सोलापूर शहर

नियम पाळा! नाहीतर.. पोलीस आयुक्त स्पष्टच बोलले..

सोलापूर : पोलीस आयुक्त, एम राजकुमार यांच्या अध्यक्षतेखाली छत्रपती शिवाजी महाराज जयंतीच्या अनुषंगाने सोलापूर शहरातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी शांतता समिती सदस्य, सोलापूर महानगर पालिकेकडील अधिकारी, आर टी ओ चे अधिकारी, महावितरण चे अधिकारी, छत्रपती शिवाजी महाराज जयंती सार्वजनिक मंडळाचे पदाधिकारी व सदस्य यांची पोलीस आयुक्त कार्यालय येथे संयुक्तपणे शांतता कमिटी बैठक आयोजित केली होती. मिरवणुकीमध्ये सर्वांनी नियमांचे पालन करावे नियमांचे पालन न झाल्यास कायदेशीर कारवाई होईल, असे पोलीस आयुक्त एम राजकुमार यांनी सांगितले.

HTML img Tag Simply Easy Learning

या बैठकीची प्रस्तावना श्रीमती डॉ. दिपाली काळे, पोलीस उप आयुक्त (गुन्हे) यांनी करुन बैठक आयोजन करण्यामागचा उद्देश स्पष्ट केला. दि. १५/०२/२०२४ रोजी ते दि. १९/०२/२०२४ रोजी पर्यंतचे कालावधीत छत्रपती शिवाजी महाराज जयंती साजरी करण्यात येणार आहे.

HTML img Tag Simply Easy Learning

दि. १९/०२/२०२४ रोजी मिरवणुकीमध्ये पारंपारीक वाद्य वाजविणेबाबत सुचना देण्यात आल्या. सर्व मंडळांनी सीसीटीव्ही कॅमेरेंची व्यवस्था करावी, मंडपासाठी सार्वजनिक रस्त्याचा 2/3 भाग मोकळा सोडावा. मोकाट जनावरांपासुन मुर्ती/फोटोस धोका होणार नाही याची खबरदारी घ्यावी. देखावे चित्र आक्षेपार्ह नसावेत, उत्सवाचे पावित्र राखावे, देखावे, रोषणाई पाहण्यास येणाऱ्या महिला व पुरुष भाविकांकरीता स्वतंत्र रांगेची सोय करावी, प्रवेशाकरीता आणि बाहेर जाण्यास स्वतंत्र गेट असावे. मंडळांकडुन जाहिरात प्रदर्शन करण्यात येत असल्यास त्यामुळे गर्दी होणार नाही याची दक्षता घेवून आरोग्य विषयक व सामाजिक संदेश असलेल्या जाहिराती प्रदर्शित करण्यास पसंदी द्यावी. तसेच स्वच्छता, जलसंवर्धन, वृक्षारोपण, साक्षरता, सायबर जनजागृती करावी. मा. सर्वोच्च न्यायालयाचे ध्वनीप्रदुषण अनुषंगाने दिलेल्या मार्गदर्शक सुचनांचे पालन करावे. मंडाळांनी महावितरण विभागाकडुन अधिकृत विद्युत जोडणी करुन घ्यावी जेणेकरुन मंडपामध्ये शॉर्ट सर्कीट होवून इजा अथवा धोका होणार नाही याची दक्षता घ्यावी. सर्व मंडळांनी मिरवणुकीत सामिल होणाऱ्या वाहनांची आर टी ओ कडुन तपासणी करावी. मिरवणुकीमध्ये मोठे व लांब कंटेनर वापरु नये, वाहनांवरील देखाव्यांची उंची अडथळा होणारी नसावी. मिरवणुक संवेदनशिल ठिकाणी जास्त वेळ रेंगाळत ठेवू नये. इतर धर्माच्या भावना दुखावणार नाही व तसेच मंडळाने स्थापन केलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांचे मुर्ती समोर स्वयंसेवक सतत हजर राहतील व मुर्तीची देखभाल करतील याची पुरेपुर काळजी घ्यावी. सोशल मिडीयावरुन काही अक्षेपार्ह मेसेजेस, फोटो, पोस्ट व्हायरल होत असल्याचे निदर्शनास आल्यास त्याबाबत त्वरीत पोलीस यंत्रणेस कळवावे. छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्सव मंडळानी ऑनलाईन तसेच ऑफलाईन पध्दतीने परवानगी घेणे बंधनकारक आहे याची नोंद घ्यावी. तसेच ऑनलाईन व ऑफलाईन नोंदणीकरीता प्रत्येक पोलीस ठाणे येथे स्वतंत्र व्यवस्था करण्यात आली आहे. तसेच पोलीसांनी दिलेल्या सुचनांचे पालन करावे.

