राजकीय

सिध्देश्वर परिवाराकडून प्रणितींना दीड लाख मतांचे पाठबळ देऊ!

शेतकरी, कामगारांच्या मेळाव्यात काडादी यांचा निर्धार

HTML img Tag Simply Easy Learning

सोलापूर : विमानसेवेच्या नावाखाली भाजपने श्री सिध्देश्वर सहकारी साखर कारखान्याची चिमणी पाडल्यानंतर शेतकरी सभासद आणि कामगारांचे अश्रू पुसण्यासाठी सर्वप्रथम धावून आलेल्या प्रणिती शिंदे यांना सोलापूर लोकसभा मतदारसंघातून विजयी करण्यासाठी त्यांच्या पाठीशी दीड लाख मतांचे पाठबळ उभे करण्याचे आवाहन सिध्देश्वर परिवाराचे प्रमुख धर्मराज काडादी यांनी केले. त्यांच्या हाकेला प्रतिसाद देत शेतकरी व कामगारांनी मोठे मताधिक्य देऊन प्रणिती शिंदे यांना निवडून लोकसभेत पाठविण्याचा निर्धार केला.

HTML img Tag Simply Easy Learning

रविवारी श्री सिध्देश्वर सहकारी साखर कारखान्याच्या कर्मयोगी अप्पासाहेब काडादी साँस्कृतिक भवन येथे सोलापूर लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीच्या उमेदवार प्रणिती शिंदे यांच्या प्रचारार्थ सिध्देश्वर परिवाराने शेतकरी व कामगारांचा भव्य मेळावा आयोजित केला होता. त्यावेळी काडादी बोलत होते. याप्रसंगी मंचावर माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे, उमेदवार प्रणिती शिंदे, माजीमंत्री सिध्दाराम म्हेत्रे, माजी आमदार दिलीप माने, बाजार समितीचे माजी सभापती महादेव चाकोते, प्रकाश वानकर, जिल्हा परिषदेचे माजी सभापती मल्लिकार्जुन पाटील, शिवसेनेचे जिल्हा प्रमुख अमर पाटील आदी उपस्थित होते.
प्रारंभी ग्रामदैवत श्री सिध्देश्वर आणि कारखान्याचे संस्थापक कर्मयोगी अप्पासाहेब काडादी यांच्या प्रतिमेचे मान्यवरांच्या हस्ते पूजन करण्यात आले. त्यानंतर सिध्देश्वर सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष अण्णाराज उर्फ पुष्पराज काडादी यांनी प्रास्ताविकात उपस्थितांचे स्वागत करीत सोलापूरच्या विकासासाठी प्रणिती शिंदे यांना मोठ्या मताधिक्यांनी विजयी करण्याचे आवाहन केले.

याप्रसंगी धर्मराज काडादी म्हणाले, 2014 च्या लोकसभा निवडणूक प्रचारात नरेंद्र मोदी यांनी देशातील भ्रष्टाचार संपवू, महागाई कमी करू अशी अनेक आश्वासने दिली होती. त्यावेळी मतदारांनी त्यांना केंद्रातील सत्ता दिली. आपल्या भागाचा विकास होईल, या अपेक्षेने सुशीलकुमार शिंदे यांनाही बाजूला सारून मतदारांनी भाजपच्या उमेदवारांना निवडून दिले होते. परंतु, निवडून आल्यानंतर गेल्या दहा वर्षांत भाजपच्या या लोकप्रतिनिधींनी द्वेषाचेच राजकारण केले. सुशीलकुमार शिंदे यांनी बोरामणी विमानतळ मंजूर केले. परंतु त्याचे श्रेय शिंदे आणि काँग्रेसला जाईल म्हणून या विमानतळाचा विकास केला नाही. भाजपने जर लक्ष दिले असते तर चार-पाच महिन्यांतही या विमानतळाचा विकास झाला असता. परंतु त्यांनी तसे केले नाही. केंद्रात, राज्यात, महापालिका, जिल्हा परिषदेत तसेच या लोकसभा मतदारसंघातील सहापैकी चार आमदार भाजपचे होते. तरीही या भागाचा विकास ते करू शकले नाहीत. गेल्या दहा वर्षांत भाजपच्या लोकप्रतिनिधींकडून या भागातील पाणीप्रश्न सुटला नाही. स्मार्ट सीटीचा प्रकल्पही पूर्ण झाला नाही. शहरातील सीटी बसची सेवा बंद पडली, उजनी धरणाच्या टेलएन्ड भागातील दक्षिण व उत्तर सोलापूर तालुक्यातील कालव्याला पाणी देऊ शकले नाही. पाणी आणण्यासाठी सरकारकडे पाठपुरावा करा, असे सुचवूनही भाजपच्या लोकप्रतिनिधींना हा प्रश्न सोडविता आला नाही, असे ते म्हणाले.

