‘एक्साईज’ने जमवला 189 कोटी 60 लाखांचा महसूल
‘एक्साईज’ने जमवला 189 कोटी 60 लाखांचा महसूल
—
सोलापूर : राज्य उत्पादन शुल्क सोलापूर विभागाने 2023-24 या आर्थिक वर्षाकरिता शासनाने दिलेले महसुलाचे उद्दिष्ट पूर्ण केले असून वर्षभरात अवैध दारूविरुद्ध राबविलेल्या मोहिमेत सहा कोटींचा मुद्देमाल जप्त केला आहे.
राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून महसुलाच्या संवर्धनाकरिता अवैध देशी-विदेशी दारू, हातभट्टी दारू, ताडी इत्यादी विरुद्ध सातत्याने कारवाई केली जात असून सोलापूर जिल्ह्याला आर्थिक वर्ष 2023-24 करिता शासनाकडून 166 कोटी 32 लाखांचे उद्दिष्ट देण्यात आले होते. 31 मार्च अखेर विभागाकडून 189 कोटी 60 लाखांचा महसूल जमा झाला असून 114% उद्दिष्ट पूर्तता केली आहे.
वर्षभरात अवैध दारूविरुद्ध विभागातील अधिकारी व कर्मचा-यांनी केलेल्या सातत्यपूर्ण कारवायांमुळे महसुलाचे उद्दिष्ट गाठणे शक्य झाल्याचे अधीक्षक नितीन धार्मिक यांनी सांगितले आहे.
राज्य उत्पादन शुल्क विभागाने 1 एप्रिल 2023 ते 31 मार्च 2024 या कालावधीत जिल्हाभरात टाकलेल्या धाडीत महाराष्ट्र दारुबंदी कायद्यान्वये एकूण 2067 गुन्हे दाखल केले असून 1702 आरोपींना अटक केली आहे. या कालावधीत विभागाने 66,822 लिटर हातभट्टी दारू, 2971 लिटर देशी दारू, 1043 लिटर विदेशी दारू, 2970 लिटर परराज्यातील दारू, 533 लिटर बियर, 12456 लिटर ताडी व 12 लाख 7 हजार 749 लिटर गुळमिश्रित रसायन व 215 वाहने असा एकूण सहा कोटी सत्तर हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
मागील वर्षीच्या तुलनेत 2023-24 या आर्थिक वर्षात गुन्ह्यांच्या नोंदीत व मुद्देमालात लक्षणीय वाढ झाली आहे. राज्य उत्पादन शुल्क विभागाचे आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी राज्यभरात हातभट्टीमुक्त गाव अभियान ही संकल्पना राबविली असून त्या अनुषंगाने राज्य उत्पादन शुल्क सोलापूर विभागाकडून या आर्थिक वर्षात हातभट्टी निर्मितीचे 668, हातभट्टी दारु विक्रीचे 418 व हातभट्टी दारू वाहतुकीचे 134 गुन्हे नोंदविले आहेत.
हातभट्टीमुक्त गाव अभियान प्रत्यक्षात आणण्याच्या दृष्टीने राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून जिल्हाभरातील तालुकानिहाय व पोलीस स्टेशन निहाय हातभट्टी दारु ठिकाणांची मॅपिंग करण्यात आली त्या अनुषंगाने राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून आठवड्यातून दोन ते तीन वेळा अचानकपणे अशा हातभट्टी ठिकाणांवर धाडी टाकण्यात आल्या. तसेच गावातील सरपंच , पोलीस पाटील, ग्रामसेवक यांनाही त्यांच्या गावात हातभट्टी दारू धंदे सुरू असल्यास त्याची माहिती विभागाला देण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर..
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून 16 मार्च ते 4 एप्रिल या कालावधीत एकूण 114 गुन्हे नोंदविण्यात आले असून त्यात 33 लाख एकसष्ट हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. गुरुवारी सकाळच्या सुमारास राज्य उत्पादन शुल्क विभागाने बार्शी तालुक्यातील भातंबरे तांडा या ठिकाणी टाकलेल्या हातभट्टी धाडीत विभागाने एकूण एकोणविस हजार दोनशे लिटर रसायन व पाचशे लिटर हातभट्टी दारू व इतर साहित्य असा एकूण आठ लाख दोन हजार आठशे किंमतीचा मुद्देमाल जप्त केला. या कारवाईत एकूण चार गुन्हे नोंदविण्यात आले असून आरोपींचा शोध घेण्यात येत आहे.
तसेच लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून जिल्हाभरात सहा पथके नेमण्यात आली असून प्रत्येक पथकात निरीक्षक, दोन दुय्यम निरीक्षक , एक सहाय्यक दुय्यम निरीक्षक, तीन जवान व एक वाहनचालक असा स्टाफ समाविष्ट असून याव्यतिरिक्त एक भरारी पथक व एक शीघ्रकृतिदल असे विशेष पथक नेमण्यात आले आहे.
—
लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने कर्नाटक राज्याच्या सीमेवर अक्कलकोट तालुक्यात वागदरी व मंगळवेढा तालुक्यात मरवडे या ठिकाणी दोन तात्पुरते सीमा तपासणी स्थापन करण्यात आहेत. संशयित वाहनांची नियमितपणे तपासणी करण्यात येत असून अवैध दारूची वाहतूक होणार नाही याची दक्षता घेण्यात येत आहे. याव्यतिरिक्त दारु दुकानातून होणा-या दररोजच्या दारु विक्रीवरही विभागाचे कडक लक्ष असून दारु दुकानांची अचानकपणे तपासणी केली जात आहे. कोणत्याही ठिकाणी अवैध हातभट्टी दारु निर्मिती / वाहतूक / विक्री/ साठा, बनावट दारु, परराज्यातील दारु याबाबत माहिती मिळाल्यास या विभागाच्या टोल फ्री क्रमांक 18002339999 व व्हाट्सअप क्रमांक 8422001133 वर संपर्क साधावा.
– नितिन धार्मिक, अधीक्षक
राज्य उत्पादन शुल्क, सोलापूर