‘दक्षिण’वर डोळा ठेवून दिलीप माने पुन्हा काँग्रेसवासी!

Congress Party Leader Dilip Mane Solapur News

सोलापूर : दक्षिण सोलापूर विधानसभा मतदारसंघावर डोळा ठेवत माजी आमदार दिलीप माने हे पुन्हा एकदा काँग्रेसवासी झाले आहेत. गेल्यावेळी विधानसभा निवडणुकीला दिलीप माने यांनी काँग्रेस सोडून शिवसेनेमध्ये प्रवेश केला होता.

आज दुपारी मुंबईमध्ये काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, ज्येष्ठ नेते माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे, दक्षिणचे नेते सुरेश हसापुरे, सोलापूर शहराध्यक्ष चेतन नरोटे यांच्या उपस्थितीत दिलीप माने यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला.
दक्षिण विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार दिलीप माने हे स्वगृही म्हणजे काँग्रेमध्ये परत आले आहेत. याचा फायदा प्रणिती शिंदे यांना होणार आहे. कारण माने यांचा मोठा जनसंपर्क आहे. माने यांनी कारखाना, शिक्षण संस्था, बँका, विकास सोसायट्या, बाजार समिती या माध्यमातून कार्यकर्त्यांचे जाळ निर्माण केलं आहे. दक्षिण विधान सभा मतदारसंघाचे यापूर्वी त्यांनी नेतृत्व देखील केलं आहे. तसेच ते मराठा नेते म्हणून देखील ओळखले जातात. याशिवाय त्यांचा इतर समाजावर देखील प्रभाव आहे. पक्ष प्रवेशाच्या वेळी माने यांनी प्रणिती शिंदे यांना मोठा लीड देऊ अशी ग्वाही दिली.
माजी आमदार दिलीप माने यांचा काँग्रेस प्रवेश गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत होता. लोकसभा निवडणुकीत सोलापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघात भाजपचे सुभाष देशमुख हे विद्यमान आमदार आहेत. त्यामुळे महाविकास आघाडीच्या उमेदवार प्रणिती शिंदे यांना या मतदारसंघात मताधिक्य वाढवण्यासाठी डोकेदुखी ठरणार होती. मात्र माने यांच्या पक्षप्रवेशाने दक्षिण मतदारसंघ आणि उत्तर सोलापूर तालुक्यातील काही गावांमधून मताधिक्य मिळण्यास मदत होणार आहे.
दिलीप माने यांचे स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये चांगले वर्चस्व आहे. तसेच विकास सोसायटीमध्ये देखील माने गटाचा दबदबा दिसून येतो. या माध्यमातून माने यांच्याशी दक्षिण व उत्तर सोलापूर तालुक्यातील ग्रामीण भागातील जनता मोठ्या प्रमाणात जोडली गेलेली आहे. यामुळे या निवडणुकीत प्रणिती शिंदे यांच्या प्रचारात माने यांच्या कार्यकर्त्यांची फौज मोठ्या ताकदीने उतरू शकते. तसेच शहरात देखील दिलीप माने यांना मानणारा वर्ग मोठा आहे. त्याचा फायदाही प्रणिती शिंदे यांना होऊ शकतो.