काडादी पुढे म्हणाले, भाजपच्या लोकप्रतिनिधींनी केवळ द्वेषाचेच राजकारण केले. मी ज्या संस्थांचे नेतृत्व करतो त्यामध्ये अडथळा आणण्याचा प्रयत्न केला. कारखाना बंद पाडण्याचा आणि मला संपविण्याचा हेच त्यांनी धोरण ठेवले होते. त्यातूनच भाजपने 15 जून 2023 रोजी कारखान्याची चिमणी पाडली. मात्र ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी कारखाना चालू करण्यासाठी वसंतदादा शुगर इन्टिट्यूटचे तज्ज्ञ पाठविले. ग्रामदैवत श्री सि ध्देश्वर आणि कर्मयोगी अप्पासाहेब काडादी यांचा आशीर्वाद व आपल्या सर्वांच्या विश्वासाने जुन्या चिमणीवर कारखाना सुरू केला. सिध्देश्वर कारखाना बंद पडला तर आता 2400 रूपयांचा दर देऊन मोठा नफा कमविण्याचे त्यांचे स्वप्न होते. परंतु आपण 2900 रूपयांचा दर जाहीर केला. त्यामुळे सगळ्यांना त्या पध्दतीचे दर जाहीर करावे लागले. परंतु मोठी कमाई करण्याचे त्यांचे स्वप्न धुळीस मिळाले.
कर्मयोगी अप्पासाहेब काडादी आणि त्यांच्या तत्कालीन सहकार्‍यांनी सोलापूर व जिल्ह्याची हरितक्रांती व सर्वांगीण विकासाचे जे स्वप्न पाहिले होते ते साकार करण्यासाठी सोलापूर लोकसभा मतदारसंघातून प्रणिती शिंदे आणि माढा लोकसभा मतदारसंघातून धैर्यशील मोहिते-पाटील या महाविकास आघाडीच्या दोन्ही उमेदवारांना विजयी करा, असे आवाहन काडादी यांनी केले.

याप्रसंगी बाळासाहेब शेळके, अमर पाटील, प्रकाश वानकर, मल्लिकार्जुन पाटील, भारत जाधव, जयदीप साठे, प्रा. संतोष मेटकरी यांनी आपल्या भाषणात भाजपच्या धोरणावर हल्ला चढवून लोकशाहीच्या रक्षणासाठी प्रणिती शिंदे यांना विजयी करण्याचे आवाहन केले.

कारखान्याची चिमणी पाडून शेतकरी व कामगाराच्या अन्नात विष कालवण्याचा प्रयत्न केलेल्या भाजपचा हिशेब चुकता करण्यासाठी प्रणिती शिंदे यांना मोठे मताधिक्य देण्याचे आवाहन शेतकरी व कामगारांना राष्ट्रीय साखर कामगार युनियनचे जनरल सेक्रेटरी अशोक बिराजदार यांनी केले.
यावेळी गुरुराज माळगे, शरणराज काडादी, सुरेश हसापुरे, चेतन नरोटे, बाळासाहेब शेळके, अमर पाटील, प्रकाश वानकर, मल्लिकार्जुन पाटील, अरविंद भडोळे-पाटील, जयदीप साठे, अशोक देवकते, अशोक पाटील, किणीकर, विजयकुमार हत्तुरे, लहू गायकवाड, प्रा. धर्मराज कारले, राजशेखर पाटील, अ‍ॅड. शिवशंकर बिराजदार, विद्यासागर मुलगे, विलास पाटील, हरिश्चंद्र आवताडे, अरुण लातुरे, सुरेश कुंभार, सुरेश झळकी, सिध्दाराम व्हनमाने, महादेव जम्मा, अंबण्णप्पा भंगे, बाळासाहेब पाटील, प्रकाश बिराजदार, प्रा. संतोष मेटकरी, मल्लिकार्जुन कळके, प्रभुराज मैंदर्गीकर, रतन रिक्के आदी उपस्थित होते. कारखान्याचे उपाध्यक्ष सिध्दाराम चाकोते यांनी आभार मानले.

