पाण्यासाठी कारागृहातील कैदी बाहेर!

सोलापूर : पाण्याची पाईप खोदकाम करण्यासाठी सोलापूर जिल्हा कारागृहातील 4 कैदी आज बाहेर आले होते. कारागृह अधिकाऱ्यांच्या समोर खोदकाम करण्यात आले. या प्रकारानंतर उलट सुलट चर्चा सुरू आहे.

या प्रकरणानंतर कारागृह विभागाने आपला खुलासा केला आहे.

कारागृह विभागाचे म्हणणे –
सोलापूर जिल्हा कारागृहाची अधिकृत बंदी क्षमता १४१ असताना आज रोजी कारागृहामध्ये ५५० बंदी दाखल आहे. कारागृह बंदी क्षमतेपेक्षा चारपटीने बंदयांची संख्या आहे. कारागृहामध्ये महानगर पालिकेचे एक इंच २४ तास पाणीपुरवठा करणारी पाईप लाईन सुरु आहे. तसेच शासकिय वसाहती करिता दोन इंच चार दिवसातून एक वेळेस पाणीपुरवठा करणारे कनेक्शन सुरु आहे. बंदयांची संख्या वाढल्याने व सध्या उन्हाळा सुरु असल्याने पाण्याची प्रचंड टंचाई भासत आहे. चार दिवसापासून कारागृहामध्ये पाणी पुरवठा अत्यंत दुषित येत आहे. कारागृहामध्ये पाण्याची टंचाई असल्याने कारागृहातील बंदयांनी सन्मा. मानवी हक्क आयोग, सन्मा. सेशन कोर्ट, माळशिरस, सन्मा. अतिरिक्त सत्र न्यायालय ३, सोलापूर यांना पाण्यासंदर्भात तक्रारी अर्ज केलेले आहेत. सन्मा. न्यायालय यानीं सुध्दा मा.आयुक्त सोलापूर महानगर पालिका यांना तात्काळ पाण्याचा पुरवठा करण्याबाबत लेखी पत्र दिलेले आहे. सोलापूर महानगरपालिका यांच्याकडून कारागृहास दोन इंची पाईप लाईनचा पाणीपुरवठा करण्याबाबत दि.१७/०९/२०२४ पासून पाठपुरावा सुरु आहे. सोलापूर महानगर पालिकेने दोन इंची पिण्याच्या पाण्याचे नळ कनेक्शनाबाबत मान्यता दिल्याने व लागणारा खर्च महानगर पालिकेस अदा करण्यात आलेला आहे. महानगरपालिकेच्या आदेशानुसार खोदकाम संबंधित अर्जदाराने करायचे असल्याने महानगर पालिकेच्या अधिका-याशी वारंवार संपर्क करुन तात्काळ बंदयांकरिता पाणी कनेक्शन देण्याबाबत विनती केलेली आहे. कारागृहात बंदयांना वेळेवर व स्वच्छ पाणी मिळण्याच्या उददेशाने तसेच दूषित पाण्यामुळे बंदयांच्या जिवीतास धोका निर्माण होवु नये म्हणुन बंदयांच्या आरोग्याच्या दृष्टिकोणातून सदरचे खोदकाम हे कारागृह अधिकारी व कर्मचारी यांचे पुर्णपणे चोख बंदोबस्तात करण्यात आले. तसेच खोदकाम करतेवेळी महानगर पालिकेचे अधिकारी हे स्वतः उपस्थित राहिल्यानंतर कारागृहातील बंदयांमार्फत खोदकाम सुरु केले होते. खोदकाम करणा-या बंदयांना नियमानुसार कारागृह प्रशासनाकडून वेतन देण्यात येते.
तर दुसरीकडे महापालिका आयुक्तांचा खुलासा –
१) महापालिकेचा अधिकारी समोर नसताना व आम्हाला माहिती न देता परस्पर खोदाई.
२)पालिकेस कारागृह विभागाने अद्याप शुल्क भरले नाही.
३)कारागृह अधिकारी आम्हाला येवून भेटले होते.पण शुल्क न भरताच पाणी पुरवठा २’’ लाईन देण्याची केली होती मागणी.
४) कारणे दाखवा नोटीस देण्याचे आदेश.
आरोग्य अभियंता यांचा खुलासा 👇🏻
१) जेल मध्ये पाणी साठवण क्षमता कमी आहे.नव्याने टाकी बनवल्यास नवीन लाईन देता येईल.तसे जेल प्रशासनास आधीच कळविले.
२) कैद्यांची संख्या जास्त आहे बरोबर आहे.त्यामुळे आम्ही वेळोवेळी त्यांना टॅंकर ने अतिरिक्त पाणी पुरवठा केला.
३)कोणतेही शुल्क अद्याप भरले नाही.
४)खोदाई बेकायदेशीर असून अश्या वेळेस मोठी लाईन फुटल्यास संपूर्ण शहराचा पाणीपुरवठा बंद होवू शकतो.