल अभ्यास, भारतभर प्रवास करून अनेक अभयारण्य व जंगलांना भेट, १० वर्ष उत्तम कॅमेऱ्याने छायाचित्रे टिपली. व्यस्त वेळेतून खूप वेळ खर्ची घालून, चिकाटीने खूप मेहनत घेतली आहे. त्यांनी पक्ष्यांचे निरीक्षण व छायाचित्रे काढून त्यांच्या नोंदी करून ठेवल्या आहे. एक हजाराहून जास्त पक्षी प्रजातींचे छायाचित्रे काढणाऱ्या भारतातील दिग्गज पक्षीतज्ञ व छायाचित्रकारांच्या समुहामध्ये त्यांचे नाव नोंदले गेले आहे.
डॉ. व्यंकटेश मेतन हे प्रसिद्ध पक्षीनिरीक्षक, राष्ट्रस्तरीय वाईल्ड लाइफ फोटोग्राफर, प्रसिद्ध अस्थिरोगतज्ञ असून त्यांनी हिमालयन विद्यापीठातून फाइन आर्ट फोटोग्राफीमध्ये मास्टर्सचे शिक्षण घेतले आहे.
भारतात आढळणाऱ्या काही महत्वाच्या आणि दुर्मिळ पिवळा तापस, मोठा छत्रबलाक, खुरपी बदक, चतुरंग बदक, शेंडी बदक, गीजरा बदक, काळा बाज, शाही गरुड, हिवाळी तुरुमती, अमूर ससाणा, सामान्य लावा, हुबारा, तपकिरी फटाकडी, पाण फटाकडी, लांब शेपटीचा कमलपक्षी, सोन चिखल्या, नदी टिटवी, कवड्या टिलवा, करडा टिलवा, उचाटया, छोटा कोकीळ, हुमा घुबड, बेडूक तोंड्या, फ्रँक्लिनचा रातवा, कंठेरी धीवर, काळा नीलपंख, महाधनेश, रान धोबी, लाल कंठाची तीरचिमणी, नीलपरी, शिटीमार रानभाई, काश्मिरी माशीमार, ठिपकेवाली सर्पिका, रेखांकित भारिट, काळ्या छातीची सुगरण, तिरंदाज, समुद्री बगळा, पांढरा करकोचा, रोहित, कलहंस, चक्रवाक, मलीन बदक, चतुरंग बदक, माळढोक, कास्य पंखी कमळपक्षी, वैगरे पक्ष्यांचे निरीक्षण करून त्यांची सुंदर छायाचित्रे काढली आहेत.
त्यांच्या अनेक यशस्वी जंगल सफारीवरील व पक्षिनिरीक्षणावरील अनेक लेख लोकप्रिय दैनिकात, मासिकात, इंटरनेटवर माध्यमावर व टीव्ही चॅनेलवर प्रकाशित झाली आहेत. यांच्या वन्यजीव छायाचित्राचे प्रदर्शन जगप्रसिद्ध अश्या “जहांगीर आर्ट गॅलरी” मुंबई येथे दोनवेळा तसेच बंगलोर येथील प्रतिष्ठित “चित्रकला परिषद” येथे तीनवेळा यशस्वीरित्या संपन्न झाले.
कोणते कॅमेरे वापरतात?
डॉ. मेतन यांच्याकडे जगातील सर्वोत्तम कॅनॉन कंपनीचे मिररलेस R-5 कॅमेरा, 1 DX कॅमेरा, 5 D Mark IV कॅमेरा, ६०० mm प्राइम लेन्स, ४०० mm प्राइम लेन्स, RF २४ -१०५ mm IS USM लेन्स, १०० मिमी एफ / २.८ ईएफ एल मॅक्रो लेन्स, साम्यांग १४ मिमी एफ २.८ अल्ट्रा-वाइड-एंगल लेन्स आणि इतर आधुनिक उपकरणे आहेत.
—
सोलापुरातील हिप्परगा तलाव हा वेटलँड कॉन्सर्व्हशन प्रोजेक्टमध्ये समावेश करून त्याला रामसरचा दर्जा मिळवण्यासाठी डॉ. मेतन प्रयत्नशील आहेत. सोलापूरचे पक्षी वैभव जगभर नेऊन सोलापूरची एक वेगळी ओळख निर्माण करण्याचा त्यांचा मानस आहे. समाजातील युवकांना / विध्यार्थ्यांसाठी निसर्गाशी नाती जुळविण्यासाठी व्याख्याने, सेमिनार, स्लाईड प्रेसेंटेशन, प्रदर्शने याचे आयोजन करतात. नजीकच्या काळात पक्षी या विषयावर सोलापूर : पक्ष्यांचे नंदनवन, महाराष्ट्राला पक्षी वैभव आणि भारतातील पक्षी वैभव असे तीन कॉफी टेबलं पुस्तके प्रकाशित करण्याचा त्यांचा मानस आहे.
—
अनेक तास एकाग्रतेने निसर्गातील अनेक प्रजातींच्या पक्ष्यांची शरीराची रचना, त्यांचे रंग, त्यांचे वेगळेपण, त्यांच्या हालचाली, त्यांचे व्यवहार, त्यांचे खाद्य, घरटी व जीवनचक्र अश्या अनेक गोष्टींचा सखोल अभ्यास मी करीत आहे. निसर्गामधील अनेक आश्चर्यकारक घटना कॅमेऱ्यामध्ये टिपली आहेत. पक्षी निरीक्षण हे एक प्रकारचे ध्यानच (मेडिटेशन) असते कारण त्यामुळे दैनंदिन कामाचा क्षीण, शारीरिक आणि मानसिक ताण निघून जातो. पक्षी आणि प्राण्यांपासून जगण्यासाठी फार कमी लागत हे कळते. जेंव्हा निसर्गाच्या सान्निध्यात वेळ घालविताना मनाला आनंद मिळून मन शांत राहते.
– डॉ. व्यंकटेश मेतन
अस्थिरोगतज्ञ, पक्षीतज्ज्ञ
छायाचित्रकार
मो. ९३७००८००९०