कर्मयोगी अप्पासाहेब काडादी
सर्वधर्मसमभावाचे प्रतीक

श्री सिध्देश्वर सहकारी साखर कारखान्याचे संस्थापक कर्मयोगी अप्पासाहेब काडादी यांनी उभारलेला हा कारखाना धर्मराज काडादी हे समर्थपणे चालवत आहेत. सभासदांना चांगला दर देऊन त्यांचे हित जोपासतात. कर्मयोगी अप्पासाहेब काडादी हे सर्वधर्मसमभावाचे प्रतीक आहेत, असे गौरवोद्गार सुशीलकुमार शिंदे यांनी काढले. त्यांनी उभारलेल्या कारखान्याची चिमणी पाडून भाजपने शेतकरी सभासद आणि कामगारांना दु:ख दिले. वास्तविक पाहता विमानसेवेसाठी या चिमणीचा अडथळा नव्हता. पंतप्रधान आणि मुख्यमंत्र्यांचीही विमाने उतरली आहेत. चिमणी पाडल्यानंतरही विमानसेवेला एअर एव्हीएशन परवानगी मिळणार नाही, असे आपण अगोदरच सांगितले होते. तरीही भाजपने चांगल्या पध्दतीने चालू असलेल्या कारखान्याची चिमणी पाडून नुकसान केले. चिमणी पाडल्यानंतर दुसर्‍या दिवशीच विमानसेवा सुरू करू, असे सांगणारे आता कुठे आहेत, असा प्रश्न शिंदे यांनी केला. सोलापूरच्या विकासासाठी प्रणिती शिंदे यांना निवडून द्या, असे आवाहन त्यांनी उपस्थितांना केले.

बिगर काँग्रेस सत्तेवर;
शेतकरी देशोधडीला

यावेळी माजीमंत्री सिध्दराम म्हेत्रे म्हणाले, या देशात ज्या ज्या वेळी बिगर काँग्रेस सरकार सत्तेवर आले तेव्हा शेतकरी उध्वस्त झाल्याचा इतिहास आहे. शेतकरी या देशाचा कणा आहे. त्यांच्याकडे दुर्लक्ष केल्यास हा महाकायदेश कोसळल्याशिवाय राहणार नाही. केंद्रातील मोदी सरकारने देशातील बड्या उद्योगपतींचे साडेसोळा लाख कोटी रुपयांचे कर्ज माफ केले. या पैशातून देशातील शेतकर्‍यांचे 24 वेळा कर्ज माफ झाले असते. जाती धर्माच्या नावावर समाजात फूट पाडणार्‍या भाजपला सत्तेवरून खाली खेचल्याशिवाय पर्याय नाही. तसेच सिद्धेश्वर साखर कारखान्याची चिमणी पाडणार्‍या भाजपच्या नेतेमंडळींना त्यांची जागा दाखवा, असे आवाहनही त्यांनी केले.

दहा वर्षांपासून अन्याय

माजी आमदार दिलीप माने म्हणाले, कर्मयोगी अप्पासाहेब काडादी यांनी तत्कालीन नेतेमंडळींच्या सहकार्याने महाराष्ट्रात सहकार क्षेत्रातील आदर्श असा सिध्देश्वर साखर कारखान्याची स्थापना केली. त्यांच्या आदर्श नीतिमूल्यानुसारच धर्मराज काडादी यांच्या नेतृत्वाखाली या कारखान्याची वाटचाल योग्य पध्दतीने सुरू असताना गेल्या दहा वर्षांपासून त्यांना त्रास देण्यात येत आहे. आजपर्यंत त्यांनी राजकारणात भूमिका घेतली नव्हती. परंतु आता त्यांनी उघड भूमिका घेतली आहे. त्या भूमिकेला आम्ही समर्थन देतो असे सांगून माजी आमदार माने यांनी महाविकास आघाडीच्या उमेदवार प्रणिती शिंदे यांना निवडून देण्याचे यावेळी आवाहन केले.