त्यानंतर बैठकीस उपस्थित शांतता समिती सदस्य व इतरांनी समस्या / सुचना मांडल्या. त्यानंतर सदर सुचनेचे संबंधित महानगर पालिका, महावितरण, आर टी ओ, धर्मादाय आयुक्त कार्यालय अशा खात्याचे अधिकारी यांनी सदर कामाची रुपरेषा बघुन समस्या सोडविण्यात येतील असे सांगितले.

पोलीस आयुक्त एम राजकुमार यांनी बैठकीस उपस्थित लोकांचे स्वागत करुन मांडलेल्या अडी-अडचणीचे निरसन केले. उत्सव साजरा करताना बऱ्याचवेळी कायदेशीर बाबींचे उल्लंघन होत असते, सर्वोच्च न्यायालयाचे ध्वनीप्रदुषण अनुषंगाने दिलेल्या मार्गदर्शक सुचनांचे पालन करावे. कोणीही कायदा हातात घेऊ नये, कोणताही अनुचित प्रकार निदर्शनास आल्यास पोलीसांशी संपर्क साधावा, शांतता समिती सदस्य व नागरीकांनी आपल्या परीसरातील बेकायेदशीर बाबींची माहिती पोलीसांना दिली पाहिजे. मिरवणुकीमध्ये अफवा पसरवू नये, नियमांचे पालन करावे, नियमांचे पालन नाही झाले तर कायदेशीर कारवाई होईल. शासनाने नेमून दिलेल्या सुचना पाळल्या पाहिजेत. तसेच सदर दिवशी कोणताही अनुचित प्रकार घडणार नाही याची दक्षता पोलीस घेतील अशी ग्वाही दिली व बैठकीला उपस्थितांचे आभार मानले.

सदर शांतता समिती बैठकीनंतर मा. सर्वोच्च न्यायालयाचे घ्वनीप्रदुषण अनुषंगाने दिलेल्या मार्गदर्शनाप्रमाणे ध्वनीक्षेपकांचा आवाज किती असावा याबाबत प्रात्यक्षिक दाखविण्यात आले.

या बैठकीस, मा. पोलीस आयुक्त एम राजकुमार, अजित बोऱ्हाडे, पोलीस उप आयुक्त (मुख्यालय), श्रीमती डॉ. दिपाली काळे, पोलीस उप आयुक्त (गुन्हे), विजय कबाडे, पोलीस उप आयुक्त (परीमंडळ), सहाय्यक पोलीस आयुक्त, श्री. अशोक तोरडमल, विभाग-१, श्री. अजय परमार, विभाग-२, श्री. राजु मोरे, वाहतुक शाखा, श्रीमती. प्रांजली सोनवणे, गुन्हे शाखा, नियंत्रण कक्ष, तसेच सोलापूर महानगर पालिकेकडील अतिरीक्त आयुक्त श्री. कारंजे, आर टी ओ चे श्रीमती. अर्चना गायकवाड, महावितरण चे श्री. आशिश मेहता, व तसेच, सर्व पोलीस ठाणे/शाखा प्रभारी अधिकारी व पोलीस अंमलदार, व शांतता कमिटीचे सदस्य, व पत्रकार बंधु उपस्थित होते.

Back to top button