फडणवीसांनी फसवणूक केली

यावेळी राष्टवादी शरद पवार गटाचे दिनेश शिंदे म्हणाले, सिद्धेश्वर साखर कारखान्याची चिमणी भाजप सरकारकडून अत्यंत सूडबुद्धीने पाडण्यात आली. चिमणीला संरक्षण देण्यासाठी देशाचे नेते शरद पवार यांनी शेवटपर्यंत प्रयत्न केले. परंतु उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी फसवणूक करून चिमणी पाडली गेली. नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली सरकारला समाजात दहशत निर्माण करायची आहे. शेती सहकार उध्वस्त होऊ नये यासाठी प्रणिती शिंदे यांना निवडून देण्याचे त्यांनी आवाहन केले.

शेतकर्‍यांच्या प्रश्नांवरून
प्रणिती शिंदे भावूक
निवडणुकीच्या रिंगणात उतरावे की नाही अशा द्विधा मनस्थितीत असताना ग्रामीण भागाचा दौरा करण्याचे निश्चित झाले. ग्रामीण भागामध्ये फिरत असताना काळ्या आईची सेवा करणार्‍या माझ्या मायबाप शेतकर्‍यांच्या चेहर्‍यावरील दुःख व हताशपणा पाहून वाईट वाटले असे सांगताना आमदार प्रणिती शिंदे भावूक झाल्या होत्या. निवडणुकीच्या रिंगणात उतरण्यासाठी पहिली प्रेरणा शेतकर्‍यांकडूनच मिळाली. त्यामुळे संसदेत पहिला आवाज शेतकर्‍यांच्या प्रश्नावरच उठवेन अशी ग्वाही दिली.

चिमणी पाडल्याचा रोष
मतदानातून व्यक्त करा
प्रणिती शिंदे यांचे आवाहन
श्री सिध्देश्वर सहकारी साखर कारखान्याची चिमणी पाडलेल्या भाजपविरुध्दचा रोष मतदारांनी मतदानातून दाखवून द्यावा. त्यांनी केलेला अन्याय व दिलेले दु:ख याची ताकद शेतकरी व कामगारांनी दाखवून द्यावी, असे आवाहन सोलापूर लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीच्या उमेदवार प्रणिती शिंदे यांनी केले. त्या म्हणाल्या, शेतकर्‍यांनी ठरविले तर त्यांना कोणतीही हुकूमशाहीसुध्दा थांबवू शकत नाही. एक घाव दोन तुकडे करा आणि भाजपला बाजूला करा, तुमची लेक आणि भगिनी समजून ही एक लढाई लढा. बाकीच्या लढाई माझ्यावर सोडा, असे त्यांनी मतदारांना आवाहन केले.
सिध्देश्वर यात्रेत गड्डा मैदानाच्या जागेवरून भाजपने धर्मराज काडादी यांना दिलेला त्रास आपण कधीही विसरू शकत नाही. आम्ही सर्वांनी मिळून त्यासाठी संघर्ष केला. काडादी हे संघर्षयोध्दा आहेत. भाजपच्या हुकूमशाहीमुळे अनेक नेत्यांनी पक्ष बदलला. भाजपच्या दोन्ही निष्क्रीय खासदारांमुळे दहा वर्षे वाया गेली. आताही त्यांनी ‘उपरा’ उमेदवार दिला आहे. सोलापूरचे प्रश्न सोडविण्यासाठी मला लोकसभा निवडणूक लढण्याची ताकद शेतकर्‍यांमुळे मिळाली. सोलापुरातील पाणीप्रश्न, विमानसेवा, पुन्हा चिमणी उभारण्यासाठी, संविधान वाचविण्यासाठी ही माझी लढाई आहे. भाजप दीडशेच्या पुढेही जागा जिंकू शकणार नाही. ते लोकांमध्ये कधी गेलेच नाहीत. निवडून आल्यानंतर आपण सोलापूर जिल्हा दुष्काळमुक्त करू, मंगळवेढा तालुक्यातील 35 गावांच्या पाण्याचा प्रश्न सोडवू, सोलापुरात आयटी पार्क उभारू आणि मंगळवेढ्यात महात्मा बसवेश्वरांचे स्मारक उभारू, असा संकल्प त्यांनी केला.

Related Articles

Back to top button